Anil Desai-Sanjay Pawar Sarkarnama
विशेष

शिवसेनेकडून संजय पवारांची उमेदवारी पक्की?; अनिल देसाईंनी केली कागदपत्रांची तपासणी

कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे मुंबईत शिवालय येथे दाखल झाले आहेत. पवार आल्यानंतर शिवसेना सचिव अनिल देसाईही शिवालयात दाखल झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी शिवसेना (Shivsena) पुरस्कृत उमेदवारीस नकार दिल्यानंतर शिवसेनेने आपले पत्ते ओपन करत कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay Pawar) यांना राज्यसभेची (Rajya sabha) उमेदवारी दिली आहे. संजय पवार हे मुंबईत शिवालय येथे दाखल झाले असून शिवसेना सचिव अनिल देसाई (Anil Desai) त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत, त्यामुळे संजय पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट आहे. आता संभाजीराजेंच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Sanjay Pawar's candidature from Shiv Sena confirmed ?; Anil Desai examined the documents)

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार भाजपच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार सहज जिंकू शकतात. पण सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कारण, संभाजीराजे छत्रपती यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच शिवसेनेने दिलेला प्रस्ताव संभाजीराजे यांनी धुडकावल्याने शिवसेनेने सहावी जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंऐवजी कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे मुंबईत शिवालय येथे दाखल झाले आहेत. पवार आल्यानंतर शिवसेना सचिव अनिल देसाईही शिवालयात दाखल झाले आहेत. संजय पवार यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असल्याने अनिल देसाई आणि संजय पवार यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या संजय पवार यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आली आहे. स्वतः अनिल देसाई हे संजय पवार यांची कागदपत्रे तपासात आहेत. त्यामुळे संजय पवार यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संभाजीराजे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला पाठिंबा शिवसेना उमेदवाराला अगोदरच जाहीर केलेला आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या पुढे आता भाजप एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. पण, मागील अनुभव पाहता भाजप संभाजीराजेंना जवळ करणार का?, असा प्रश्न आहे.

भाजप डाव साधणार?

महाराष्ट्रातील सहापैकी दोन जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र, तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना-संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र' वापरण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच, तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू आहे. भाजपचे राज्यातील नेतृत्व म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याबाबतचा ‘अंतिम' निर्णय घेणार आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT