Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
विशेष

'...तेव्हा पवारसाहेब, अजितदादा मार्गदर्शक असतीलच; पण निर्णय नवीन पिढी घेईल...'

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी चिंचवड : ‘‘सन २०२४ नंतरची वेळ ही युवकांची म्हणजे आमची आहे. सर्वांना बरोबर घेऊन आपल्या विचारांचे सरकार २०२४ मध्ये कसे येईल, यासाठी प्रत्येकाने मनापासून काम करायचे आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णयसुद्धा त्यावेळी आपल्यालाच घ्यावे लागणार आहेत, त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच. पण, काय पद...कसं करायचं... कुणालं करायचं... हे निर्णय ही नवीन पिढी घेईल,’’ असे वक्तव्य कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. (When our time comes, we also have to take decisions : Rohit Pawar)

पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वरील विधान केले आहे. ते म्हणाले की, जमिनीवर राहणं, हे आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की, जमिनीवर राहणं आम्ही शिकलेलो आहोत आणि आम्ही जमीन सोडून कधीही वागणार नाही. पदाने कितीही मोठं झालो तरी लोकांमध्ये राहण्याची शिकवण आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला दिली आहे. ती आम्ही स्वीकारली आणि आत्मसात केली आहे, त्या पद्धतीने आम्हीसुद्धा वागत आहोत.

आगामी २०२४ पर्यंत आम्ही अशाच पद्धतीने काम करणार आहोत. एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना सांगायची आहे. येत्या २०२४ नंतरची वेळ ही युवकांची म्हणजे आमची आहे. सर्वांबरोबर राहून आपल्या विचारांचे सरकार २०२४ मध्ये कसे येईल, यासाठी मनापासून काम करायचे आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णयसुद्धा आपल्यालाच घ्यावे लागतात. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच. पण, काय पद...कसं काय...कसं करायचं... कुणालं करायचं... हे निर्णय ही नवीन पिढी घेईल...मी म्हणणार नाही की आम्ही करू. पण, नवीन पिढी त्या ठिकाणी ते निर्णय घेणार आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

मी फार पुढचा विचार करून राजकारणात आलेलो आहे. मी पदाचा विचार केला, असे कधीही झालेले नाही. पण, खूप काही मतदारसंघ, महाराष्ट्रासाठी करायची मनाची तयार केलेली आहे. हे करत असताना, लांबच्या राजकारणाचा विचार करताना मित्रांना आम्ही कधीही विसरत नाही. त्यामुळे आमदार अतुल बेनकेंसुद्धा माझ्याबरेाबर लांबचं राजकारण करण्यासाठी राहणार आहेत, असे सांगून रोहित पवारांनी भविष्यातील आपली दिशाच स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT