Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay Mahadik Sarkarnama
विशेष

प्रशांत परिचारक आणि राजन पाटील खासदार धनंजय महाडिकांना टाळी देणार का?

खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वजीत महाडिक हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यापासून सुमारे २५ गावांचा दौरा केला.

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची (Bhima Sugar Factory) निवडणूक (Election) प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते आजतागायत कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शेतकरी व कारखाना हितासाठी निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन विरोधकांना केले आहे. महाडिक यांच्या या आव्हानाला माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) प्रतिसाद देणार का,याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Will Prashant Paricharak-Rajan Patil respond to MP Dhananjay Mahadik's call?)

भीमा कारखान्यावर माजी आमदार (स्व.) सुधाकर परिचारक आणि आमदार राजन पाटील यांचे सुमारे २५ वर्षे वर्चस्व होते. मात्र, दहा वर्षांपूर्वी सभासदांनी बदल करून कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या खासदार महाडिक यांच्याकडे दिल्या. अत्यंत संघर्ष करून मिळवलेली सत्ता टिकविण्याचे मोठे कसब महाडिक यांच्याकडे आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र जास्त असल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावत होता. शिवाय सभासदांना इतर कारखान्यांप्रमाणे दर द्यायचा ठरवले तरी उपपदार्थनिर्मिती शिवाय पर्याय नाही, हे ओळखून महाडिक यांनी कर्ज घेऊन कारखान्याचे विस्तारीकरण केले. २५ मेगावॉटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यामुळे कारखान्याला चांगले दिवस आले.

खासदार महाडिक यांनी निवडणुकीत दिलेल्या सर्व जाहीरनाम्याचे पालन व दिलेला शब्द खरा केला. मात्र, गेल्या दोन-तीन हंगामातील दुष्काळामुळे कारखान्याची घडी विस्कटली होती. सन २०२१ -२२ या गळीत हंगामात चांगले गाळप करून विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न महाडिक यांनी केला. कारखान्याच्या विरोधात विरोधकांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्याने महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम कारखान्याच्या दैनंदिन कामकाजावरही झाला होता. पण मागे हटतील ते महाडिक कसले? याप्रमाणे त्यांची केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी जवळीक साधली.

खासदारपुत्राचा ‘होम टू होम’ प्रचार

खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वजीत महाडिक हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यापासून सुमारे २५ गावांचा दौरा केला. ‘होम टू होम’ जाऊन सभासदांच्या अडचणी जाणून घेतल्या. (स्व.) भीमराव महाडिक यांचा राजकीय वारसदार नातू म्हणून त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

'तुम्ही तुमच्या कारखान्यासाठी कर्ज काढलेच की'

निवडणूक प्रक्रियेतील बैठका गाठीभेटींना ऊत आला आहे. अजिंक्यराणा पाटील व प्रणव परिचारक हे दोन युवक कारखान्याच्या विरोधातली बाजू सभासद यांच्या समोर मांडत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधक म्हणतात महाडिक यांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला, त्यामुळे कर्जमुक्त होणे अडचणीचे आहे. तर महाडिक म्हणतात, तुम्ही तुमचे कारखाने व उपपदार्थ निर्मितीसाठी कर्ज काढले होतेच की, ते तुम्ही फेडले. सहकारी साखर कारखाने खासगी केले. आम्हीही कर्ज काढूनच विस्तारीकरण व सहवीज निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. मागच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात विस्तारीकरण, उपपदार्थ निर्मिती हे का केले नाही?

विरोधकांकडे ठोस मुद्दे नाहीत : महाडिक

कारखान्याच्या कर्जाची चिंता करू नये, त्यासाठी आमचे संचालक मंडळ खंबीर आहे. सध्याचा गळीत हंगाम संपल्यावर इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू करणार येणार आहे. विरोधकांकडे विरोधासाठी ठोस मुद्देच नाहीत असे सांगत, निवडणूकीच्या तापलेल्या वातावरणात महाडिक हे मर्मावर बोट ठेवून सभासदांचे लक्ष विचलीत होऊ नये, यासाठी कारखान्याची वस्तुस्थिती पटवून देण्याचा अट्टाहास करत असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT