Murlidhar Mohol Sarkarnama
विशेष

Murlidhar Mohol News : कसलेला पैलवान, पुण्याचे महापौर आता दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री

Dnyanesh Savant

Pune News : पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौरपद या पदाची मुदत संपताच पक्ष संघटनेत सरचिटणीस …गेल्या ५-६ वर्षांत मुरलीधर मोहोळांनी राजकीय छाप पाडली. त्यातूनच दिल्लीतील नेतृत्वाच्या नजरेतही उजवे ठरलेल्या मोहोळांच्या नावावर पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मोहोर उमटली. कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या मोहोळांना महापौरपदापाठोपाठ आता दिल्लीच्या राजकारणातही ठसा उमटविण्याची संधी मिळाली आहे. कोथरूडमधून आमदारकीची एक संधी हुकली तरी दुसऱ्या संधीसाठी योग्य डाव टाकण्याचे कुस्तीतील कसब मोहोळांनी आता लोकसभा निवडणुकीच्या आधी उमेदवारी मिळवून राजकारणातही दाखविले. पण, यापुढचा डाव जिंकण्यासाठी मोहोळांना तेल लावून आखाड्यात उतरावे लागणार, हे नक्की.

आपण ज्या कोथरुडमध्ये राहातो, त्या भागाची शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वर्गाला जाऊ लागले. पुढे वर्ष-दीड वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे. मग, तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे काॅलेज आणि कुस्तीसाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले आणि आता शहराच्या महापौरापदाची मानाची त्यांनी गदा पटकाविली. नगरसेवकाच्या एकाच टर्ममध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौरपद अशी दोन्ही महत्त्वाची पदे सांभाळणारे ते अलीकडच्या काळातील पहिलेच नेते ठरले आहेत.

मुळशी तालुक्‍यातील मुठा गावातील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी साधारणपणे 1985 च्या सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. ज्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासह तीन भावंडे. या तिघांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण मूळ गावी झाले. त्यातले धाकटे मुरलीधर मोहोळ. त्यांनी भावे स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

मोहोळ कुटुंबाला तशी पहिलवानकीची पार्श्‍वभूमी. (तसे संपूर्ण मुळशी तालुक्यालाच कुस्तीचे वेड. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मामासाहेब मोहोळ हे मुळशीतील मुठा या गावचे. ते पण कुस्तीगीर होते. त्यांचे चिरंजीव अशोक मोहोळ हे आमदार, खासदार झाले. आता पुण्याच्या राजकारणात मुळशीतील मोहोळ महापौरही झाले.) आजोबा, वडील, चुलते रामचंद्र मोहोळ, थोरले बंधू प्रभाकर सगळीच पैलवान. साहजिकच मुरलीधर मोहोळांनी शिक्षणासोबत कुस्तीचे धडे घेतले.

पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीनंतर विशेषत: कुस्तीसाठी मुरलीधर मोहोळ हे कोल्हापुरला गेले आणि तिथेच पदवीपर्यंतचे (कला शाखा) शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठात शिकत असतानाच ते कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्राच्या आखाड्यात उतरले. याच काळात त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून ते 1996 च्या सुमारास पुण्यात परतले. तेव्हा कुस्तीचा नाद सोडून ते राजकीय आखाड्याकडे अधिक वळले.

माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यासह काही नेत्यांच्या संपर्कात येऊन, मोहोळांनी आधी वॉर्ड पातळीवर संघटनेचे काम सुरू केले. वॉर्डापाठोपाठ त्यांच्याकडे तेव्हाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, शहर भाजपमध्ये सरचिटणीस पदांवर असताना त्यांनी कामाची छाप पाडली. याच काळात ते शहरात शिरोळे आणि राज्यात मुंडे समर्थक म्हणून ओळखले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लग्नाच्या बोहल्यावरून उतरून काही महिने झाले असतानाच 2002 मध्ये महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्यपद त्यांच्या पदरात पडले; राजकीय वर्चस्व निर्माण करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. तेव्हाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदमांचे बंधू सुबराव कदम यांच्या निधनामुळे 2006 मध्ये महापालिकेची पोटनिवडणूक (केळेवाडी प्रभाग) जाहीर झाली. ती लढण्याची संधी भाजपने मोहोळांना दिली. शिक्षण संस्थेमुळे कदमांची तेव्हा कोथरुडमध्ये प्रचंड ताकद असतानाही या निवडणुकीत सुबराव कदम यांच्या पत्नी सुशिला यांचा दणदणीत पराभव करीत, मोहोळ "जायंट किलर' ठरले. त्यानंतर वर्षेभरात म्हणजे, 2007 मधील महापालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीत ते पुन्हा याच भागातून नगरसेवक झाले.

या निवडणुकीत भाजपचे तेव्हाचे शहराध्यक्ष गिरीश बापट यांनी अनिल शिरोळेंचे तिकिट कापले, तेव्हा बापट यांचा निषेध करीत मोहोळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवार पेठेतील पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानिमित्ताने ते चर्चेतही आले. मोहोळांचे वाढते प्रस्थ पाहता भाजपने त्यांना 2009 मध्ये खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढण्याचा आदेश दिला. तेव्हा, मनसेचे आमदार दिवंगत रमेश वांजळे यांच्याविरोधात त्यांना गटातटाचा फटका बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.

त्यानंतर प्रभागरचनेतील बदलांमुळे महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मोहोळ यांच्या पत्नी मोनिका निवडणूक रिंगणात उतरल्या आणि त्या आयडीयल कॉलनीतून विजयी झाल्या. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळांनी कोथरुडमधून तयारी केली, तेव्हा पक्षाने मेधा कुलकर्णींना तिकिट दिले. मोहोळांनी लगेचच शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीचा दावा ठोकला. तिथेही मोहोळांचा पत्ता कट झाला. तो कट करण्यामागे मोहोळांचे एकेकाळचे राजकीय गुरू अनिल शिरोळेंचा हात असल्याची चर्चा अजूनही आहे.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मोहोळ तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आली आणि मोहोळांकडे पहिल्याच वर्षी महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या आल्या. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. हे पद सांभाळताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची मने जिंकली.

या पदावर असताना मोहोळांनी पुन्हा कोथरुडच्या उमेदवारीवर डोळा ठेवून तयारी चालविली. स्वपक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णींशी (Medha Kulkarni) वेळोवेळी दोन हात करीत, ते तिकिटाच्या स्पर्धेत आघाडीवर राहिले; पण ऐनवेळी तेव्हाचे पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा हुकले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिनाही झाला तोच त्यांच्याकडे पुण्याचे महापौरपद आले. पण त्यानंतर मोहोळांच्या मनात दिल्ली भरली होती. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंगही लावली होती. मात्र, पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendara Modi), त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devnedra Fadavnis) हे पुण्यातून लढणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर सुनील देवधर, माजी आमदार जगदीश मुळीक हेही उमेदवारीच्या शर्यतीत होते. तरीही, मोहोळांनी बाजी मारली.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT