पंढरपूर : पंढरपूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करण्यास विसरले होते, त्या फडणवीस यांचा उल्लेख देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माझे मित्र असा केला. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे ज्यांना विसरले, ते फडणवीस पंतप्रधानांचे मित्र निघाले, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. (Prime Minister Narendra Modi referred to Devendra Fadnavis as my friend)
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन सोमवारी (ता. ८ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषण केले. ते ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाषणाला सुरुवातीला त्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोशियारी, व्यासापीठावरील मान्यवर, वारकरी संप्रदायातील साधू संत. बंधू आणि भगिनींनो असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे नाव विसरल्याचे लक्षात येताच, ‘सॉरी, देवेंद्रजी तुमचं नावं घ्यायचं राहिलं,’ असं म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते, आमचे सहकारी देवेंद्रजी, असा उल्लेख मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांचा केला.
दरम्यान, शेवटी भाषण करणारे पंतप्रधान मोदी यांनी व्यासापीठावरील मान्यवरांसह ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांची नावे घेतली. मुख्यमंत्री ठाकरे ज्यांना विसरले होते, त्या देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधानांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माझे मित्र असा केला. त्यामुळे ठाकरे यांचे विसरणे आणि पंतप्रधानांनी माझे मित्र म्हणून फडणवीसांचा उल्लेख करणे, याची चर्चा कार्यक्रमास्थळी रंगली होती.
दरम्यान, आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या कामात आम्ही केंद्र सरकारबरोबर आहोत, असा शब्दही त्यांनी नितीन गडकरी यांना दिला.
पंढरपूरचा पालखी सोहळा म्हणजे भक्तीचा सागर असतो. सर्व नद्या जशा समुद्राला जाऊन मिळता, त्याप्रमाणे सर्व संतांच्या पालख्या ह्या पंढरपुरात येत असतात. पालखी सोहळ्यात पायी चालण्याचाही आनंद मी घेतला आहे. देहभान हरपून चालणे, हे मी स्वतः अनुभवले आहे. भक्ती मार्गाने आपल्या देशाने वाटचाल करावी, यासाठी पुढाकार घेतला आहे, तो सुकर होण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला आहे, असेही ठाकरे म्हणाले.
वारकारी संप्रदायाने आपल्याला दिशा दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य दिले आहे. परकीय अतिक्रमणांशी लढण्यासाठी शक्ती दिली आहे. या संप्रदायाचे ऋण आपण उतरवू शकत नाही. पालखी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सरकार या कामाात केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करेल, असे आश्वासनही ठाकरे यांनी या वेळी बोलताना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.