Ajit Pawar-Ashish Shelar
Ajit Pawar-Ashish Shelar Sarkarnama
विशेष

शिंदे, फडणवीस, अजितदादांनाच दोन माईक का? : शेलार; पवार म्हणाले ‘आमचा एक माईक दिल्लीला जातो’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानसभा (Assembly) सभागृहातील आपण सर्व सदस्य समान पद्धतीवर काम करणारे आहोत. आपल्या सर्वांचे अधिकार समान आहेत. पण, मी कालपासून सभागृहात एक गोष्ट पाहत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) या तिघांनाच दोन माईक आहेत. या तिघांनाच दोन माईक का? असा प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला. त्यावर अजितदादांनी भन्नाट उत्तर दिले. ‘आमच्या तिघांचे दोनपैकी एक माईक दिल्लीला जातात,’ असे उत्तर दिले. (Why two mics for Shinde, Fadnavis, Ajitdada? Question of Shelars; Pawar said, one of our Mike goes to Delhi)

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी वरील हरकतीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्या प्रश्नाला अजितदादांनी उत्तर देताच विधानसभेत एकच हशा पिकला.

आमदार शेलार म्हणाले की, आपण सभागृहाचे अध्यक्ष आहात. सभागृहातील सर्व सदस्य समान पद्धतीने काम करणारे आहेत. महाराष्ट्राचा विचार आपण समान पद्धतीवर करतो आहोत. सर्वांचे अधिकार समान आहेत. पण, सभागृहात मी कालपासून एक गोष्टी पाहत आहे. सभागृहात फक्त तीन सदस्यांनाच दोन माईक आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा समावेश आहे.

अध्यक्ष महोदय आपल्यालाही दोन माईक नाहीत. सभागृहातील सर्व सदस्यांचा आवाज एका माईकवर महाराष्ट्रभर पोचतो. एका माईकवर बाळासाहेब थोरात, भुजबळ साहेब आणि मीही काम करू शकतो. आदित्य ठाकरेजीसुद्धा एका माईकवर काम करू शकतात, तर मग असं काय आहे की या तीन सदस्यांनाच दोन माईक देण्यात आले आहेत. याचे रेकॉर्डिंग कुठं दुसरीकडं जातंय का? त्यांच्यावर कोणी पाळत ठेवतयं का? या तिघांच्या बाबतची विशेष माहिती कोणाला हवी आहे का? या तिघांनाच दोन माईक का आहेत, अशी माझी हरकत आहे. त्याबाबत माझे समाधान करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

शेलारांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी ‘शेलारसाहेब, आपल्याला एका माईकचीही गरज नाही. आपण माईकशिवायही तेवढेच इफ्केटीव्ह आहात. आपण दिलेल्या माहितीची, हरकतीची सखोल चौकशी करून हा आवाज कुठे बाहेर जातो का? याबाबतची संपूर्ण माहिती घेऊ,’ असे आश्वासन आमदार शेलारांना दिले.

विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर यांच्यानंतर बोलायले उठलेले विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आमचा प्रत्येकाचा एक माईक दिल्लीला जातो. होय, आमच्या तिघांचाही. आमचंही दिल्लीला ऑफीस आहे ना.’ त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT