ते केंद्रीय गृहमंत्री होते, अन्य खात्यांचेही मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, राज्यपाल होते... मात्र वकिली व्यवसायातील आपल्या 'सिनियर'चा सन्मान राखायला ते विसरले नाहीत. त्यांना भेटायची इच्छा झाली की ते स्वतः पूर्वकल्पना देऊन, त्यांची वेळ घेऊन त्यांच्या घरी जायचे. भेटण्यासाठी त्यांनी आपल्या सिनियरना कधीही आपल्या निवासस्थानी बोलावलं नाही. अशी शालीनता, सुसंस्कृतपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेला आहे. वकिली व्यवसायातील ज्युनियर म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर आणि अॅड. एच. व्ही पाटील हे त्यांचे सिनियर!
शिवराज पाटील चाकूरकर यांचा विषय निघाला की विविध क्षेत्रातले लोक त्यांच्याविषयीच्या आठवणी,किस्से सांगतात. वरील आठवण लातूर येथील अॅड. अरविंद रेड्डी यांनी सांगितली आहे. लातूरच्या सांस्कृतिक, साहित्यिक जडणघडणीत चाकूरकर यांचा मोलाचा वाटा आहे. शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात मोठी भर टाकली. नगराध्यक्ष असताना त्यांनी टाऊन हॉलमध्ये ग्रंथालय सुरू केलं. ते नगराध्यक्ष असतानाच्या काळात लातुरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. या संमेलनाला विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आदी दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती. संसदेत आज जे समृद्ध ग्रंथालय दिसते, त्याचे श्रेय चाकूरकर यांनाच जाते. लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी या ग्रंथालयाकडं विशेष लक्ष दिलं होतं, असं ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर सांगतात.
सध्याच्या काळात एखादा शालीन, सुसंस्कृत, व्यर्थ बडबड न करणारा राजकीय नेता दिसला की त्याचे कौतुक केल्याशिवाय कोणालाही राहावत नाही. गेल्या काही वर्षांपासून तर राज्याच्या, देशाच्या राजकारणाचा पोत पार बिघडून गेला आहे. पण राजकारणात एक अशी पिढी होती, जी मुळातच सुसंस्कृत, शालीन होती. शिवराज पाटील चाकूरकर हे त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. राजकारणात त्यांनी मूल्ये जपली, पक्षनिष्ठा जपली. स्वपक्षातच, म्हणजे काँग्रेसमध्येच नव्हे तर विरोधी पक्षांतही त्यांचे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षांतील नेत्यांशीही त्यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध आहेत.
लातूर लोकसभा मतदारसंघातून 1980 ते 1999 या कालावधीत सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रम शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला आहे. 2004 मध्ये त्यांचा या मतदारसंघातून पराभव झाला, याची खंत लातूरकरांना आजही आहे. असं सांगितलं जातं की त्यावेळी ते पंतप्रधानपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक होते, मात्र पराभव झाल्यामुळं त्यांचं नाव मागे पडलं. 2004 मध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर घेऊन गृहमंत्रिपद दिलं. त्यानंतर त्यांच्यावर पंजाबच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचं काम पाहिलं. लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला.
शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला. विश्वनाथराव पाटील हे त्यांचे वडील. त्यांच्या मातुःश्रींचं नाव वेलदुडाबाई. विश्वनाथराव हे शेतकरी, जमीनदार होते. त्याकाळात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यावेळी हा भाग हैदराबादच्या निझामाच्या अधिपत्याखाली होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत झालं. माध्यमिक शिक्षणानंतर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून ते बी.एस्सी. झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली.
लातूर येथे त्यांनी अॅड. एच. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखीली त्यांचे ज्यूनियर म्हणून वकिली सुरू केली. राजकीय जीवनात मोठ्या पदांवर असतानाही चाकूरकर यांनी आपले सिनियर अॅड. पाटील यांचा कायम सन्मान राखला. विनम्रता आणि शालिनता हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या व्यक्तीमत्वाचे अविभाज्य भाग आहेत. चाकूर येथील नागरिकांना त्यांच्याविषयी प्रचंड जिव्हाळा आहे, अभिमान आहे, आदरयुक्त प्रेम आहे. आजही शिवराज पाटील चाकूरकर चाकूरला आले की जुन्या मंडळींना आवर्जून भेटतात. त्यांच्याशी गप्पागोष्टींमध्ये रमून जातात.
1967 ते 1969 या कालावधीत चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष राहिले. याच काळात त्यांनी लातूरच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर टाकली. तत्पूर्वी, 1963 मध्ये त्यांचा विजयाताई पाटील यांच्याशी विवाह झाला. एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्यं आहेत. त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी गेल्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. अर्चनाताई यांनी लातूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर 2024 ची निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लातूरचे नगराध्यक्ष झाल्यानंतर चाकूरकर यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 1972 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 1972 ते 1980 पर्यंत त्यांनी दोनवेळेस निवडणूक लढवली आणि जिंकली. यादरम्यान त्यांना उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याचा मान त्यांना मिळाला. ते सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षही होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1980 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांनी अपक्ष माणिकराव सोनवणे यांचा पराभव केला. त्यानंतर चाकूरकर यांनी मागं वळून पाहिलं नाही. सलग सात निवडणुकांत ते विजयी झाले. 2004 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
1980 मध्ये चाकूरकर पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय बनले. त्यांना लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालं. 1982 ते 1984 पर्यंत त्यांच्याकडे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचं मंत्रिपद त्यांनी दीर्घकाळ सांभाळलं.
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यानंतरही शिवराज पाटील चाकूरकर यांचं पक्षसंघटनेतील महत्व कायम राहिलं. पक्षसंघटनेतही त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1991 ते 1996 दरम्यान त्यांना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याती संधी मिळाली.
याच काळात 1992 मध्ये त्यांनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची सुरुवात केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रश्नोत्तरांच्या तासांचं लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याच्या निर्णयात चाकूरकर यांचं योगदान मोठं आहे. संसदेतील ग्रंथालयाच्या इमारतीचं बांधकाम चाकूरकर हे लोकसभा अध्यक्ष असतानाच्या काळात झालं. या ग्रंथालयात आज विपुल ग्रंथसंपदा आहे. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्य़क्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.
2004 च्या निवडणुकीत चाकूरकर यांचा लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. चाकूरकर यांनी सलग सातवेळा या मतदारसंघातू विजय मिळवला होता. त्यामुळं अर्थातच त्यांच्याविरोधात अँटीइन्कमबन्सी होती. याशिवाय, भाजपनं ज्या रूपाताई पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली त्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगकेर यांच्या स्नुषा.
रूपाताई यांचं माहेर हे उमरगा तालुक्यातील मुळज येथील चालुक्य घराणं. त्यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यांचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होता. त्यामुळं रूपाताई पाटील यांना या तालुक्यातून सहानुभूती मिळाली. शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते.
पक्षांतर्गत विरोधकही हातभार लावायचे, मात्र काही केल्या त्यांचा पराभव होत नव्हता. लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघांत पिछाडीवर राहिले तरी चाकूरकर यांना उमरगा मतदारसंघ तारून न्यायचा.
उमरगा-लोहारा तालुक्यांत काँग्रेस मजबूत होती. त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळायचं. ही कोंडी फोडणं विरोधकांना शक्य होत नव्हतं. दरम्यानच्या काळात रूपाताई यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाजी पाटील यांचं नाव पुढं आलं होतं, मात्र त्यावेळी संभाजी पाटील हे अत्यंत नवखे होते. त्यामुळं रूपाताई यांना उमेदवारी मिळाली होती.
त्यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यांत विकास आघाडी अस्तित्वात होती. त्या आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता. काँग्रेसविरुद्ध हे तिन्ही पक्ष एकवटलेले होते. चाकूरकर विजयी झाले, त्या सातही निवडणुकांमध्ये उमरगा तालुक्यातून त्यांना भरघोस आघाडी मिळाली होती. 2004 च्या निवडणुकीत मात्र वेगळंच घडलं. उमरगा-लोहारा विकास आघाडीचे नेते एकवटल्यामुळं आणि उमरगा हा रूपाताई यांचं माहेर असल्यामुळं चाकूरकर यांना आघाडी मिळाली नाही.
निलंगा हे रूपाताईंचं सासर. त्यामुळं त्या तालुक्यातूनही त्यांना आघाडी मिळाली. काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते थोडेसे गाफील राहिले आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाट्याला त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील एकमेव पराभव आला. चाकूरकर 2004 मध्ये विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाचे दावेदार राहिले असते, अशी चर्चा त्यावेळी होती. पराभव झाला आणि सर्व चर्चा बंद झाल्या.
कायकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे 2004 मध्ये माझा पराभव झाला, अशी खंत शिवराज पाटील चाकूरकर यांना आपल्या मूळ गावी चाकूर येथे 2018 मध्ये आय़ोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. तसंच झालं होतं. काँग्रेसच्या सरंजामी धाटणीच्या नेत्यांनी विरोधी उमेदवाराला हलक्यात घेतल्यामुळं चाकूरकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसनं चाकूरकरांना वाऱ्यावर सो़डलं नाही. राज्यसभेवर घेऊन त्यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. चाकूरकर यांचं स्थान काँग्रेसमध्ये किती महत्वाचं होतं, हे यावरून लक्षात येईल. मुंबईवर 26-11 चा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चाकूरकर यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2010 मध्ये त्यांची पंजाबच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली. 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं.
या सरकारनं काँग्रेसच्या काळात नेमणुका झालेल्या राज्यपालांची उचलबांगडी केली, मात्र चाकूरकर यांना भाजपनं हात लावला नाही. त्यांनी राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. चाकूरकर यांचे सर्व पक्षांत मित्र आहेत. ते अटलबिहारी वाजपेयी यांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही निकटवर्तीय आहेत. भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांनी तीनवेळा चाकूरकर यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली. एका निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांची लातूर येथे जाहीर सभा झाली होती. त्या सभेत अटलजींनी शिवराज पाटील चाकूरकर यांचंही तोंडभरून कौतुक केलं होतं. त्याची आजही चवीनं चर्चा होत असते. चाकूरकर हे शांत, संयमी, शालीन राजाकीय नेते. मात्र त्यांना महत्वाकांक्षा नव्हती, असं नाही.
राज्यपाल जेथे मुक्कामाला असतील तेथे तिरंगा लावण्याचा प्रोटोकॉल असतो. पंजाबचे राज्यपाल असताना ते एकदा लातूरच्या दौऱ्यावर आले. त्यांचा मुक्काम साहजिकच त्यांच्या देवघर निवासस्थानी होणार होता. तिरंगा लावण्यासाठीची सोय इतक्या कमी वेळेत करायची कशी, यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. अधिकारी त्यांच्या या निवासस्थानी आले आणि त्यांच्या जिवात जीव आला. जिवात जीव का आला, तर तिरंगा लावण्यासाठीची सोय तेथे आधीच, म्हणजे निवासस्थानाचं बांधकाम करतानाच करून ठेवण्यात आली होती, असा किस्साही सांगितला जातो.
चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्वात महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टीचा अनोख मिलापही दिसून येतो. राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेले विक्रमसिंह पाटणकर हे पाटण राजघराण्यातील सदस्य. चाकूरकर हे राज्यपाल असताना पाटणकर हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाटणकर हे मंत्री नव्हते. शालीन स्वभावाच्या चाकूरकरांनी पाटणकर यांचा सन्मान राखला, परत जाताना ते पाटणकर यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत आले. चाकूरकरांच्या विचारांची उंची आणि वेगळंपण यातून अधोरेखित होतं. स्वतः एकेक पायरी चढत असताना चाकूरकरांनी कार्यकर्त्यांनाही घडवलं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन दिलं होतं. विरोधकांवर टीका करताना चाकूरकर यांनी शालीनता कधीही बाजूला सारली नाही, भाषेची मर्यादा कधीही ओलांडली नाही.
शिवराज पाटील चाकूरकर मृदुभाषी आणि विचारी स्वभावाचे आहेत. ते शिस्तप्रिय आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात शिष्टाचार पाळण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. घटनात्मक पदावर असतानाही त्यांनी आपल्या व्यवसायातील सिनियर अॅड. पाटील यांचा त्यांनी मान राखला. अॅड. पाटील यांना भेटायचं असेल तर ते त्यांना कॉल करून वेळ घेऊन त्यांच्या घरी जात असंत. केंद्रीय मंत्री व राज्यपाल पदावर असतानाही त्यांनी हा शिरस्ता पाळला. ज्या सहकार्यांसोबत काम केलं, त्या सर्वांशी ते आजही मैत्रभाव ठेवून आहेत.
माध्यमांपासून थोडे दूर राहणारे चाकूरकर अनेकदा माध्यमांशी दिलखुलास व मोकळेपणानं बोलतातही. त्यातून प्रसिद्धीऐवजी सकारात्मक चर्चा व्हावी, समस्यांचे निराकरण व्हावं, अशी त्यांची अपेक्षा असते. सध्या राजकारण वेगळ्याच वाटेवर गेलं आहे. एकमेकांचा मान-सन्मान राखणं या दूरच्या बाबी झाल्या आहेत. मंत्रिपदावर असलेले नेतेही बेताल विधाने करत आहेत. अशा वातावरणात शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या नेत्यांकडे पाहिलं की समाजमनाला दिलासा मिळतो. राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर चाकूरकर हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.