Vikhe Patil's visit to Uttam Jankar's house Sarkarnama
विशेष

Solapur Politic's : मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक, राष्ट्रवादी नेत्याच्या घरी विखे पाटलांची भेट; मोहिते पाटील, सातपुते मैदानावरच रेंगाळले

पालखी मार्गाची पाहणी करत असतानाच विखे पाटील यांनी राजकीय गाठीभेटी घेतल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखी मार्गाची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. ही पालखी मार्गाची पाहणी करत असतानाच विखे पाटील यांनी राजकीय गाठीभेटी घेतल्या आहेत. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते. मोहिते पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक जानकरांची भाजपच्या मंत्र्याने घेतलेली भेट चर्चेची ठरली आहे. (Radhakrishna Vikhe Patil's visit to NCP leader Uttam Jankar's house)

संतांच्या पालख्यांनी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. तत्पूर्वी या पालखी मार्गावरील अडथळे, समस्या, पालखी मुक्कामाच्या ठिकाणाच्या सोयी सुविधांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आढावा घेण्यासाठी दौरा केला. सासवड, जेजुरी, बारामती, इंदापूरमधील पालखी मार्गाची पाहणी करत विखे पाटील हे माळशिरसमध्ये आले होते. माळशिरसमधील वेळापूर येथील पालखी मैदानाची त्यांनी पाहणी केली.

वेळापूरच्या मैदानाची पाहणी केल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Sinh Naik Nimbalkar) यांनी विखे पाटील यांना आपल्या जुन्या मित्राच्या म्हणजे उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी गरुड बंगल्यावर नेले. त्यांच्यासोबत माणचे भाजप (BJP) आमदार जयकुमार गोरेही गेले होते. त्यांच्यामध्ये चर्चा काय झाली, याचा तपशील मात्र समजू शकला नाही. मात्र खासदार निंबाळकर यांना आपल्या जुन्या मित्राला पुन्हा भाजपत आणायचं आहे, त्यादृष्टीने निंबाळकर यांनी प्रयत्न चालवले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

इकडे अर्जूनसिंह मोहिते पाटील (Mohite Patil), आमदार राम सातपुते, भाजपचे के. के. पाटील हे मात्र मैदानावरच थांबून होते. त्यामुळे विखे पाटील यांनी जानकर यांच्या घरी दिलेल्या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीगाठीच्या माध्यमातून निंबाळकर यांनी लोकसभेची पेरणी सुरू केल्याची चर्चा आहे. खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात किती सख्य आहे, हे जगजाहीर आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे मोहिते पाटीलही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांत नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातून खासदार निंबाळकर कट्टर मोहिते पाटील विरोधकांशी संधान साधण्याचा प्रयत्न चालवला आहे.

माढ्यात त्यांनी आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांच्यात सहमतीचे राजकारण सुरू आहे. आता माळशिरसमध्ये त्यांनी उत्तम जानकर यांच्याशी मैत्री वाढवली आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांच्याकडील मताची भरपाई करण्याचा प्रयत्न खासदार निंबाळकर यांनी सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT