Narayan Rane- Ajit Pawar 

 

Sarkarnama 

विशेष

बारामतीला यापुढे कर्ज देणार नाही, असे नारायण राणे का म्हणाले?

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या (Sindhudurg Bank Election) निकालांतर राणे यांची सविस्तर पत्रकार परिषद

सरकारनामा ब्यूरो

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सामना रंगला. ही निवडणूक भाजपने जिंकल्यांतर दिलेल्या प्रतिक्रियेत नारायण राणे यांनी अजितदादांना टोमणा मारला. `या विजयानंतर आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे असल्याचे सांगत यापुढे बारामतीला कर्ज पुरवठा होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेवर विजय मिळविताना अक्कलेचा वापर झाला. ज्यांना अक्कल आहे, त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आलेली आहे असेही ते म्हणाले.

निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची आणि उल्लेख बारामतीतच्या कर्जाचे, असे कसे काय झाले? याची माहिती घेता सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेने साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिले आहे. हा कारखाना अजित पवार यांचा असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांचे आरोप पवार यांनी फेटाळून लावले. याच कारखान्याच्या निमित्ताने राणे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेथे दौराही केला होता. तसेच राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. संस्था चालवायला अक्कल लागते, बंद करायला नाही, असे म्हणत पवार यांनी टीका केली होती. त्याला राणे यांनी कोण अजित पवार, असा प्रश्न विचारत उत्तर दिले होते. त्यामुळे आज निकालानंतर बोलताना अजितदादांविषयीची त्यांची नाराजी लपून राहिली नाही. अजितदादांनी अक्कल काढली होती. त्यास उत्तर देताना ज्यांना अक्कल आहे, त्यांच्या ताब्यात बॅंक आल्याचा निर्वाळा दिला.

जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर कणकवलीत दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, अतुल काळसेकर यांच्यासह जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार उपस्थित होते.

श्री.राणे म्हणाले, “भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आम्ही जिल्हा बँकेवर सत्ता मिळवू शकलो. जिल्हा बँकेच्या विजयानंतर आता आमचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे असणार आहे. राज्यात भाजपची सत्ता थोडक्यात हुकली; पण त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रगत महाराष्ट्र अधोगतीकडे नेण्याचे कार्यक्रम सुरू केला आहे. राज्याला सक्षम मुख्यमंत्री नाही. राज्य अधोगतीकडे चाललंय. ही स्थिती थांबवून राज्यातील साडे तेरा कोटी जनतेला सुखाचे दिवस येण्यासाठी केंद्रात जसे मोदी धडाडीने काम करत आहेत, तसाच कारभार करणारा भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा आहे. लगानची टीम आम्हाला नकोय. विधानसभा, लोकसभा निवडणुकीला अजून दोन अडीच वर्षे आहेत.”

दरम्यान तीनचे चार विधानसभा मतदारसंघही होतील; पण सिंधुदुर्गातील आमदार आणि खासदार हे भाजपचेच असणार आहेत. नको असलेले चेहरे इथली जनता लोकप्रतिनिधी म्हणून निवडणार नाही असे ते म्हणाले.

जिल्हा बँकेत ज्यांना 36 मत मिळू शकंत नाहीत, त्यांनी विधानसभेच्या गोष्टी करू नयेत असा टोला नारायण राणे यांनी सतीश सावंत यांना हाणला. तसेच महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या आठ पैकी काही जण आमच्या संपर्कात आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन करून संपर्कही साधला आहे. यातील काही उमेदवारांना आम्ही घेणार आहोत असे श्री.राणे म्हणाले.

अमित शहांना अहवाल देणार
सिंधुदुर्गातील पोलीस यंत्रणा आमच्याशी कशी वागली. त्यांनी कसे काम केले. चौथ्या स्तंभाने काय केले. कोर्ट कचेर्‍या कशा अनुभवायला मिळाल्या, या सर्वांचा अहवाल आम्ही केंद्रीय मंत्री अमित शहा यांना देणार असल्याचेही राणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT