BJP-Shivsena and Congress Sarkarnama
विशेष

Vidhan Sabha Election : शिवसेना-भाजपची पहिल्यांदाच युती, काँग्रेस पुन्हा सत्तेत!

1990 Maharashtra Assembly Election : 1990 च्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना-भाजप यांची झालेली युती. या दोन्ही पक्षांची ही पहिलीच एकत्रित विधानसभा निवडणूक! या निवडणुकीत युती विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत पाहायला मिळाली.

Sandeep Chavan

Maharashtra Politics and Vidhan Sabha Election : 1990 च्या विधानसभा निवडणुकीत 35 पक्ष आणि 2286 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले. काँग्रेसनं 276 जागा लढवल्या तर विधानसभेला पहिल्यांदाच युती करून लढलेल्या शिवसेना-भाजपनं अनुक्रमे 183 आणि 104 जागा लढवल्या. विधानसभेला ताकदीनिशी उतरलेल्या जनता दलानं पहिल्यांदाच तब्बल 214 जागा स्वबळावर लढल्या आणि सुरू झाला विधानसभा 1990 चा रणसंग्राम...

141 जागा जिंकून काँग्रेस ठरला नंबर एकचा पक्ष! -

अखेर निकाल लागला आणि 141 जागा जिंकून काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला. युतीनं देखील थोड्या-थोडक्या नव्हे तर 94 जागा जिंकल्या. शिवसेनेचे 52 तर भाजपचे(BJP) 42 उमेदवार निवडून आले. जनता दलानं 214 पैकी 24 जागा जिंकल्या. 122 जागा लढूनही बसपला खातं काही खोलता आलं नाही. दूरदर्शी पक्षानं तर 182 जागा लढवल्या पण हाती काही लागलं नाही.

शिवसेनेनं पहिल्यांदाच गाठला दोन अंकी आकडा!-

1980 मध्ये शिवसेनेनं(Shivsena) विधानसभा निवडणूकच लढवली नव्हती. 1985 मध्ये 01, 1978 मध्ये 08 तर 1972 मध्ये 01 अशा एक अंकी आकड्यावर अडकलेल्या शिवसेनेनं या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच दोन अंकी आकडा गाठला. शिवसेनेचे 52 उमेदवार निवडून आले. त्यामुळं भाजपसोबत युती केल्याचा शिवसेनेला फायदाच झाला.

25 पक्षांच्या हाती भोपळा; 13 अपक्ष बनले आमदार -

तब्बल 2286 अपक्षांनी निवडणूक लढवली त्यातले 13 जण आमदार बनले मात्र 1985 च्या तुलनेत हा आकडा घटला. 1985 मध्ये 20 अपक्ष आमदार बनले होते. या निवडणुकीत 35 पक्षांपैकी केवळ 10 पक्षांना जागा जिंकता आल्या. उर्वरित 25 पक्षांना भोपळाही फोडता आला नाही.

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या, लढवलेल्या जागा -

शेकाप - विजयी - 08 - लढवलेल्या जागा - 40

माकप - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 13

भाकप - विजयी - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 16

भारतीय काँग्रेस (समाजवादी - सरतचंद्र सिन्हा) - विजयी- 01 - लढवलेल्या जागा - 71

इंडियन युनियन मुस्लिम लीग - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 09

रिपाइं (खोब्रागडे) - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 18

काँग्रेस पुन्हा सत्तेत; सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री -

1990 च्या निवडणुकीत काँग्रेस(Congress) पुन्हा एकदा सत्तेवर आली आणि सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. पण त्यांना काही आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पडली आणि त्या घटनेचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. त्यामुळं त्याच दरम्यान केंद्रात पी. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री असलेल्या शरद पवारांना महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यासाठी 6 मार्च 1993 रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घ्यावी लागली.

पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक : 1985

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT