मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा महाराष्ट्र दौरा विविध कारणांनी गाजतो आहे. शिवसेनेकडून होणाऱ्या टिकेला ते तितक्याच आक्रमकतेने उत्तरे देत आहेत. अबोल समजले जाणारे मुख्यमंत्री हे व्यासपीठावर गेल्यानंतर कमी शब्दांत कमाल परिणाम करण्याच्या प्रयत्नात असतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत Sanjay Raut) यांनी `सामना`ला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना शिंदे यांनी आपणही कच्च्या गुरूचे चेले नसल्याचे दाखवून दिले. आपण मुलाखत दिल्यानंतर भूकंप होईल. आनंद दिघे यांच्याबाबत काय घडले, याचे आपण साक्षीदार आहोत, असे सांगत खळबळ उडवून दिली. धर्मवीर चित्रपटात जे दाखवले ते थोडेच होते, असेही सांगण्यास त्यांनी कमी केले नाही. (Eknath Shinde challenges Uddhav Thackeray)
आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणूनच शिंदे यांचा राजकीय प्रवास झाला. दिघे आणि ठाकरे यांच्यामध्ये काही कारणांवरून मतभेद होते. दिघे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. ठाण्यातील सिंघानिया रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी आले नाहीत, अशी खंत त्यांच्या समर्थकांना होती. उद्धव ठाकरे हे सुद्धा रुग्णालयात उशिराने पोहेचले होते. त्यात दिघे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना अकस्मात मृत्यू झाला. या धक्क्याने चिडलेल्या शिवसैनिकांनी रुग्णालयात जाळपोळ सुरू केली होती.
त्यानंतर नेहमीप्रमाणे कुजबूज ब्रिगेड सुरू राहिली. त्यावरून अनेक प्रवाद आहेत. दिघे यांची प्रकृती सुधारत होती, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. मग अचानक त्यांचा मृत्यू कसा झाला, यावर चर्चा झडू लागल्या. मातोश्री आणि दिघे यांचे संबंध कसे तणावाचे होते, यावरून मग अनेक तर्क बांधण्यात येऊ लागले. त्यातीलच काही गुपित शिंदे यांच्याकडे असावे, असे सांगण्यात येत आहे.
मात्र दिघे यांच्या मृत्यूला इतरही वैद्यकीय कारणे असल्याचे तेव्हाच स्पष्ट करण्यात आले होते. दिघे हे `चेन स्मोकर` होते. त्यांचे 40 टक्केच हृदय काम करत होते. पायाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या हृदयावर ताण आला आणि रुग्णालयात असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे तेव्हा सांगण्यात आले होते. दिघे यांच्या जीवनावर शिंदे यांनी `धर्मवीर` चित्रपट तयार करून गुरुदक्षिणा दिली. मात्र दिघे यांच्या शिष्याला ठाकरे यांनीही नंतर काही कमी केले नाही, असे नंतर दिसून आले. शिवसेनेची ठाण्यातील सर्व सूत्रे शिंदे यांच्याकडे होती. तसेच विरोधी पक्षनेता, नगरविकास मंत्री अशी पदेही शिंदे यांना ठाकरे यांनी दिली होती. दिघे समर्थक म्हणून शिंदे यांच्यावर अन्याय झाला नव्हता, असे शिवसैनिक सांगतात. तरीही शिंदे हे भूकंप करणार असल्याचा इशारा देत असतील तर काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.