Congress Politics Sarkarnama
विश्लेषण

Congress Politics : मुख्यमंत्रिपदासाठी दोन पाटलांचे गुडघ्याला बाशिंग, देशपांडेंचीही फिल्डींग

CM Siddharamaiah MB Patil Shivanand Patil RV Deshpande : मुख्यमंत्री सिध्दरामैया यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.  

Rajanand More

Karnataka News : कथित जमीन घोटाळा प्रकरणात थेट मुख्यमंत्री सिध्दरासमैया यांचे नाव आल्याने अनेक नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत. काही नेते उघडपणे या पदावर आपला दावा ठोकू लागले असून त्यामध्ये काँग्रेसमधील दोन पाटील व देशपांडे आघाडीवर आहेत.

भाजपकडून सिध्दरामैया यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय़ घेतला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही ते स्पष्ट केले आहे. पण त्यानंतरही काही नेते मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

काँगेसमधील ज्येष्ठ नेते एम. बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांच्यामध्येच या पदावरून जुंपली आहे. पक्षा ज्येष्ठ नेता कोण, यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. पक्षाने निर्णय घेतला तर आमदारांचा पाठिंबा असेल तर मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा प्रश्नच येत नाही, असे एम. बी. पाटील म्हणाले आहेत.

सध्यातरी हे पद रिक्त नाही. पण एक दिवशी, मी त्या खुर्चीवर असेन. मला पूर्ण विश्वास आहे. शिवानंद पाटील यांच्यासाठी ही संधी खूप दूर आहे, कारण ते जेडीएस, भाजपमधून आले आहेत, असे टोला एम. बी. पाटील यांनी लगावला. शिवानंद पाटील यांच्या एका विधानावरून एम. बी. पाटील यांनी हा टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते शिवानंद पाटील?

एम. बी. पाटील यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना वाट पाहावी लागेल. ज्येष्ठ नेते असताना तुम्ही वाट पाहणार नाही का, असा सवाल शिवानंद पाटील यांनी केला होता. त्यांनी आपण या पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगताना डी. के. शिवकुमार यांचे नाव पुढे केले. त्यांनी पक्षासाठी खूप काम केले आहे. तेच या पदाचे दावेदार असल्याचे शिवानंद यांनी म्हटले आहे.

दोन पाटलांप्रमाणेच काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनीही मागील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. मी अनेकदा मंत्री बनलो. आता मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. आयुष्यात प्रत्येकाला आकांक्षा असतात. आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही. मी हे हायकमांडवर सोपवतो. तशी संधी आल्यास सिध्दरामैया माझे मित्र असल्याने मला मान्यता देतील, असे देशपांडे म्हणाले होते.

गृहमंत्री जी. परमेश्वरा आणि सार्वजनिक बांधकाम मं६ सतीश जारकीहोळी यांच्याही इच्छा लपून राहिलेल्या नाहीत. जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये एका वृत्तपत्रात केलेल्या जाहिरातीत त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता. त्यावर जारकीहोळी यांनी मात्र आपला या पदासाठी दावा नसल्याचे नंतर स्पष्ट केले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT