Uday Samant
Uday Samant Sarkarnama
विशेष

‘ठाकरेंना चार दिवस विनवणी केली, अखेर पाचव्या दिवशी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला’

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : गुवाहाटीला जातानाही मी काही मागच्या दाराने गेलो नाही. बंडानंतर चार दिवस राज्यात थांबलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चार दिवस सांगत होतो. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासारखा चांगला माणूस शिवसेना (Shivsena) सोडून जात आहे, त्यांना थांबवलं पाहिजे, अशी चार दिवसं ठाकरे यांना विनवणी करत होतो. पाचव्या दिवशी मी स्वतः सांगितलं की, साहेब आपण कोणी जोडण्याचं काम करत नाहीत. शिंदे यांच्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यांच्यासभोवती असणाऱ्या लोकांनी शिंदेंना ठाकरे यांच्या जवळ येऊ दिले नाही; म्हणून मलादेखील गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. (...so decided to go to Guwahati on the fifth day : Uday Samant)

रत्नागिरी येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात उद्योगमंत्री सामंत बोलत होते. त्यावेळी त्यांनी गुवाहाटीला जाण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. सामंत म्हणाले की, मी चार दिवस उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना थांबविण्यासाठी विनंती करत होतो. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य, रिक्षावाला होते. त्यांनीच शिवसेना वाढवली. आनंद दिघे यांचं नाव वाढवलं. अशा माणसाला साहेब थांबवलं पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांना विनवणी केली. पण त्यांच्या सभोवती असणाऱ्या लोकांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे मी पाचव्या दिवशी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला.

गुवहाटीला जाताना मी कळपाने गेलो नाही, मी त्या पन्नासात गेलो नाही, मी रत्नागिरीचा आमदार आहे. गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो. पण जे काही प्रसंग घडले, तो नंतरचा विषय आहे. पण, रत्नागिरीचा विकास करणे, रत्नागिरीमधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे, ही उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी आहे. अजूनपर्यंत पालकमंत्रिपद जाहीर झालेलं नाही. ते उद्या किंवा परवा जाहीर होईल. रत्नागिरीचा पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याला निधीची कमी पडू दिली जाणार नाही. तसेच, दहीहंडीसारखे कार्यक्रम पुढच्या काळात यापेक्षा मोठे करू, असे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT