विरार : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील (Shivsena) ४० पेक्षा जास्त आमदार आणि १२ खासदार हे शिंदे यांच्यासोबत गेल्याने सत्तेची समीकरणे बदलली आहेत. पालघरचे खासदार खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले आहे. खासदार गावित यांचा आज (ता. २४ जुलै) वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाचे भाजपने (BJP) मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडून आले शिवसेनेच्या तिकिटावर; पण गावित शिवसेनेशी कधीच एकरूप झाले नाहीत, अशी टीका शिवसैनिकांमधून आता होत आहे. दुसऱ्या बाजूला बॅनरचे समर्थन करताना भाजपच्या नेत्यांनी गावित हे युतीचे खासदार असल्याचे सांगून विषय संपविल्याने वसई-विरारमध्ये शिवसेनेचे राजेंद्र गावित नक्की कोणाचे, यावर चर्चा रंगू लागली आहे. (MP Rajendra Gavit's birthday banner put up by BJP)
राजेंद्र गावित पूर्वी काँग्रेसमध्ये असताना मंत्री झाले, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळवली. गेल्यावेळी शिवसेनेने पालघर लोकसभेची जागा आपल्याकडे घेतल्यावर गावितांनी शिवनबंधन हाती बांधले. शिवसेना-भाजप युती तुटून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर भाजप-शिवसेनेमध्ये दरी पडत गेली. त्यावेळी शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले होते. गेल्या अडीच वर्षांत पुलाखालून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तेच गावित मातोश्री सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असतानाच शिवसैनिकांच्या भावनेवर मीठ चोळण्याचे काम भाजपने गावितांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लावून केले आहे. आतापर्यंत असे बॅनर भाजपने कधीच लावले नव्हते. ते नेमके आताच लागल्याने जिल्ह्यात गावित नक्की कोणाचे? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी सांगितले की, राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असल्याने राजेंद्र गावित हे युतीचे खासदार असल्याने शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेतून मात्र गावितांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार असूनही सेनेच्या शाखेत बसायला त्यांना ॲलर्जी होती, त्यामुळे ते शाखेत बसत नसत. जो माणूस काँग्रेसने मंत्रिपद दिल्यावरही त्यांचा झाला नाही. भाजपने खासदार केल्यावरही त्यांचा न राहता शिवसेनेबरोबर आला आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून बंडखोरांना साथ देत आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा .आता तरी त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. अजून एक घर बदलून त्यांनाही फसवू नये, अशी अपेक्षा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.