Maharashtra Assembly Election 1978 : आणीबाणीनंतरच्या विरोधामुळं इंदिरा गांधींचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्षात फूट पडली. 'इंदिरा गांधीनिष्ठ' आणि 'काँग्रेस पक्षनिष्ठ' असे दोन गट पडले. देशपातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब उमटलं. काँग्रेसचे दोन गट झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार आदी नेते यांची रेड्डी काँग्रेस तर नासिकराव तुरपुडे आदी नेत्यांची इंदिरा काँग्रेस.
या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस(Congress) एकमेकांविरुद्ध लढले तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन झालेला जनता पक्ष पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरला. रेड्डी काँग्रेसनं रिपब्लिकन गवई गटासोबत तर इंदिरा काँग्रेसनं शिवसेनेशी युती केली. जनता पक्षानं शेकाप, माकप, रिपाइं (कांबळे गट), नाग विदर्भ समिती आणि मुस्लिम लीग (बंडखोर गट) यांच्याशी हातमिळवणी केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 288 जागांसाठी निवडणूक लागली. 12 पक्ष आणि 894 अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आणि सुरू झाला विधानसभा 1978 चा रणसंग्राम...
आणीबाणीचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसाच तो रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 99 जागा जिंकून जनता पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला. इंदिरा काँग्रेसला 62, रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. या निवडणुकीत 09 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 03 पक्षांना भोपळाही फोडता आला नाही. या 03 पक्षांमध्ये शिवसेनेचाही समावेश होता. 894 पैकी 28 अपक्ष निवडून आले.
1972 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या 05 नं वाढली. कोणत्याही एका पक्षाला बहुमत नं मिळाल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. या निवडणुकीत जनता पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला खरा पण निवडणुकीपूर्वी स्वतंत्र लढलेल्या दोन्ही काँग्रेस निवडणुकीनंतर एकत्र आल्या आणि सत्ता स्थापन केली. त्यामुळं 'पक्ष सर्वांत मोठा पण सरकार स्थापनेचा मिळाला नाही मोका,' असं काहीसं जनता पक्षाचं झालं.
शेकाप - विजयी - 13 - लढवलेल्या जागा - 88
माकप - विजयी - 09 - लढवलेल्या जागा - 12
भाकप - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 48
रिपाइं - विजयी -02 - लढवलेल्या जागा - 25
रिपाइं (खोब्रागडे) - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 23
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 06
सत्तेसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथमच संयुक्त सरकार स्थापन झालं. 7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तर इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार(Sharad Pawar) उद्योगमंत्री बनले. पुढं तिरपुडे आणि रेड्डी काँग्रेस गटातला कलह सरकार पडण्याला कारणीभूत ठरला. 1978 च्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडले. सरकार अल्पमतात आल्यानं वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामा दिला.
परिणामी, महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यांतच कोसळलं. वसंतदादा सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी 'समाजवादी काँग्रेस'ची स्थापना केली आणि जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी युती करून पुरोगामी लोकशाही दला (पुलोद) ची सत्ता आणली. 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी शरद पवार यांनी राज्याचं नेतृत्व स्वीकारल्यानं सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची नोंद झाली जो विक्रम आजही अबाधित आहे.
एकूणच काय तर 1978 च्या निवडणुकीनंतर काय घडलं तर जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं, दोन्ही काँग्रेस एकत्र येऊनही आघाडी सरकार कोसळलं आणि शरद पवारांचं 'पुलोद' सरकार सत्तेत आलं. अर्थात, हे सरकारही अल्पकाळापुरतं ठरलं कारण तिकडं केंद्रात पुढल्याच वर्षी म्हणजे 1979 ला केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी महाराष्ट्रातलं 'पुलोद' सरकार बरखास्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.
(पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक 1972)
Edited by - Mayur Ratnaparkhe
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.