
रेखा गुप्ता बंगला वाद: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 60 लाखांची निविदा काढण्यात आली असून, यामध्ये AC, स्मार्ट टीव्ही, दिवे, सीसीटीव्ही आणि इतर इंटिरिअर फिटिंगचा समावेश आहे.
विरोधकांचा हल्लाबोल: 'आप' आणि काँग्रेसने या खर्चावर टीका करत गुप्ता यांचा बंगला 'माया महल' असल्याचे म्हटले असून, दिल्लीकर सामान्य नागरिकांना पाणीटंचाई, महागाई व वीजकपात यांचा सामना करावा लागत असताना असा खर्च योग्य नसल्याचा सवाल उपस्थित केला आहे.
केजरीवाल प्रकरणाची तुलना: भाजपने पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या 45 कोटींच्या नूतनीकरणावर टीका केली होती; आता त्याचप्रमाणे विरोधक भाजपवर हल्ला करत आहेत.
CM Rekha Gupta's Bungalow To Get ₹60 Lakh Makeover: भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावरुन रान उठवलं होतं. कोटवधी रुपयांचा चुराडा करुन केजरीवाल 'शीशमहल'बांधत असल्याचा आरोप करुन भाजपनं त्यांची कोंडी केली होती. तसाच प्रकार आता दिल्लीच्या भाजप मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी बंगल्याच्या नुतनीकरणावर झाला आहे. आपच्या नेत्यांना भाजपवर तुटून पडण्यासाठी नवीन मुद्दा मिळाला आहे.
रेखा गुप्ता यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढलं आहे. यातील खर्चाच्या आकड्यावरुन नजर फिरवली तर आश्चर्य वाटेल. अशीच ही आकडेवारी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. हे टेंडर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बांधकामासाठी नव्हे, तर नूतनीकरणासाठी काढण्यात आले आहे. त्यासाठी पीडब्ल्यूडीने ६० लाख रुपयांची निविदा काढली आहे. दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्षाबरोबरच आम आदमी पक्ष (आप) तसेच काँग्रेसनेही यावरून मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना घेरले आहे. 'आप'ने रेखा गुप्ता यांच्या बंगल्याला 'माया महल'असे म्हटलं आहे.
प्रशासनाने रेखा गुप्ता यांना दोन बंगले दिले आहेत. त्यापैकी बंगला क्रमांक एकच्या नूतनीकरणासाठी टेंडर काढले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता स्वत: राहणार आहेत. दुसरा बंगला क्रमांक २ मध्ये त्यांचे कार्यालय आहे. बंगला क्रमांक १ मध्ये पूर्वी दिल्लीच्या नायब राज्यपालांचे कार्यालय होते. त्यामुळे बंगल्यातील खोल्या वेगवेगळ्या केबिनमध्ये विभागण्यात आल्या होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी क्युबिकल तयार करता यावे, यासाठी प्रत्येक खोलीची दोन-तीन विभागात विभागणी केली होती. रेखा गुप्ता यांनी काही दिवसापूर्वी या बंगल्याची निवड केली असून त्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी ६० लाख रुपयांची निविदा काढली आहे. यात कोणतेही बांधकाम करायचे नाही. फक्त इलेक्ट्रिकल आणि इंटिरिअर फिटिंगचे काम करायचे आहे. हा बंगला टाइप-७ बंगला असल्याचे वृत्त आहे. यामध्ये चार बेडरूम, ड्रॉइंग रूम, बिझनेस हॉल, कॉमन हॉल, अभ्यागतांसाठी अभ्यागत हॉल, घरातील मदतनीसांसाठी खोली, बाथरूम, मोठे लॉन, किचन आणि घराच्या मागील बाजूस मागील अंगण यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्याची निविदा काढली आहे. येथे दोन टनक्षमतेचे १४ एसी बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय पाच स्मार्ट टीव्ही बसवले जाणार आहेत. त्यासाठी ९.३ लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय ६ लाख ३ हजार रुपयांचे दिवे बसविण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी बंगल्यात १४ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ लाख ७३ हजार रुपयांची तरतूद केली आहे. दुसरीकडे, बंगल्यात 23 प्रीमियम सीलिंग पंखे असतील. त्यावर सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय १६ वॉल फॅन असणार आहेत. बंगल्यात अखंडित वीजपुरवठ्यासाठी दोन लाख रुपये खर्चून यूपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री बंगल्यात 115 सजावटीचे दिवे लावण्यात येणार आहेत. यामध्ये वॉल लाईट, हँगिंग लाईट यांचा समावेश असेल. यासाठी ६.०३ लाख रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय गरम पाण्याचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी ९१ हजार रुपये खर्चून बंगल्यात सहा गिझर बसविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री बंगल्याच्या नुतनीकरणावरुन आप आणि काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. रेखा गुप्ता या आपल्या 'मायामहल'मध्ये सरकारी कोट्यवधी रुपये खर्च करुन नूतनीकरण करीत आहेत. या मायामहल'मध्ये लाखो रुपयांचे एसी, टीव्ही आणि दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे. दुसरीकडे दिल्लीकरांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशी टीका आपने केली आहे.
खासगी शाळांची वाढती फी, वीजकपात, पाणीटंचाई, राजधानीतील वाढती गुन्हेगारी, महागाई आणि बेरोजगारी प्रत्येक दिल्लीकराला सतावत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे नुतनीकरण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आपच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही यावर जोरदार टीका केली आहे.
केजरीवाल यांच्या बंगल्यातील पडद्यांवर तब्बल ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय टीव्ही कंसोलवर २०.३४ लाख रुपये. ट्रेडमिल आणि जिम उपकरणांवर १८.५२ लाख रुपये. सिल्क कार्पेटवर १६.२७ लाख रुपये. संगमरवरावर ६६ लाख ८९ हजार रुपये तर घराच्या फरशी व भिंतीवरील टाइल्सवर १४ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता.
याशिवाय केजरीवाल यांच्या बंगल्यातील कला आणि सजावटीवर ५.०७ कोटी रुपये, डिझायनर डेकोरेशनवर ४८.२७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. संगमरवरावरील एकूण खर्च १ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर मॉड्युलर किचनवर ६८ लाख ७५ हजार रुपये खर्च केल्याचा दावा कॅगच्या अहवालात करण्यात आला होता.
Q1. रेखा गुप्ता यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी किती खर्च केला जाणार आहे?
A1. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 60 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
Q2. विरोधकांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
A2. 'आप' आणि काँग्रेसने हा खर्च अनावश्यक असून जनतेच्या अडचणींमध्ये हा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
Q3. केजरीवाल यांच्या बंगल्यावर किती खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता?
A3. केजरीवाल यांच्या बंगल्याच्या सजावटीवर सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा झाला होता.
Q4. बंगल्यात कोणते प्रमुख बदल करण्यात येणार आहेत?
A4. बंगल्यात एसी, स्मार्ट टीव्ही, सीसीटीव्ही, गिझर, सजावटीचे दिवे आणि यूपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.