Ajit Pawar News
Ajit Pawar News Sarkarnama
विशेष

Ajit Pawar News : अजित पवारांवर आघाडीचे आमदार नाराज? जयंत पाटलांच्या प्रकरणात...

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : दिशा सालियन प्रकरणावरून आज हिवाळी अधिवेशनामध्ये गोंधळ झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्ष असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना पहायला मिळाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना काय हा निर्लज्जपणा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, यावरुन अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला.

त्यामुळे जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली नाही, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांमध्ये आहे. त्यामुळे पवार यांच्यावर महाविकास आघाडीचे आमदार नाराज, असल्याचे विधिमंडळाच्या परिसरामध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.

अजित पवार आक्रमक भूमिका घेत नसल्याने आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. जयंत पाटील यांच्या विषयावरून सरकारवर सडकून टीका करायची असे ठरलेले असताना पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली, असा आरोप आघाडीचे आमदार करत आहेत. सीमावाद असो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील भूखंड विषय असो, या बाबत अजित पवार आक्रमक भूमिका घेत नसल्याची चर्चा महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये आहे.

विरोधकांकडे शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी चांगले विषय असतानाही पहिले दोन दिवस ते बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण समोर आले. त्या प्रकरणावरुनही सरकारला अडचणीत आण्याचा विरोधकांचा प्रयत्न फडणवीसांनी हाणून पाडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भूखंड घोटाळ्याचा विषय लावून धरला. मात्र, तोही प्रभावीपणे झाला नाही, असे आमदार खाजगीत बोलत आहेत. त्यामुळे आता पुढील काळात आघाडी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेत, दिशाच्या आई-वडीलांपासून ते पूजा चव्हाण प्रकरणापर्यंतचा संदर्भ दिला.

त्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भातील भूमिका मांडताना फडणवीस यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री होतो, अशी आठवण करुन देत या प्रकरणावरुन राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. तसेच दिशाच्या आई वडिलांचे पत्रच पवार यांनी वाचून दाखवले. त्यानंतर पवारांनी शिंदे गटातील आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशीही केली पाहिजे अशीही मागणी केली.

दिशाच्या आई-वडिलांचे पत्र वाचून दाखवताना अजित पवार म्हणाले, त्या राष्ट्रपती महोदयांनाही भेटल्या आहेत. एखादे आई-वडील पोटतिडकीने सांगत आहे. स्वत:च्या पोटचा जीव गमावल्यानंतर सांगत आहे. तिने आत्महत्या केली हे सीबीआयकडून आलेलेले आहे. तसेच पुढे अजित पवार यांनी थेट चौकशी करायची ठरले तर सगळ्याच प्रकरणाची करावी लागेल, अशा इशाराही दिला. असे म्हणत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला. मात्र, यावर आघाडीच्या आमदारांचे समाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT