Nagpur ZP election twist as the president post goes to the OBC category, reshaping BJP’s district-level political strategies. Sarkarnama
विशेष

Nagpur : नागपूर ZP अध्यक्षपदाचे प्यादे आरक्षणाने घायाळ : सत्तासुंदरी नजरेसमोर पण इच्छुकांवर हाताची घडी घालून बसण्याची वेळ

Nagpur ZP Election : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या सोडतीत अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. गेल्या १३ वर्षांत प्रथमच पुरुष दावेदार होते, मात्र आता भाजप-काँग्रेससमोर नवे समीकरण उभे राहिले आहे.

चंद्रशेखर महाजन

Nagpur ZP Election : जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत नुकतीच निघाली. यात अनेकांना धक्का बसला. नागपूरचे अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव आहे. गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी पुरुष उमेदवार दावेदार ठरणार होते. राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे भाजपला जिल्हा परिषद हातात ठेवणे आवश्यक आहे. अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, आरक्षणाच्या सोडतीत अनेकांचे गट आरक्षित झाल्याने त्यांच्यासमोर आता कुठून लढावे, असा प्रश्न आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत ५७ गटांसाठी येणाऱ्या काळात निवडणूक होणार आहे. याकरिता आरक्षणाची सोडत नुकतीच काढण्यात आली. ओबीसीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. यामुळे अनेकांना हर्षवायू झाला. आपल्याच पारड्यात पद येईल, असे अनेकांना वाटले. तशी तयारीसुद्धा केली. मात्र, धाकधूक होती ती गटाच्या आरक्षणाची. आरक्षण नाही आले तर आपले काय, असा प्रश्न होता. सत्तासुंदरी नजरेसमोर असताना केवळ गट राखीव झाल्याने राजकारण्यांचा हिरमोड झाला.

गतवेळी जि.प.ची सत्ता काँग्रेसकडे होती. सत्तेची सूत्रे माजी मंत्री सुनील केदार यांच्या हातात होती. यामुळे जिल्हा परिषदेत दोनदा महिला अध्यक्ष झाल्या. सभापतीपदावरही महिलाच विराजमान झाल्याने अनेकांचा पुरुषी अहंकार दुखावल्या गेला. त्यातच ऑपरेशन लोट्स होणार-होणार म्हणून दोन वर्षे गेली. सत्ताइच्छुक जिल्हा परिषद सदस्य भाजपत जाऊन काहीतरी चमत्कार करतील, असे वाटत होते. मात्र, ऑपरेशन लोट्स अयशस्वी ठरले आणि पाहता-पाहात काँग्रेसने पूर्णवेळ सत्ता उपभोगली.

गेल्या नऊ महिन्यांपासून प्रशासकराज सुरू आहे. आता निवडणुका होणार आहे. गट झाले आणि गट आरक्षणही झाले. यात अनेकांचा घात झाला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, रामटेक जिल्हाध्यक्ष आनंद राऊत, माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचे नाव जि.प अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र, तिघांचेही गट आरक्षित झाले. आनंद राऊत यांच्या तालुक्यातील तिन्ही गट आरक्षित आहेत. मनोहर कुंभारे यांचा केळवद आणि तेलकामठी गटसुद्धा महिलांसाठी राखीव झाला. यामुळे भाजपमधील अध्यक्षपदाची शर्यत तूर्तास थंड झाली.

वरील तिन्ही नेत्यांना आता दुसरा गट शोधावा लागणार आहे. मनोहर कुंभारे धापेवाड्यातून कदाचित दावेदारी करू शकतात. मात्र, भाजपचे माजी पदाधिकारी ॲड. प्रकाश टेकाडे यांनी निवडणूक अपक्ष जरी लढली तरी त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कुंभारे यांनी प्रकाश टेकाडे यांचा पक्षातून हकालपट्टी करून ‘गेम’ केल्याने प्रकाश टेकाडे स्वस्थ बसणार नाहीत. ते सुद्धा धापेवाड्यामधून ‘गेम’ करण्याच्या तयारीत राहतील. अनिल निधान वडोदा गटातून निवडणूक लढू शकतात. हा गट त्यांच्या क्षेत्रातील नसल्याने त्यांच्यासमोर पक्षातून अनेकांचे आव्हान उभे राहू शकते.

काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे यांनाही हे क्षेत्र सोपे नाही. खुल्या गटातून अनेक नवे चेहरे समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांचा पत्ता कट झाला. त्यांच्याकरिता सध्यातरी कोणताही गट शिल्ल्क नाही. यामुळे पक्षातील दिग्गज थंड झालेत.

काँग्रेसमधील अध्यक्षपदाचे दावेदार थंड :

काँग्रेमधील काही जिल्हा परिषद सदस्य भाजपवासी झाले. यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतील संख्या कमी झाली. यातही आरक्षणात गट महिलांसाठी आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव झाल्याने दावेदार कमी झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबा आष्टणकर यांचा रायपूर गट महिलांसाठी राखीव झाला. तसेच इतर क्षेत्रही राखीव झाल्याने त्यांच्यासमोर पक्षातील संघटन मजबूत करण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीमधील दिग्गजांना फटका बसल्याचे दिसून येते. अनेक नेते घरातील महिलांना पुढे करून राजकारण करण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे भविष्यात अध्यक्षही महिला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT