Shiv Sena Marathwada history : वर्ष 1985. रझाकारांच्या अन्याय, अत्याचाराने पीडित जनता, एका विशिष्ट समाजाचा प्रभाव, राजकीय नेत्यांकडून मतांसाठी होणारे लांगूनचालन अशा वातावरणात 'शिवसेना' संघटनेची मराठवाड्यात एन्ट्री झाली.
ज्वलंत हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचे गारूड तेव्हाच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरवर पसरले. त्यानंतर काही वर्षांतच शिवसेनेला महापालिकेची सत्ता मिळाली. तेव्हापासून 41 वर्षात या शहरातील हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. नेमकी शिवसेनेची संभाजीनगर आणि एकूणच मराठवाड्यात कशी एन्ट्री झाली? मुंबई, ठाण्यात वाढलेला पक्ष मराठवाड्यात कसा विस्तारला?
स्वातंत्र्यापासूनच औरंगाबादवर काँग्रेस, जनता दल आणि डाव्या विचारांचा प्रभाव दिसत होता. मुस्लिम (Muslim) वोट बँकेच्या राजकारणातून काँग्रेसने या समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व द्यायला सुरूवात केली. 1970-80 च्या काळात औरंगाबादच्या राजकारणावर मुस्लिम नेत्यांची छाप होती. त्या काळात जॉर्डनचे विद्यार्थीही शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत यायचे. हे विद्यार्थी मुस्लिम भागात राहायचे आणि तिथल्या हिंदूना त्रास द्यायचे.
औरंगाबादमध्ये सातत्याने महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार घडायचे. शहागंज बाजारपेठेत भाजीपाला, धान्य घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची लूटमार व्हायची. मालाची नासधूस आणि मारहाणच्याही तक्रारी होत्या. या सगळ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणारा कोणीच नव्हता. सत्ताधारी लोकप्रतिनिधीही त्याच समाजाचे असल्याने कायद्याचा धाक नव्हता. त्याचवेळी मुंबई, ठाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा डंका आणि प्रभाव वाढला होता. 'अरेला कारे' ची हिंमत हिंदूमध्ये आणण्याचे काम बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने केले. ठाकरेंची भाषणं, मार्मिकमधील व्यगंचित्र, मुंबईहून 2 दिवस उशीराने येणारा सामना वृत्तपत्राचा अंक यांचे सामुहिक वाचन असे वातावरण हिंदू भागातून सुरू झाले.
बाळासाहेबांचे भाषण, त्यांची आक्रमक शैली, मुस्लिमांना थेट आव्हान देण्याची पद्धत याने इथेल तरूण भारावून गेले. यातूनच भारावलेल्या चार-पाच तरुणांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरवले. ही संघटना औरंगाबादेत हवीच, या निर्धाराने शहरातील सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी मुंबई गाठली. मुंबईला गेलेल्या हिंदू तरूणांनी आम्हाला औरंगाबादेत शिवसेना स्थापन करायची आहे, अशी गळ घातली. या तरुणांना 'शिवसेना' कशासाठी हवी आहे? याची माहिती बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. त्यांनी त्याक्षणी शिवसेनेचा मराठवाड्यातील विस्तार औरंगाबादमधून करण्याचा निर्णय घेतला. पण मुस्लिमांचे वर्चस्व, त्याला काँग्रेसचे नेते आणि सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे पाठबळ पाहता एका हिंदुत्ववादी आणि त्याही जहाल विचारसरणीच्या संघटनेला इथे शाखा सुरू करणे इतके सोपे नव्हते.
पण इथल्या हिंदू जनतेला बाळासाहेब ठाकरे यांनी सुरक्षेचा आणि सेवेचा विश्वास दिला आणि शिवसेनेने 1985 मध्ये मराठवाड्यात पहिले पाऊल टाकले. शहराचे हृदय स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमंडीमध्ये शिवसेनेच्या शाखेची पहिली पाटी लागली. पहिली शाखा स्थापन झाल्यानंतर स्थानिक शिव सैनिकांनी संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. रोजच्या बैठका होऊ लागल्या. लोकांचे प्रश्न आणि मुस्लिमांची दहशत, त्यापासून हिंदूंचे रक्षण कसे करायचे? यावर विचार मंथन व्हायचे. प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी अत्यंत सुपीक अशा मराठवाड्याच्या जमिनीत पेरणी करणे राजकीय दृष्ट्या मोठे पाऊल ठरणार होते. बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईतील नेत्यांना याची चांगलीच जाणीव झाली होती. यामुळे मुंबईतील नेत्यांच्याही औरंगाबादेत चकरा वाढल्या.
यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच समान नागरी कायद्याची मागणी करत मोर्चा काढण्याचे ठरले. या मोर्चाला मुंबईतील नेत्यांनी हजेरी लावत मोठी वातावरण निर्मिती केली. हा मोर्चा सिटी चौक भागात आल्यानंतर तिथे मुस्लिमांकडून दगडफेक करण्यात आली. एका प्रार्थनास्थळातून दगड विटांचा अक्षरशः वर्षाव झाला. एकच गोंधळ उडाला, अनेकांची डोकी फुटली. शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. हा मोर्चा आणि त्यावर झालेली दगडफेक यातून शिवसेनेचा औरंगाबाद येथील पाया भक्कमपणे रोवला गेला.
हिंदूंमध्ये शिवसेनेच्या या मोर्चानंतर हिम्मत आली. 'अरे ला का रे' ची भाषा सुरू झाली. शिवसेना आणि शिवसैनिकच आता हिंदूंचे रक्षण करू शकतात हा विश्वास या दंगलीने नागरिकांच्या मनात निर्माण केला. 3 वर्षांनी म्हणजेच 1988 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय मुंबईतून झाला. औरंगाबाद बुक डेपो येथे किशनचंद तनवाणी यांच्या इमारतीतील एका खोलीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.
12 एप्रिल 1988 रोजी संध्याकाळी औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जाहीर सभा झाली. त्यादिवशी त्यांच्या धडधडणाऱ्या तोफेतून त्यादिवशी अक्षरश: आग निघत होती. त्यांच्या सभेला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेस आणि मुस्लिम समाजाला लक्ष करून शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादकरांची मनी जिंकली. ही सभा शहराच्या आणि संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली.
महापालिका निवडणुकीआधी औरंगाबादेत शिवसेनेच्या स्थापनेमुळे वातावरण तापले होते. मुस्लिम मोहल्ल्यांमधून शिवसेनेला रोखण्याची रणनीती आखली जात होती. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी चालून आली. बोगस मतदानाचे प्रकार आणि ते उघड झाल्यानंतर शहरात जातीय दंगल उसळली. चाकू हल्याचे प्रकार घडले. त्यात अनेकजण जखमी झाले. या चित्राने वातावरण स्फोटक झाले. पण याच स्फोटक वातावरणाने हिंदू मतदारांनी एकगठ्ठा मतं शिवसेनेच्या पारड्यात टाकली.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेने 48 जागा लढवल्या. पहिल्याच फटक्यात यातील तब्बल 27 जागा निवडून आणत प्रस्थापित राजकीय पक्षांना झटका दिला. मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेला सर्वात मोठे यश औरंगाबादमध्ये मिळाले. 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर महापालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर बसणार हे स्पष्ट होते. औरंगाबाद मध्ये सातत्याने आमदार, खासदार आणि नगराध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे असायचे. हिंदूंना अनेक महत्त्वांच्या पदावर डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली होती.
शिवसेनेच्या विजयानंतर शहराला हिंदू महापौर मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी औरंगाबादची जबाबदारी असलेली काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांनी संभाव्य धोका ओळखत खेळी केली. काँग्रेसकडून महापौर म्हणून हिंदू समाजाच्या शांताराम काळे यांना संधी देण्या आली. पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेची महापौर बसवण्याची संधी हुकली. पुढे मोरेश्वर सावे यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला महापौर खुर्चीवर बसला आणि महापालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकला.
औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला मिळालेले यश हे बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या भाषणाचे मानले जाते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, 'आमच्या न्याय हक्कावर गदा आल्याने शिवसेनेला जन्माला यावे लागले आणि व्यंगचित्रकाराला शिवसेनाप्रमुख बनावे लागले. महाराष्ट्रात नवी पिढी उभी केली ती शिवसेनेने, ती ना यशवंतरावांनी घडवली ना वसंतरावांनी. मी जो विचार मांडतोय तो चुकीचा असेल तर मला त्यांनी पटवून द्यावे. मला ते पटले तर मी पटवून देणाऱ्याच्या समोर लोटांगण घालेल.
मला लोकशाही मान्य नाही हे अगदीच खरे आहे. आमची तुमची जी लोकशाही आहे ती मला मान्य नाही. राजाने जनतेला समोर जावे असे मानणाऱ्यातला मी आहे. उद्या महाराष्ट्रात आमचे राज्य आले आणि लोक मोर्चा घेऊन मंत्रालयावर आले तर तो मोर्चा पोलीस अडवणार नाहीत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उतरून शिवसेनेचा मुख्यमंत्री मोर्चाला सामोरे जाईल. त्यांना विचारेल की बाबांनो आमचे काय चुकले? की तुम्ही मोर्चा घेऊन इथपर्यंत आलात.
हा देश हिंदुत्वाचा आहे. मुस्लिमांचा पाकिस्तान आणि हिंदूंचा हिंदुस्थान या तत्त्वावर देशाची फाळणी झाली आहे. तेव्हा हा देश हिंदूंचा आहे असे म्हणण्यात चुकले कुठे? लाज ती कोणती? हिंदुस्थानच्या पराभव झाला मग तो क्रिकेटमध्ये का असेना त्याचे या मुसलमानांना दुःख वाटते. ज्यांना पराभवाचे वाईट वाटेल तोच या देशातील म्हणायला पाहिजे. ज्याला आनंद होईल, ते तिकडचे. आम्हाला वाईट याचे वाटते की गावस्करने शतक ठोकले तर त्यांना दुःख होते. पण तो शून्यावर उडाला तर त्यांना आनंद होतो. आम्हाला या देशात असे चालणार नाही, आम्ही ते कदापी खपवून घेणार नाही. यासाठी कुणी आम्हाला जातीयवादी म्हटले तर ते खुशाल म्हणू देत.
शंकरराव चव्हाण शिवसेनेवर दंगली केल्याचा आरोप करतात, आमचे म्हणणे असे आहे की शिवसेनेमुळे दंगली थांबतात, आम्हाला दंगली नको आहेत. मुसलमानांनी या देशात भारतीय म्हणून राहावे, धर्माच्या नावाखाली मस्तवालपणा करीत असतील तर ते आम्ही चालू देणार नाही. आज खलिस्थानवादी आणि पाकधार्जिन्या मुस्लिमांपासून धोका आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेबांनी औरंगाबादकरांच्या मनाला हात घातला होता.
औरंगाबाद महापालिकेत दैदीप्यमान यश मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी जनतेचे आभार मानण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाडा संस्कृत मंडळावर विजयी सभा झाली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी साष्टांग दंडवत घालत औरंगाबादकरांचे आभार मानले. या सभेत शहराला त्या 'औरंग्याचे' नाव कशाला? असे म्हणत आजपासून या शहराचे नाव 'संभाजीनगर' अशी घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी याच सभेतून केली. नंतर हे नाव अधिकृत होण्यासाठी 32 वर्ष वाट पहावी लागली.
शिवसेनेच्या औरंगाबाद आणि मराठवाड्यातील वाढीला शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये झालेले विलीनीकरणही कारणीभूत ठरले होते. हे खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात मान्य केले आहे. 1984 नंतर देशात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यात प्रामुख्याने राजीव गांधी यांचे राजकीय सल्लागार अरुण नेहरू यांनी महत्वाची भूमिका निभावली.
औरंगाबादेतच समाजवादी काँग्रेसचे मुख्य पक्षात विलिनीकरणाचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. औरंगाबादचीच निवड का? तर अरूण नेहरू यांच्या मते, शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आज काँग्रेस विरोध म्हणून शरद पवारांसोबत असणारा मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित होईल. शरद पवारांचा हा प्रवेश शिवसेनेच्या मराठवाड्यात पाय रोवण्यास कारणीभूत ठरेल, ही भीती तेव्हा व्यक्त करण्यात आली होती.
अरुण नेहरू हे उत्तम विश्लेषक असल्याने शरद पवारांनी प्रथमत: मराठवाडा पिंजून काढण्याचं मनावर घेतलं. त्यांनी मराठवाड्यातला प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव पिंजून काढलं. संवाद साधला आणि काँग्रेस प्रवेशाबद्दलच वातावरण तापवलं. ते योग्य असल्याचं लोकांमध्ये जावून पटवून देण्यास सुरूवात केली. यामुळेच पवारांनी औरंगाबाद इथे 6 ते 8 डिसेंबर 1986 रोजी सलग तीन दिवस मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विलिनीकरणाचा कार्यक्रम घेतला. पाच लाख लोकांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत हे विलिनीकरण पार पडले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी या सोहळ्याला उपस्थित होते.
पण शरद पवारांचा हा प्रवेश खरंच शिवसेनेला मराठवाड्यात पाय रोवण्यास मदत करणारा ठरला का? याबद्दल त्यांनी स्वतःच सांगितले की, "पक्षाच्या विलीनिकरणानंतर मी परभणीला गेलो होतो. तिथे जयप्रकाश मुंदडा कुठे आहेत? याची चौकशी केली. जयप्रकाश मुंदडा हे समाजवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पण आत्ता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली. याबाबत मुंदडा यांना कारण विचारलं तेव्हा मुंदडा म्हणाले, आमचं राजकारण इथल्या प्रस्थापितांना विरोध केल्यामुळे उभं राहिलं. आत्ता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो तर आमच्या संपूर्ण राजकारणाचा इतिश्री होईल, असं स्पष्ट केलं. मराठवाड्यात जागोजागी असेच घडले, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेला प्रचंड यश देणाऱ्या या शहरात काही कडू गोड आठवणीही आहेत. 1990 मध्ये औरंगाबाद शिवसेनेत पहिले बंड झाले. चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवरून तत्कालीन जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे बंड करण्यात आले. यात प्रदीप जयस्वाल, अशोक चोटलानी, मोहन पालीवाल, रमेश छापरवाल, विठ्ठल पेरकर, मोतीराम घडामोडे, लता दलाल, दत्ता पाथ्रीकर, संजय शिरसाट, नंदू देवतवाल, भाऊसाहेब निकम आदी प्रमुख मंडळी सहभागी होती.
औरंगाबाद विधानसभेसाठी शिवसेनेकडून तत्कालीन नेते मनोहर जोशी हे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलामध्ये या मुलाखती झाल्या. जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांच्यासह लता दलाल, अशोक चोटलानी व इतर नगरसेवक उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु मनोहर जोशी यांनी आमदारकीसाठी नगरसेवकांचा विचार केला जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांच्या इच्छा मात्र पल्लवित झाल्या आणि आमदरकीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा त्यांना ठाम विश्वास होता.
तेव्हा नगरसेवक आणि शहरप्रमुख असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी खासदार मोरेश्वर सावे यांच्याकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली. सावे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे मातोश्रीवर वजन होते. त्यांनी खैरे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. नगरसेवकाचा उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही, असे मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले होते, मग खैरेंना उमेदवारी कशी? यावरून पक्षात बंडाचा भडका उडाला. बाळासाहेबांनी खैरे यांची उमेदवारी रद्द करून अशोक चोटलानी यांचे नाव जाहीर केले. पुन्हा खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आणि बाळासाहेबांनी अशोक चोटलानी यांना शहरप्रमुख करत पुन्हा खैरेंना उमेदवारी जाहीर केली.
खैरे निवडून आल्यानंतर जेव्हा बाळासाहेबांची औरंगाबादेत सभा झाली तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या सुभाष पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली असती पण काही काळी मांजर आडवी गेली, असा टोला लगावला होता. 1991 मध्ये सुभाष पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुन्हा राज्यात 95 मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली आणि सुभाष पाटील पुन्हा शिवसेनेत आले.
1998 मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रायभान जाधव यांचे निधन झाले आणि पोटनिवडणूक लागली. तेव्हा शिवसेनेने सुभाष पाटील यांना उमेदवारी दिली, पण सहानुभूतीच्या लाटेमुळे तेजस्वीनी जाधव या आमदार झाल्या आणि पाटलांचा पराभव झाला. त्यानंतरच्या कन्नड तालुक्यातीलच एका जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी सुभाष पाटील यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत त्यांचे बंड शिवसेनेच्या विरोधात नव्हते तर सावेशाहीच्या विरोधात होते, असे म्हणत क्लीन चीट दिली होती.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचा जम बसल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शेजारच्या जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर असा सगळा मराठवाडा पिंजून काढत शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी दौरे केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींपासून ते विधानसभा, लोकसभा अशा सगळ्याच निवडणुका शिवसेना मराठवाड्यात लढली. दुष्काळी भाग, रजाकरांच्या राजवटीत अन्याय अत्याचार भोगलेल्या मराठवाड्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम शिवसेनेने केले.
मराठवाड्यात शिवसेना ज्या झपाट्याने वाढत होती, तो वेग पाहता काँग्रेस आणि शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसने मोठा धसका घेतला होता. 1952 ते 84 पर्यंत औरंगाबादवर काँग्रेस पक्षाची मजबूत पकड होती. सुरेश चंद्रा, स्वामी रामानंद तीर्थ, भाऊराव देशमुख, माणिकराव पालोदकर, बापू काळदाते, काझी सलीम, समाजवादी काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावंकर यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिल्लीत केले. पण 1989 मध्ये मशाल चिन्हावर मोरेश्वर सावे यांच्या रुपाने शिवसेनेचा मराठवाड्यातील पहिला खासदार निवडून आला. त्यानंतर प्रदीप जैस्वाल, पुन्हा काँग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटील यांची एक टर्म झाली. त्यानंतर चंद्रकांत खैरे सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या पण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांवर याचा फार कमी काळ प्रभाव राहिला. 2019 मध्ये मात्र शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्याविरोधातील नाराजीचा फटका बसला आणि इथे चक्क एमआयएमचा महाराष्ट्रातील पहिला खासदार निवडून आला.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या बंडाला संभाजीनगरमधून मोठा पाठिंबा मिळाला. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार असे सगळे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे लोकसभेला निवडून आले. विधानसभेलाही एकनाथ शिंदे यांच्या मराठवाड्यातून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या चार जिल्हा परिषदांवर भाजपचे अध्यक्ष विराजमान झाले आहेत.
पण कधीकाळी मुस्लीम राज्यकर्त्यांनी राज्य केलेल्या मराठवाड्यावर शिवसेनेच्या आगमनाने हिंदूचा प्रभाव निर्माण झाला. आता सत्तेचा हा लोलक आक्रमक हिंदुत्ववादाचे राजकारण करणाऱ्या भाजपकडे झुकू पाहतो आहे. सध्याच्या घडीला शिवसेना विरुद्ध भाजप या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच सत्तासंघर्ष बघायला मिळत आहे. आगामी काळात संभाजीनगर शहर, जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातील राजकारण आणखी कसे बदलणार? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.