Chandrakant Handore
Chandrakant Handore Sarkarnama
विशेष

नाराज चंद्रकांत हंडोरे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार..? हंडोरे म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत स्वकीयांकडूनच दगाफटका झाल्यानंतर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत हंडोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Will Chandrakant Handore join the Eknath Shinde group..? Handore said...)

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या आमदारांनीच क्रॉस व्होटिंग केल्यामुळेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर हंडोरे हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या निवडणुकीनंतर उठलेल्या राजकीय वादळात आता हंडोरे यांचेही नाव जोडले जात आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हंडोरे यांनी त्याचा इन्कार केला आहे.

चंद्रकांत हंडोरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेसनं मला सगळं काही दिले आहे, त्यामुळे या चर्चांना अर्थ नाही. मी काँग्रेसमध्येच आहे, असे हंडोरे यांनी स्पष्ट केले.

हंडोरे यांनी भीमशक्ती या संघटनेची राज्यव्यापी चिंतन बैठक आज (ता. २४ जुलै) मुंबईतील चेंबूरमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या माध्यमातून हंडोरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर हंडोरे हे नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेवर हंडोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

माजी मंत्री हंंडोरे म्हणाले की, काँग्रेसने मला दोन वेळा आमदार बनवले आहे, त्यानंतर मंत्री बनवलं आहे. मागील निवडणुकीत विधान परिषदेचे तिकीटही दिले होते. मात्र, काँग्रेसमधील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यामुळे त्या निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. हार-जीत ही निवडणुकीत होतच असते. पण, माझ्याविरोधात ज्यांनी मतं दिली, त्यांच्याविरोधात राहुल गांधींकडे तक्रार केलेली आहे. त्याची दखल घेत पक्षनेतृत्वानेही तत्काळ निरीक्षक पाठवून अहवाल बनवला आहे. पक्षाच्या विरोधात ज्या आमदाराने काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असेही हंडोरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT