Mumbai, 13 July : केंद्रात आणि राज्यात कट्टर विरोधकांचे सरकार, बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला भाजप, बंडानंतर रोजच विरोधात भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उरलेसुरले सर्व विरोधक एकत्र झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीत हार न म्हणता एकाकी किल्ला लढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या नाकावर टिच्चून मिलिंद नार्वेकर यांना हातात पुरेशी मतं नसतानाही निवडून आणले. महायुतीचे नऊ उमेदवार जिंकण्यापेक्षा ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा विजय जास्त झोंबणारा असू शकतो.
विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. अशी चर्चा होती की, शरद पवार यांचा सल्ला झुगारून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना बारावा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं होतं. तसेही शिवसेनेच्या हाती केवळ 15 आमदार होते. दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता, त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री नसतानाही उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली आणि कमाल करून दाखवली.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे 37, शिवसेनेकडे 15, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 12 आमदार होते. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्या रुपाने एकच उमेदवार दिला होता. त्यामुळे काँग्रेसकडे तब्बल 14 मते शिल्लक राहत होती. काँग्रेसची ती शिल्लक मते नार्वेकर यांच्याकडे वळविण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंपुढे होते.
मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची ठरलेली रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्धव ठाकरे भल्या सकाळीच विधान भवनात दाखल झाले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तालनात बसून नार्वेकर यांच्यासाठी ठाकरेंनी सूत्रे हलवली. शिवसेनेच्या दुपारपर्यंतच्या हालचाली पाहता नार्वेकर यांच्या विजयाची शक्यता जास्त वाटत होती.
काँग्रेसची जी मते फुटतील, अशी चर्चा होती, त्या आमदारांशी ठाकरेंनी ‘वन टू वन’ चर्चा केली आणि ती मते नार्वेकर यांच्याकडे कशी येतील, याची तजबीज केली, त्यामुळेच पहिल्या पसंतीची नार्वेकर यांनी तब्बल 22 मते मिळवली म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी शिवसेनेचे 15 अधिक एक अपक्ष अशा 16 मते होती. त्याव्यतिरिक्त नार्वेकर यांना अधिकची सहा मते मिळाली होती. आता ही सहा मते नेमकी कोणाची, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण, या निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याची चर्चा आहे.
राज्य आणि देशात भाजप उद्धव ठाकरेंच्या विरोधात चावताळून उठलेला असताना उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना पुढे करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विरोधात भलेही सर्वपक्षीय संबंध असलेल्या नार्वेकरांना ठाकरेंनी निवडून आणले असले तरी विधान परिषदेच्या निवडणुकी उद्धव ठाकरेंची रणनीती भारी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.