Shiv Sena faces twin controversies—MLA Sanjay Gaikwad assaults a canteen worker while Sanjay Shirsat's cash bag video raises ethical questions. Sarkarnama
विशेष

Shivsena News : एकनाथ शिंदेंना अडचणीत आणणारे दोन नेते... दोघेही 'संजय' अन् दोघेही 'बनियनवर'

Shivsena News : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहणा करून आणि शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगसोबत व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत.

Hrishikesh Nalagune

Shivsena News : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात सर्वत्र चर्चा सुरु आहे ती शिवसेनेची आणि शिवसेनेच्या दोन बनियनवरील नेत्यांची. या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत टाकले आहे. दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. विशेष म्हणजे या दोघांचेही नाव संजय आहे आणि या दोघांचेही बनियनवरचे व्हिडीओ कमालीचे व्हायरल होत आहेत.

पहिले आहेत संजय गायकवाड. 8 जुलै रोजी संजय गायकवाड आकाशवाणी आमदार निवासातील खोलीत मुक्कामी होते. रात्री आमदार महोदयांनी जेवण मागवले. पण ते म्हणे खूपच खराब होते. मग काय, गायकवाड यांची सटकली अन् ते बनियन, टॉवेलवरच ते थेट कॅन्टिनमध्ये गेले. दिलेलं जेवण दाखवून कर्मचाऱ्यावर ओरडायला सुरुवात केली. मग शिवीगाळ सुरु झाली.

एका क्षणाला गायकवाड यांना राग एवढा अनावर झाला की त्यांनी थेट कॅन्टिन चालकाच्या श्रीमुखात लगावली. या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि टीका सुरु झाली. पण गायकवाड साहेबांना याची आजही कोणती खंत नाही. उलट, मला सगळा कायदा माहिती आहे, काय होईल? एनसी दाखल होईल. कितीही गुन्हे दाखल होऊ दे, आय डोन्ट केअर असा गायकवाड यांचा अॅटिट्यूड कायम आहे.

या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांना वाचविण्यासाठी शिवसेनेकडूनही जोरदार प्रयत्न झाल्याचे दिसून आले होते. दोन दिवसांपासून आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरु होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून इतर आमदारांनी केवळ ही मारहाण चुकीचे असल्याचे म्हणत आपण गायकवाड यांच्यासोबत बोललो असल्याचे सांगितले होते.

अधिवेशन काळात अधिकारी, कर्मचारी आणि आमदार यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आहार समिती काम करते. या आहार समितीकडे जेवणाची व्यवस्था करण्यापासून तक्रार आणि कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार असतात. या समितीचे अध्यक्षपद सध्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर आहेत. पण या समितीने आमदार गायकवाड यांची तक्रार करण्याबाबत पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले.

अशात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही अद्याप तक्रार आलेली नाही. त्यामुळे गुन्हाही दाखल झाला नसल्याचे सांगितले. "अद्याप तक्रारच आलेली नाही आहे. तक्रार आली तर गुन्हा दाखल होईल. विधिमंडळाच्या आवारात ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी पण हेच सांगितलं आहे. मात्र तक्रारच दाखल नाही झाली. तक्रार झाली तर गुन्हा दाखल होईल असे कदम यांनी म्हंटले होते.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा खोटा ठरवला. "चौकशीसाठी कुणी तक्रार करायलाच हवी असे नाही. पोलीस स्वतः चौकशी करू शकतात आणि ते नक्की योग्य कारवाई करतील, यात फोर्स किती अप्लाई केला आहे हे ही पाहिले जाईल, असे म्हणत कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर अखेर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

बनियनवरील दुसरे नेते आहेत, संजय शिरसाट.

सामाजिक न्यायमंत्री असलेल्या शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते बनियनवर असून आरामात बेडवर बसून सिगारेट ओढताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आपलाच असल्याचं खुद्द शिरसाट यांनीही मान्य केलं आहे.

संजय शिरसाट यांना नुकतीच प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. 5 वर्षांत तुमची संपत्ती एवढी कशी काय वाढली? असे विचारत त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांनी मुदत वाढवून घेतली आहे. अशात पैशांसह त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पण शिरसाट यांनी हे पैसे नाही तर कपडे असल्याचे सांगितले आहे.

व्हिडिओत माझं घर आणि मी बेडरुममध्ये बनियनवर बसलेलो आहे. माझ्याजवळ माझा लाडका कुत्रा आहे, एक बॅग तिथं ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलो आहे. कपडे काढले आहेत आणि माझ्या बेडवर मी बसलेलो आहे. अरे मूर्खांनो एवढी मोठी बॅग जर पैशांची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या सगळ्या काढून टाकल्यात काय?

नोटा असतील तर त्या आल्याबरोबर मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असत्या. पण कपड्याच्या बॅगेला सुद्धा यांना नोटा दिसतात. यांना पैशांशिवाय काय दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे हे विमानातून खाली उतरुन त्यांचे बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तर त्यातही पैसे असल्याचं हे सांगत होते. यांना कपडे ठेवायला बॅगा लागत नाहीतर पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदर यांचं वर्तन आहे, असं म्हणत त्यांनी ते पैसे नसल्याचे म्हंटले आहे.

संजय शिरसाट यांनी फक्त याच व्हिडीओमुळे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणले असे नाही. काल (10 जुलै) संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस प्राप्त झाल्याची बातमी आली. याबाबत माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी नोटीस आल्याने मान्य केले. पण सोबतच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचा गौप्यस्फोट केला. चूक लक्षात येताच त्यांनी यावरून घुमजावही केला. पण जे नुकसान व्हायचे ते झाले होते.

आता देखील शिरसाट यांच्या बॅगमध्ये पैसेच होते की कपडे हे यथावकाश समोर येईलच. पण सध्या तरी संजय गायकवाड यांचा 'मुक्का' आणि 'चापटी' एकनाथ शिंदे यांना 'तु्म्ही कशा लोकांना आमदारकीची उमेदवारी दिली? असा सवाल विचारत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऐन अधिवेशन काळात काढलेला हा व्हिडीओरुपी बॉम्बही एकनाथ शिंदे यांना चांगलाच घायाळ करू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT