Nana Patole Sarkarnama
विशेष

Nana Patole: गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा: नाना पटोले

Rise in crimes involving politicians in Maharashtra: गुन्हेगारीसंदर्भात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. महाराष्ट्राचा नंबर खुनाच्या केसेसमध्ये तिसरा असून लैंगिक अत्याचारांत चौथा आहे.

सरकारनामा ब्यूरो

सत्ता असेल तर माणूस काहीही करू शकतो आणि कोणत्याही गुन्ह्यातून मुक्त होऊ शकतो, असं मत महाराष्ट्रातील राजकारण पाहून जनतेचं झालं आहे. रोजच नवीन प्रकारचे गुन्हे घडताना आपल्याला दिसून येतात. २०२२ च्या उत्तरार्धात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढायला सुरूवात झाली होती. त्या वर्षात ८,२१८ दंगलीच्या घटनांची नोंद झाली. जी त्या वर्षातील देशातील सर्वाधिक आहे, असं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर येतं.

या आकडेवारीनुसार गुन्हेगारीसंदर्भात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. महाराष्ट्राचा नंबर खुनाच्या केसेसमध्ये तिसरा असून लैंगिक अत्याचारांत चौथा आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३,७४,०३८ एवढे गुन्हे दाखल झाले आहेत.

यातील बरेचसे गुन्हे असे पण आहेत जे नोंदवलेच गेले नाहीत किंवा राजकीय दबावामुळे कायमचे दाबले गेले आहेत. याच संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राजीनामा मागितला.

राजकारणात अनेक गुन्हेगारांचा समावेश असल्याचे चित्र आपण पाहतो. गुन्हेगार व्यक्ती एखाद्या मोठ्या पक्षाकडून निवडणूक लढवत असते आणि पर्याय नसल्याने बऱ्याचदा आपण अशा व्यक्तीला निवडूनसुद्धा दिलेलं असतं. पण असे नेते जनतेचे सेवक नसून भक्षक बनतात. सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करत समाजात वावरत असतात. महाराष्ट्रात 'बड्या बापाच्या औलादींच्या' एवढ्या घटना घडल्या आहेत ज्यात सामान्य माणसाला न्याय मिळणं तर लांबची गोष्ट, माणुसकीसुद्धा जपता आली नाही.

पुण्यातील मोठे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलाने पोर्श कारने दुचाकीस्वार दोघांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचं सांगितलं जातंय.

अपघात घडताच पोलिसांनी वेदांतला ताब्यात घेतलं. त्याच्या वडिलांनी विलंब न करता निव्वळ १५ तासांत जामीनसुद्धा मंजूर करून घेतला आणि न्यायालयाने त्या मुलाला अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आणि पोलिसांच्या भूमिकेकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले.

"मी कार चालवण्याचं कोणतेही प्रशिक्षण घेतलेलं नाही. माझ्याकडे वाहन चालवण्याचाही परवानाही नाही. वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची कार माझ्याकडे दिली होती आणि मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना महिती होतं" अशी माहिती आरोपीने पोलिस जबाबात दिली. पुढे या प्रकरणात पोलिसांनी विशाल अग्रवाललाही अटक केली परंतु तो जामिनावर सुटला.

आरोपी ज्या बार मध्ये बसून दारू प्यायला त्या बार मालकांनासुद्धा अल्पवयीन मुलाला दारू दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पण शेवटी मुलाला किंवा त्याच्या बापाला काही ठोस शिक्षा झालेली नाही. या प्रकणात दोन निष्पाप बळी गेले. त्यांच्यासाठी कोणीच काहीच केलेलं दिसून येत नाही.

शिवसेना उपनेते राजेश शहा यांच्या बाबतीत अशीच घटना घडली. वरळीला पहाटेच्या वेळी आरोपी मिहिरने कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर त्याने त्यांच्या वडिलांना फोन लावला. "गाडी चालक चालवत होता असं सांगू, तू इथून पळून जा." असा सल्ला राजेश शहा यांनी मिहिरला दिला. आरोपीला लपवून ठेवण्याच्या गुन्ह्यासाठी राजेश शहा यांना अटक करण्यात आली. त्यांनी १५ हजारांचा जामीन घेतला आणि त्यांना सोडण्यात आलं. त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली.

कावेरी व तिचा पती प्रदीप नाखवा दुचाकीवरून प्रवास करत होते. तेव्हा ॲनी बेझंट रोडवर मिहिरने आपल्या कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यावेळी प्रदीप मोटारगाडीच्या बोनेट वर पडले, तर कावेरी मोटारगाडीच्या समोर पडल्या. परंतु गाडी थांबवायची सोडून आरोपीने कार भरधाव वेगाने नेली. सोबत कावेरी यांना फरफटत नेले. चालक आणि मिहिरने पुढे जाऊन गाडी थांबून कावेरीचा मृतदेह रस्त्यावर फेकला व ते पुढे निघून गेले.

राजेश शहा यांनी मिहिर याला परदेशात पळवल्याची शक्यता पोलसांनी सांगितली. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून सामान्य लोकांना चिरडून मारायचं आणि काही झालं तर सत्ता आपल्या बापाचीच आहे अशाच वृत्तीने ही मुलं मोठी झाल्याचं दिसून येतं.

असाच काहीसा प्रकार भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेला दिसतो. नागपुरात एका रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले.

अपघातील कार ही बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचे समोर आले आहे. “सर्वसामान्यांना न्याय वेगळा आणि नेत्याचा मुलाला वेगळा? असा प्रश्न या प्रकरणामुळे उद्भवतो. राहुल गांधी यांच्या आरक्षण संदर्भातील वक्तव्यावर भाजपचे नेते तरविंदर सिंह मारवाह यांनी राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे लोकशाहीतल्या कुठल्याच नेत्याला शोभण्यासारखं नाही,” या शब्दांत नाना पटोलेंनी आपलं मत व्यक्त केलं.

“एका लहान मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार होतो आणि त्या गुन्ह्याची नोंदसुध्दा पोलिस करत नाहीत. कारण ज्या शाळेत हे प्रकरण झालं ती शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे भाजप सरकारशी संबंधित लोकांचे लागेबांधे त्यात आहेत,” या शब्दांत नाना पटोले यांनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आपला राग व्यक्त केला.

बिल्कीस बानो केस बाबतीतही गुजरात सरकारने माफीच्या धोरणानुसार ११ आरोपींची सुटका केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, जिथे गुन्हेगारांवर खटला चालवला गेलाय आणि शिक्षा झाली आहे, फक्त ते राज्यच दोषींना माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतं.

कोणत्याही प्रकरणात गुजरात सरकार दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेऊ शकत नाही, तर महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेईल. या हत्याकांडातील दोषींना सोडवण्याचा गुजरात सरकारचा निर्णय म्हणजे सत्तेचा दुरूपयोग असल्याचंही न्यायालयाने म्हटलं.

त्यावर राहुल गांधी यांनीसुद्धा वक्तव्य देताना असं म्हटलं की "निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी न्यायाची हत्या करण्याची प्रवृत्ती लोकशाही व्यवस्थेत घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने पुन्हा एकदा देशाला सांगितलंय की, गुन्हेगारांचे संरक्षक कोण आहेत. बिल्कीस बानोचा अथक संघर्ष हा अहंकारी भाजपा सरकारविरोधात न्यायाच्या विजयाचं प्रतीक आहे."

सरकार गुन्हेगारांना संपूर्ण सुरक्षा देतंय. “श्रीमंतांच्या मुलांना वाचवून मध्यमवर्गीयांना पिळवटलं जातंय. म्हणूनच हिट अँड रनचे आरोपी महाराष्ट्रात मोकळे फिरत आहेत. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. महाराष्ट्रातील कायदेशीर स्थिती बिकट आहे,” असं नाना पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीसच स्वतःचा वकील वापरून गर्भश्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा द्यावा, अशीही नाना पटोलेंनी मागणी केलीय.

Facebook link Nana Patole

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT