Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
विशेष

Satyajeet Tambe News: ‘आमदार होणारच; पण मामांच्या मतदारसंघातून नाही...’

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विधानसभेची (Assembly) २०२४ ची निवडणूक मी शंभर टक्के लढणार आहे. कुठून लढायचं याचा निर्णय आमचे काँग्रेस (Congress) पक्षश्रेष्ठी, माझे सहकारी, कार्यकर्ते आणि इतर पक्षातील माझे मित्र ठरवतील, त्यानुसार मी निवडणूक (Election) लढवणार आहे. एक मात्र खरं आहे की, मी मामांच्या मतदारसंघातून म्हणजे संगमनेरमधून (Sangamner) निवडणूक लढवणार नाही, असे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्पष्ट केले. (Satyajeet Tambe will contest the 2024 assembly elections)

मी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नगर शहरात लक्ष घातले नाही. कारण, नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड आणि नगर शहर हे दोन मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र, उमेदवार नव्हता. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. ज्यावेळी मला श्रेष्ठींनी विचारले की तुम्हाला कुठून लढायचे आहे, त्यावेळी नगर शहराचा पर्याय सांगितला. त्यामुळे ती २०१४ ची विधानसभा निवडणूक नगर शहरातून लढलो. पण, त्या मतदारसंघातून मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही २०१४ मध्ये काही महिन्यांपुरती तुटली होती, त्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो होतो. त्यामुळे मित्रपक्षाच्या आमदाराबरोबर संघर्ष करणं योग्य वाटलं नाही. तसाही नगर शहराचा आणि आमचा संबंध, संपर्क फारसा नव्हता. त्या २०१४ च्या निवडणुकीच्या संदर्भानेच माझा नगर शहराशी संपर्क आलेला होता.

विधानसभेत रस

मला विधानसभेत काम करण्यात रस आहे. लोकसभा अथवा विधान परिषदेत मला जायचे नाही. मी राज्यपातळीवर काम करतो, त्यामुळे मला विधानसभेत काम करायला आवडेल. पण त्या त्या वेळी परिस्थिती कशी निर्माण होते. ते पाहून निर्णय घेतला जाईल. कारण, राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे मी त्यावर आताच बोलणार नाही. याउपरही सांगतो की चांगलं काम करण्यासाठी आमदार खासदार झालं पाहिजे असं काही नाही.

संगमनेर मतदारसंघाचा प्रश्नच येत नाही

माझे नेतेमंडळी, सहकारी, आजूबाजूचे लोक, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून मतदारसंघाबाबतचा निर्णय होईल. माझ्यासारखा माणूस विधानसभा, विधान परिषदेत असला पाहिजे, अशी या लोकांची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठी आणि इतर पक्षातील माझे मित्र जे ठरवतील, त्याप्रमाणे मी करणार आहे. पण, आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे. संगमनेर मतदारसंघाचा तर प्रश्नच येत नाही. कारण, तो माझ्या मामांचा मतदारसंघ आहे. भाच्यानं विधानसभेची निवडणूक लढवावी, असं मामांना वाटणं वेगळं आहे. पण, माझी स्वतःची तशी अजिबात इच्छा नाही. माझ्याकडून ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे.

मामांचा इंटरेस्ट पहिला...

आमच्या तांबे परिवाराने ठरवलं आहे की, मामांचा जो इंटरेस्ट आहे, तो पहिला प्रोटेक्ट करायचा. त्यानंतर आपलं राजकारण करायचं, असे आमचं ठरलं आहे. शिर्डी मतदारसंघासाठी मी २००९ मध्ये इच्छूक होतो. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. कारण संगमनेरमधील २९ गावं शिर्डी मतदारसंघात गेली होती. माझ्या जन्मगावासह संगमनेर तालुक्यातील तब्बल ६० हजार मतदार शिर्डी मतदारसंघात गेले होते. माझं मूळगाव आणि मामांचं गावही शिर्डीत गेलं होतं. त्यामुळे सर्वांची तशी अपेक्षा हेाती. पण, राजकारणात सतत बदल होत असतो, त्यामुळे आता शिर्डीची परिस्थिती तशी आहे, असे मला वाटत नाही.

वेळ आल्यावर नगर शहराच्या विकासात योगदान देणार

नगर शहराच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत, त्या येथील लोकप्रतिनिधी पार पाडत आहेत. नगर शहरातील उड्डाणपुलासाठी आम्हीही प्रयत्न केले. ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ते वेगळे सांगण्याची आम्हाला गरज नाही. नगर शहरातील प्रश्न आणि त्यावरील उपायही मला माहिती आहेत. त्यामुळे वेळ आल्यानंतर मी त्यात योगदानही देणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT