Delhi Elections and BJP Politics : दिल्ली विधानसभा निवडणुकी दणदणीत यश मिळवत, तब्बल 27 वर्षानंतर भाजपने सत्ता काबीज केली आहे. मात्र आता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत आणि त्यावरून विविध अंदाज वर्तवले जात आहेत. तर अनेक चेहरेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून, भाजपचे केंद्रीय नेतृत्व कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान यंदा भाजपा मुख्यमंत्रिपदाची संधी एका महिला आमदारासही देवू शकते, असंही बोललं जात आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर शालीमार बागच्या नव-निर्वाचित आमदार रेखा गुप्ता याचे नाव आहे. तर त्यांच्याशिवाय भाजपकडून आणखी तीन महिला आमदारांनी निवडणूक जिंकली आहे. यापैकीही दोन नावांची चर्चा होत आहे.
एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली की, आमच्या जेवढ्या महिला आमदार आहेत. त्यामध्ये शालीमार बाग मतदारसंघातील आमदार रेखा गुप्ता यांचे प्रोफाइल मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात प्रबळ आहे. कारण, त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिल्या आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS), अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील कामापासून त्या आमदार पदापर्यंत पोहचल्या आहेत.
याशिवाय भाजपच्या(BJP) अंतर्गत गोटातील चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी आणखी एक महिला आमदाराचं नाव समोर येत आहे. ते म्हणजे ग्रेटर कैलाश मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचा पराभव करणाऱ्या शिखा रॉय. भाजपच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, त्या स्वत: पंजाबी समाजातून येतात आणि त्यांचे सासर पूर्वांचलमध्ये असल्याने, पक्ष त्यांच्या माध्यमातून तीन मोठी आणि मजबूत समीकरणं साधू शकते. त्यांना दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत कामाचाही अनुभव आहे.
तर पूनम शर्मा यांनी वजीरपूर मतदारसंघात आम आमदी पार्टीचे उमेदवार राजेश गुप्ता यांचा 11 हजार 425 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या सूत्रांच्या मते हरियाणातून येणाऱ्या पूनम शर्मा यांचे सासरे जुने भाजप नेते आहेत आणि दिल्लीमध्ये पक्षाचा ब्राह्मण चेहरा राहिले आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीवर भलेही पक्षाच्या दृष्टीने भक्कम असेल. परंतु त्यांचे ब्राह्मण असणे हे मुख्यमंकत्रिपदाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळही ठरू शकते.
याशिवाय नीलम पहलवान यांनी नजफगढ मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या तरूण कुमार यांचा 29,009 मतांना पराभव केला. मात्र भाजपच्या सूत्रांच्यानुसार कैलाश गहलोत आणि प्रवेश वर्मा यांच्या सारखे जाट चेहरे असताना, यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणे अवघडच आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना राजकीय जाणकरांचे मत आहे की, ज्याप्रकारे पुरुष मतदारांनी यंदा भाजपचं सरकार बनवण्यासाठी सकारात्मक मतदान केले. त्याच्या तुलनेत महिला मतदारांचा कल हा आम आदमी पार्टीकडे(AAP) दिसून आला. हेच नव्हे तर मागील काही निवडणुकांमधील ट्रेंडही याच गोष्टीकडे इशारा करत आहेत की, आता महिला मतदार या एक मोठी व्होट बँक म्हणून समोर येत आहे. यामागे त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध सरकारी योजनांचा महत्त्वाचा रोल आहे.
ही गोष्ट एकप्रकारे बिहारमधून सुरू झाली आणि पश्चिम बंगालनंतर संपूर्ण देशभरात पोहचली, की महिला आता मतदानावेळी स्वतंत्र निर्णय घेत आहेत. त्यामुळेच भाजप आता एका महिला आमदारास मुख्यमंत्रिपदाची संधी देत, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील अनेक दिग्गजांना धक्का देवू शकतो. कारण, सध्या देशात भाजपची एकही महिला मुख्यमंत्री नाही ही उणीवही पक्ष भरून काढू शकतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.