Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil
Ram Satpute-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
विशेष

Ram Satpute : सातपुतेंनी मोहिते पाटलांना पुन्हा ललकारले; ‘मी कुठेही जाणार नाही, माझे अंत्यसंस्कारही माळशिरसच्या मातीतच होतील’

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 June : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते हे पुन्हा एकदा माळशिरसमध्ये सक्रीय झाले आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा ललकारले आहे. माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन. मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कारही माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील, अशी भावनिक सादही सातपुते यांनी माळशिरसच्या जनतेला घातली.

माळशिरस येथे भाजप (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या उपस्थितीत आज (ता. २२ जून) पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून सातपुते यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. त्या मेळाव्यात बोलताना मोहिते पाटील (Mohite Patil) यांना आव्हान देताना सातपुते यांनी तालुक्यातील जनतेला भावनिक सादही घातली.

माळशिरस विधानसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत एक लाख 80 हजारांचे मताधिक्य मिळवून दाखवू, अशी गर्जना मोहिते पाटील यांनी केली होती. पण, त्यांना माळशिरसमधून 80 हजारांचेही मताधिक्य मिळवता आले नाही, अशा शब्दांत सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डिवचले. आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातील संघर्ष पहायला मिळू शकतो.

मी कुठेही जाणार नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेन. या जनतेसाठी स्वतःला या माळशिरसच्या मातीत गाडून घेईन, असे सांगून सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात पाय रोवून घट्ट उभे राहण्याचे स्पष्ट संकेत दिले.

सातपुते म्हणाले, विरोधकांनी मला लोकसभेच्या निवडणुकीत हिणवलं गेलं. माझं पार्सल बीडला पाठवण्याची भाषा केली गेली. खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. पण, मी माझ्या संस्काराची पातळी कधीही सोडली नाही. मागील पाच वर्षे मी तुमचा सालगडी म्हणून काम करत आलो आहे.

तुम्ही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला. पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या जनतेची सेवा करत राहीन. मी मेल्यानंतरसुद्धा माझे अंत्यसंस्कार माळशिरस तालुक्याच्या मातीत होतील, असेही आमदार सातपुते यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT