Nana Patole-Balasaheb Thorat-Ajit Pawar
Nana Patole-Balasaheb Thorat-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष अविश्वास प्रस्ताव : अजितदादा, थोरातांच्या सह्या का नाहीत; पटोलेंनी सांगितले कारण....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव जेव्हा सभागृहात येईल, तेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यावर बोलतील. तसेच, अविश्वास प्रस्तावासाठी केवळ २९ आमदारांच्या सह्यांची गरज असते, त्यामुळे विधीमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची सही नाही, असे काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. (No-confidence motion in Assembly Speaker news update)

महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात गुरुवारी रात्री अविश्वाव प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, त्या प्रस्तावर विरोधी पक्षनेते अजित पवार, यांच्यासह विधीमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सह्या नाहीत, त्यामुळे अविश्वास प्रस्तावावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सभागृहात जेव्हा हा प्रश्न येईल, तेव्हा त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतील. या पद्धतीच्या अफवा उठवून त्यांच्याविषयी संशय व्यक्त करण्यात येऊ नये. बाळासाहेब थोरात यांची सही नसल्याबद्दलही पटोले यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी केवळ २९ आमदारांच्याच सह्या लागतात. विरोधी पक्षाच्या संपूर्ण लोकांच्या सह्या आता लागत नाहीत. जी पद्धत आहे, आमचे जे अधिकार आहेत. त्यानसार नियमाप्रमाणे आम्ही हा अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.

महाविकास आघाडीत कोणतीही धूसफूस नाही. मात्र, ईडी सरकारमध्ये नक्कीच धूसफस आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाले. कालही विधानसभेत घोषणांचा नुसताच पाऊस झाला. सरकार पैसा कोठून आणणार. काय करेल. किती कर्ज घेणार असे अनेक प्रश्न आहेत, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग केल्याची पाठ थोपटून घेतात. पण, त्यासाठी किती कर्ज घेतलं होतं. तो रस्ता कुणासाठी केला. कारण या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत. लोकांचे जीव जात आहेत. एकीकडे ते सांगतात की आम्ही वेग कमी करू, तर दुसरीकडे ते सांगतात की नागपूरहून मुंबईला एवढ्या तासात पोचणार. पण, तशा गाड्या कुठून आणणार. समृद्धी महामार्ग हा श्रीमंतांसाठी तयार करण्यात आलेला आहे. तो गरीब, सर्वसामान्यांसाठी नाही, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT