BJP MLA Gopichand Padalkar in news after remarks on Jayant Patil – here’s his journey of political success. Sarkarnama
विशेष

Jayant Patil Vs Gopichand Padalkar : जयंत पाटलांना नडले, पवारांना भिडले... मातब्बर नेत्यांविरोधात गोपीचंद पडळकरांचं राजकारण कसं उभं राहिलं?

Jayant Patil Vs Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनी राजकारणात वादग्रस्त वाटचाल करत भाजपचे आमदार पद मिळवले. धनगर समाजाचा प्रमुख चेहरा बनून त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सरकारनामा ब्युरो

- नेहा सराफ, वरिष्ठ प्रतिनिधी, सरकारनामा

Jayant Patil Vs Gopichand Padalkar : 'जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे', हे एवढे जहरी आणि खालच्या दर्जाचे वक्तव्य आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल हे वक्तव्य होते. या वक्तव्यानंतर पडळकरांवर चौफेर टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पडळकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. मोर्चे निघत आहेत. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून तक्रार केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाचार घेतला. इतकंच काय स्वतः फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली, भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी चूक मान्य करत पडळकरांना एकाहीही सोडलं.

पण पडळकर वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुळात त्यांची ओळखच वादग्रस्त चेहरा अशी आहे. शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या इतर नेत्यांना पडळकरांनी सोडलेलं नाही. सुसंस्कृत राजकारण हवं असलेले सर्वपक्षीय नेते आणि महाराष्ट्रातील जनता पडळकर यांच्या भूमिकेवर, वक्तव्यांवर टीका करत असते. तरीही ते बोलत असतात.

यातून पडळकरांना काय फायदा होणार आहे?

अर्थात होणार आहे म्हणूनच तर आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य करतात. आता एवढी टीका होत असूनही पडळकर माफी मागण्याची तयारी तर दूरच त्यांना चूकच मान्य नाही. कारण त्यांना मिळालेला प्रतिसाद. नीट समजून घ्या पडळकर यांच्या या बोलण्यामागे अनेक अँगल्स आहेत. ते ज्या धनगर समाजातून येतात तिथे त्यांना आजही नेतृत्व व्हायला लढावं लागतंय. त्या तुलनेत जयंत पाटील यांचा प्रवास खूप सोपा आहे. त्यांना राजारामबापू पाटील यांची लिगसी होती, जोडीला माणसं होती, संस्था होत्या.

पण पडळकरांना पडळकरवाडीसारख्या छोट्याश्या गावातून शून्यातून सुरुवात करावी लागली. अशावेळी वर्षानुवर्षे सांगली जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व राखलेल्या पाटील किंवा इतर मातब्बर नेत्यांना थेट टार्गेट कारण्याशिवाय पर्याय नव्हता. पडळकर यांनी असं केलं नसतं तर त्यांना भाजपाने आणि धनगर समाजानेही उभं केलं नसतं. त्यामुळे टीका करूनच, आक्रमक बाणा दाखवून, वादग्रस्त वक्तव्य करून पडळकर पुढे आले, मोठे झाले, आमदार झाले आणि म्हणूनच त्यात काय चुकीचं वाटत नाही.

भाजपलाही आधी गोड वाटलं...

सिंहासनमध्ये अरुण सरनाईक कामगार पुढारी डिकास्टाला म्हणतात,'मी राजकारणी माणूस, मी कोणाचाही फायदा माझ्या फायद्यासाठी करतो'. जेव्हा पवार आणि इतर सो कोल्ड प्रस्थापितांवर बोलायला कोणी तयार नव्हतं तेव्हा पडळकर बोलायचे, लोकं अंगावर घ्यायचे. सुरुवातीला ती भाजपची गरज होती, त्यांनी त्यांचा व्यवस्थित उपयोग करून घेतला.

अर्थात त्या बदल्यात त्यांना परिषद पण दिली. पण पडळकर गप्प थोडेच राहणार आता? ते तर सुटलेच ना, त्यांना आता आक्रमक बोलायला आवडतंय. नीट बघा त्यांनी हाती घेतलेला लव्ह जिहादचा मुद्दा, ख्रिश्चन समाजाच्या विरोधातील लढाई, त्यातली आक्रमकता असो ते थेट टोकाचं बोलतात. तेव्हाही भाजपला त्यांना आवरण कठीण गेलं.

"bad publicity is still publicity" :

विधानभवनातील वादानंतर काही दिवसांपासून पडळकर चर्चेत नव्हते. आता सगळ्या चॅनलवर तेच आहेत. लोक बोलतील, चर्चा करतील, टीका करतील पण लक्षात तर ठेवतील. शेवटी "bad publicity is still publicity" हे पडळकरांबाबत तंतोतंत लागू पडत. राजकारणात रिलेव्हन्स ठेवणं फार महत्वाचं असतंय. पडळकर पुन्हा पुन्हा ते सिद्ध करू बघत आहेत.

बडबडीचा फायदा की तोटा?

दोन्हीही. पडळकरांना बडबडीचा राजकीय फायदा तर झालाच आहे. पण तोटाही होणार आहे. भाजपमध्ये विकासासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक असणारा प्रगल्भतेचा चेहरा हा शिक्का त्यांच्यावर कधीच बसणार नाही. कायमच त्यांना वादग्रस्त म्हणून ओळखलं जाईल. त्यांचे अंतर्गत विरोधक याचा फायदा करून घेऊ शकतात.

एकूणच आपण काहीही म्हणत असलो तरी आत्ताच अॅटिट्यूड बघता पडळकर बोलायचं थांबतील असं वाटत नाही आणि त्यांना खरंच कंट्रोल करण्याचं काम भाजपही करणार नाही. ठाकरेंविरोधात राणे, पवारांविरोधात पडळकर हे भाजपचे शस्त्र आहेत आणि त्यांना पूर्ण नेस्तनाबूत करण्याची राजकीय चूक ते कधीच करणार नाहीत इतकंच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT