Sarkarnama
विशेष

Samajwadi Party News : महाराष्ट्रात 'सप'ची 'सायकल' धावणार की पंक्चर होणार?

Samajwadi Party and Maharashtra Vidhan Sabha Election : 2024च्या लोकसभेला उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची 'सायकल' अशी जोरात धावली की 37 सायकलस्वार उमेदवारांनी थेट दिल्लीच गाठली. आता या पक्षानं आपल्या सायकलची 'सर्व्हिसिंग' करून तिला महाराष्ट्र विधानसभेच्या शर्यतीत उतरवायला सज्ज ठेवलीये.

Sandeep Chavan

1995 ते 2019 : महाराष्ट्रात 'सायकल' किती धावली?

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंह यादव यांनी 1992 रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि 'सप'नं पहिल्यांदाच 1995 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली. 22 उमेदवारांनी 'सायकल'वर टांग मारत शर्यतीत भाग घेतला. त्यापैकी 03 जणांनी ही शर्यत जिंकली.

मोहमद खान (भिवंडी), सुहेल लोखंडवाला (नागपाडा) आणि बशीर पटेल (उमरखाडी) हे तिघे पहिल्यांदाच आमदार बनले तर नवाब मलिक यांचा नेहरूनगर मतदारसंघात पराभव झाला. 1999 ला 'सप'नं 15 जागा लढवल्या. त्यापैकी 02 जण निवडून आले. नेहरूनगरमधून नवाब मलिक तर उमरखाडी येथून पुन्हा एकदा बशीर पटेल!

आजमी दोन ठिकाणी लढले, दोन्ही जागा जिंकले!

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे मुखिया (प्रदेशाध्यक्ष) अबू आजमी 2002 ला राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 2004 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा (VidhanSabha Election)निवडणूक लागली. 'सप'नं आजमी यांच्या नेतृत्वात तब्बल 95 जागा लढवल्या पण सगळ्यांच्या सायकली 'पंक्चर' झाल्या. अबू आजमींचाही तत्कालीन भिवंडी मतदारसंघात पराभव झाला. 2008 पर्यंत आजमी राज्यसभा खासदार राहिले. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा निवडणूक लागली.

'सप'नं यावेळी 31 जागा लढवल्या. अबू आजमी यांनी नव्यानं पुनर्रचना झालेल्या मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघांत एकाच वेळी निवडणूक लढवली आणि या दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले. त्यांच्यासह भिवंडी पश्चिममधून अब्दुल मोमीन आणि नवापूर (नंदुरबार जिल्हा) येथून शरद गावितही आमदार बनले. या निवडणुकीत 'सप'नं 04 जागा जिंकल्या. 1995 ते 2019 अखेर 'सप'नं जिंकलेल्या जागांचा हा सर्वाधिक आकडा आहे.

मलिक 'सायकल'वरून उतरले, हाती 'घड्याळ' बांधले! -

दरम्यानच्या काळात नवाब मलिक(Nawab Malik) यांनी 'सप'ची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 'सायकल'वरून खाली उतरून 'घड्याळ' हाती बांधलेले नवाब मलिक 2009 च्या निवडणुकीत अणुशक्ती नगर मतदारसंघातून आमदार झाले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला पण 2019 मध्ये ते पुन्हा आमदार बनले. राष्ट्रवादी फुटीनंतर मलिक आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत.

आजमी पुन्हा दोन जागी 'सायकल'वर स्वार, एका जागी हार!

2014 च्या निवडणुकीत सप'नं 22 जागा लढवल्या पण त्यांचा एकच उमेदवार निवडून आला आणि ते म्हणजे अबू आजमी! आजमी यांनी 2009 च्या निवडणुकीचा पॅटर्न पुन्हा एकदा 2014 च्या निवडणुकीत राबवला. ते एकाच वेळी मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या दोन मतदारसंघांत उभे राहिले. मात्र, यावेळी त्यांना मानखुर्द शिवाजीनगरमध्ये विजय मिळाला आणि भिवंडी पूर्वमध्ये हार! 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढून पाहिली पण काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी त्यांचा भिवंडी मतदारसंघात पराभव केला.

अबू आजमी यांची आमदारकीची हॅटट्रिक!

2019 च्या निवडणुकीत 'सप'नं(Samajwadi Party) 07 जागा लढवल्या. त्यापैकी 02 जिंकल्या. मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आजमी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक साधली तर भिवंडी पूर्वमधून रईस शेख आमदार बनले.

यूपी में हुई जीत हमारी, अब है महाराष्ट्र की बारी!

समाजवादी पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून आगामी निवडणुकीत किमान 12 जागांवर निवडणूक लढवण्याचा समाजवादी पक्षाचा विचार आहे. रावेर आणि अमरावती या दोन जागांसह मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, भिवंडी मध्य, मालेगाव मध्य, भायखळा, वर्सोवा, धुळे शहर, औरंगाबाद पूर्व, अणुशक्तीनगर आणि कारंजा अशा 12 मतदारसंघांची मागणी आघाडीकडं करण्यात आली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 'सप'नं 07 जागांची मागणी करूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं फक्त मानखुर्द शिवाजी नगर, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व या 03 जागा देऊ केल्या होत्या. अखेर आघाडीत न सामील होता 'सप'नं 07 जागांवर निवडणूक लढवलीच आणि 02 जागांवर विजय मिळवला. 'सप'चे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघांची यादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडं सुपूर्द केली आहे. 'यूपी में हुई जीत हमारी, अब है महाराष्ट्र की बारी,' असा नारा देत अबू आजमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचा विश्वास दिला आहे.

एकूणच काय तर सध्या एकूण खासदारांची संख्या पाहाता भाजप आणि काँग्रेसनंतर समाजवादी पक्ष हा देशातील तिसरा सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. उत्तर प्रदेशात लोकसभेला मिळालेलं यश आपल्याला महाराष्ट्रातही विजय मिळवून देईल, या आशेवर 'सप'नं आपल्या सायकलींची 'सर्व्हिसिंग' करून ठेवली आहे. अर्थात, 'सप'च्या 'सायकल'स्वारांना विधानसभेची शर्यत जिंकून देण्यात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष किती मदत करणार यावर ठरणार, महाराष्ट्रात 'सप'ची 'सायकल' धावणार की पंक्चर होणार?

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT