Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Sharad Pawar : पितळी...कान तुटलेला कप...पोतं ते कपबशी... सोफा-खुर्च्या... : पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सुमारे ५५ वर्षांपूर्वी मला लोकांनी पहिल्यांदा बारामती (Baramati) तालुक्यात आमदार केलं. त्यावेळी तालुक्यात पणदरे येथे जगताप नावाचे एक गृहस्थ इंजिनिअर होते. आता पणदरेत तीनशे इंजिनिअर आहेत, तर माळेगावात त्यापेक्षा जास्त आहेत. सोमेश्वरनगरमध्येही वाढले आहेत. सहकार, सहकारातून कारखानदारी आणि कारखानदारीतून शिक्षणाचा विस्तार झाला आणि एकूणच सगळ्यांचं जीवनमान उंचावलं, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी सहकारी साखर कारखान्यांची प्रशस्ती केली. (Old things told by Sharad Pawar to students)

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयांची पाहणी पवार यांनी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पवार म्हणाले की, पूर्वी कलकत्ता, मुंबई ही उद्योधंद्याची ठिकाणे होती. ग्रामीण भागात कारखाने खासगी मालकीचे होते. शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना ही संकल्पना नव्हती. माळीनगरला शेतकऱ्यांनी मिळून साखर कारखाना काढला. पुढे सहकारी साखर कारखानदारीतून शिक्षणाचा विस्तार ही संकल्पना रूजली. सोमेश्वरनगर परिसरात माळेगाव व सणसर कारखान्याच्या कार्यक्षेत्रापेक्षा चांगला ऊस असायचा. गुळाची बाजारपेठ नीरा गावात होती. पूर्वीच्या जाणकार लोकांनी कारखाना आणला.

‘तुमच्या वाडवडिलांनी आम्हाला कामाची संधी दिली. त्यातून परिसराचं चित्र बदललं. पूर्वी मतदारसंघातील दुष्काळी भागात फिरताना पितळीत चहा मिळायचा. पुढच्या निवडणुकीत कान तुटलेला कप आला. आणखी दहा वर्षांनी चांगली कपबशी मिळाली. पोतं, किलतान जाऊन सतरंजी आली. आता तर सोफा आणि खुर्च्या आल्या आहेत,’ असे गमतीशीर उदाहरणही पवार यांनी दिले. आनंदकुमार होळकर यांनी स्वागत केले सचिव भारत खोमणे यांनी आभार मानले.

सोमेश्वरमध्ये पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या....

उद्योगासाठी जमिनी जातात, या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, कमीन्स कंपनी आपल्याकडे नव्हती. मी भेटल्यावर लोणंद, सुरवडी बाजूला कमीन्सच्या सहा कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. सोबत लोणंद, जेजुरी, बारामती भागात एमआयडीसी उभ्या राहिल्या. साखर कारखान्यांनीही रोजगार दिले. त्यामुळे नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी उद्योग आवश्यक असतात. तरुणांना व महिलांना पदांवर संधी देणार का? या प्रश्नांवर पवार यांनी, १९६२ नंतर सोमेश्वर कारखान्यावर प्रणिती खोमणे यांच्या रूपाने पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत, असे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT