Sharad Pawar Sarkarnama
विशेष

पुण्यात आलोय अन्‌ ‘जमां’ची भेट झाली नाही, असं कधी होत नव्हतं : पवारांनी जागविल्या सहकाऱ्याच्या आठवणी

ज. मा. मोरे यांनी शेवटपर्यंत आपली साथ सोडली नाही

मनोहर चांदणे

निमगाव केतकी (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यात आल्यानंतर ज. मा. मोरे आणि माझी भेट झाली नाही, असं कधी होत नव्हतं. काम असो अथवा नसो, येऊन दोन शब्द बोलून जाणे, असं आमच्यात चालत होते. राजकारणात काळानुरुप बदल होत गेले. मात्र ज. मा. यांनी शेवटपर्यंत आपली साथ सोडली नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. (Sharad Pawar did Consolation to J. M. More's family)

शरद पवार यांचे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील अत्यंत जवळचे  व विश्वासू सहकारी ज. मा. मोरे यांचे बुधवारी (ता. ६ आक्टोबर) निधन झाले. पवार यांनी  ट्विट करीत दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर  गुरूवारी (ता. ७ आक्टोबर) पवार हे  निमगाव केतकी येथे मोरे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या मैत्रीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला.

 पवार म्हणाले की, साधारणतः मी १९६२-६३ पासून पुणे जिल्ह्यात लहान मोठ्या पदावर काम करीत आलो. ज्यावेळी मी पहिल्यांदा विधानसभेसाठी उभा राहिलो. निवडून आलो, त्यानंतर इंदापूर पंचायत समितीची जबाबदारी ही ‘जमां’च्या खांद्यावर सोपवली. लासुर्णेचे बाबासाहेब पाटील उपसभापती, तर ज. मा. मोरे हे सभापती हे दोघे इंदापूर तालुक्यात काम करत असत. त्यानंतच्या काळात राजकारणात बदल झाले. पण, त्या बदलामध्येही त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही. मी नवीन पक्ष काढला. इंदापुरात तो पक्ष उभा करायची जबाबदारी, ही बाबासाहेब यांच्यावर होती, तर जिल्ह्याची जबाबदारी ही ज. मा. मोरे यांच्यावर सोपवली होती. मला आठवतंय त्यावेळच्या निवडणुकीमध्ये सगळ्या मोठ्यांचा आम्हाला विरोध असतानासुध्दा जिल्ह्यातून जवळपास ९ आमदार निवडून आले. ज. मा. यांना काय त्यावेळी यश आलं नाही. मात्र, संघटना म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.

घरातील व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबावर आघात झालेला असतो, तो काय लवकर भरुन निघत नसतो. हा केवळ मोरे कुटुंबावर नव्हे; तर आपल्या सर्वांवर तो आघात झाला आहे. यातून सावरण्याची सर्वांना शक्ती मिळो, अशा शब्दांत पवार यांनी मोरे कुटुंबीयांना धीर दिला.

या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची  भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी माजी सभापती प्रवीण माने, उद्योजक उत्तमराव फडतरे,  बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, पुण्याचे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, उपसरपंच सचिन चांदणे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, नागनाथ पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोरे कुटुंबीय उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT