Dinvishesh 16 October Sarkarnama
विशेष

17th October In History : उत्तर प्रदेश राष्ट्रपती राजवटीच्या सावटाखाली

सरकारनामा ब्यूरो

Dinvishesh: १९८० आणि १९९० चे दशक उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचे मोठे प्रस्थ होते. १९९५, १९९७, २००२ आणि २००७ अशा चार वेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या.

मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या त्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचे सरकार पाडून. पण मुख्यमंत्री पदाची खुर्ची मायावती यांना लाभली नाही. भाजपने केलेल्या खेळीमुळे जेमतेम साडेचार महिन्यांत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मायावती यांनी मुलायमसिंग यादव यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. पण नंतर बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्षात टोकाचे मतभेद निर्माण झाले. १९९५ च्या जूनच्या पहिल्या आठवड्यात बहुजन समाज पक्षाने मुलायमसिंग यादव यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी मुलायमसिंग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तत्कालीन राज्यपाल मोतीलाल व्होरा यांनी त्यांचे सरकार बडतर्फ केले.

त्यानंतर भाजपने मायावती यांना बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या आधारे ३ जून १९९५ रोजी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यावेळी बहुमत सिद्ध करण्याबाबत यादव यांच्या गटाचे धनीराम वर्मा यांनी विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने घेतलेल्या निर्णयाने घटनात्मक पेच निर्माण झाला होता. अखेरीस बहुजन समाज पक्ष आणि भाजपने संख्याबळाच्या जोरावर धनीराम वर्मा यांना पदावरुन हटवले आणि मायावतींचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा केला.

मात्र, वेगवेगळ्या विचार सरणीचे दोन पक्ष एक नांदणे शक्यच नव्हते. मायावतींना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद होते. ते वाढत गेले. अखेर तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष कलराज मिश्र यांनी आजच्याच दिवशी म्हणजे १७ आॅक्टोबर, १९९५ या दिवशी मायावती सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

दिनविशेष - 17 ऑक्‍टोबर

1831 ः मायकेल फॅरेडेद्वारा विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या गुणधर्माचा सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध.1892 ः रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचा सासवड येथे जन्म. पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत त्यांनी अनेक संस्था व उद्योग उभे केले. 1932 मध्ये शेतकऱ्यांचा पहिला साखर कारखाना सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ग्रामीण भागात यंत्राचा वापर, ऊस, नवीन संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. 1933 मध्ये रावसाहेब, 1946 मध्ये रावबहादूर हे किताब त्यांना देण्यात आले. शेती आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला होता.

1956 ः अणुशक्तीवर वीज निर्माण करण्याच्या जगातील पहिल्या अणुभट्टीचे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते उद्‌घाटन.

1959 ः अमेरिकन सेनापती व मुत्सद्दी जनरल मार्शल यांचे निधन. महायुद्धानंतर युरोप व जपान फेरउभारणीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांची योजना "मार्शल योजना' म्हणून ओळखली जाते.

1962 ः मुंबईचे दानशूर उद्योगपती, केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद सर कावसजी जहांगीर यांचे निधन.

1966 ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमातंट्यासाठी न्या. मेहेरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नियुक्ती.

1979- मदर तेरेसा यांना नोबेल शांती पुरस्कार जाहीर

1992 - आझाद हिंद सेनेचे ज्येष्ठ नेते कर्नल पी. के. सैगल यांचे निधन

1994 ः पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

1996 ः ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्य प्रदेश सरकारचा "कालिदास सन्मान' जाहीर.

1998 ः आंध्र प्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणाऱ्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

2003 ः भारताच्या अत्याधुनिक आणि सर्वांत वजनदार "रिसोर्ससॅट - 1' या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरून सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. "पीएसएलव्ही- सी 5' या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाने या उपग्रहाला अंतराळात सोडले. "रिसोर्ससॅट- 1' हा उपग्रह 1360 किलो वजनाचा असून, त्याला अंतराळात नेणारा वाहक 294 टन वजनाचा होता. चार टप्प्यांचा वाहक 44.4 मीटर लांबीचा होता व त्याने उड्डाणानंतर 17 मिनिटांनी या उपग्रहाला पृथ्वीपासून 817 किलोमीटर उंचीवरील सौरकक्षेत सोडले.

2003 ः मलेशियातील "पेट्रन टॉवर्स' या इमारतीला मागे टाकणाऱ्या जगातील सर्वांत उंच इमारतीचे तैपेई शहरात उद्‌घाटन करण्यात आले. 101 मजल्यांची ही इमारत 508 मीटर (1667 फूट) उंच असून, "पेट्रन टॉवर्स'पेक्षा ती 452 मीटरने उंच आहे.

२०१४ ः भारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘निर्भय’ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT