Sanjay Rathod, Dada Bhuse, Tanaji Sawant
Sanjay Rathod, Dada Bhuse, Tanaji Sawant Sarkarnama
विशेष

Bazar Samiti Results : शिंदेंच्या मंत्र्यांना धक्का; भुसे, राठोड अ्न सावंतांचा करेक्ट कार्यक्रम; ठाकरेंची खेळी यशस्वी

Amol Jaybhaye

Market Committee Election Results : राज्यातील १४७ बाजार समित्यांचा निकाल जाहिर होत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. विशेष, शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे. तीन मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील बाजार समितीच्या निवडणुकीत धक्का बसला आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत जाहीर झालेल्या पहिल्या अकरा जागांपैकी दहा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर मात केली आहे. शिंदे गटाला हा जबर धक्का मानला जात आहे. भुसे यांची १५ वर्षे या समितीत सत्ता होती. हिरे यांनी नुकताच भाजपमधून (BJP) ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरे यांनी मालेगावमध्ये जाहिर सभाही घेतील होती.

हिरे यांच्या आप्तस्वकीयांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत सुडाचे राजकारण रंगल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती. या निकालाचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भुसे विरोधकांना उत्साहवर्धक ठरेल, असे सांगितले जात आहे.

त्याच बरोबर मंत्री संजय राठोड यांनाही मोठा धक्का बसला आहे. दिग्रस ही जिल्ह्यात प्रतिष्ठेची बाजार समिती आहे. या निवडणुकीत माजी मंत्री संजय देशमुख व विद्यमान मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. काल (ता. २८ एप्रिल) झालेल्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्या पॅनलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे.

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रसच्या १८ संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरची मतमोजणी काल सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. या निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवारासह शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडीचे १८ उमेदवार तर पालकमंत्री संजय राठोड यांच्या शेतकरी विकास आघाडीचे १८ उमेदवार अशा एकूण ३७ उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. त्यामध्ये ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी विजय मिळवला. दादा भुसे आणि संजय राठोड यांच्या मतदार संघात ठाकरेंनी खेळी करत हिरे आणि देशमुख यांना पक्षात घेऊन मंत्र्यांना धक्का दिला आहे.

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती (Bazar Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार बबनराव शिंदे (baban Shinde) आणि आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास आघाडीने सर्व सतरा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार शिंदे बंधूंच्या नेतृत्वाखालील कुर्डूवाडी बाजार समितीतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि माढा लोकसभा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल मैदानात उतरले होते. मात्र, शिंदे बंधूंनी एकहाती बाजार समिती जिंकत पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. आमदार शिंदे बंधूंच्या गटाची एक जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आलेली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT