uddhav thackeray.jpg sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : टायगर जिंदा है..! 'सिनेट'चा निकाल, ठाकरेंना 100 हत्तींचं बळ; मित्रपक्ष अन् विरोधकांची झोप उडणार

अय्यूब कादरी

महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी शिवसेनेची इच्छा होती, मागणीही होती. मात्र, ती मित्रपक्षांनी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरदचंद्र पवार ) मान्य केली नाही. मुख्यमंत्री कोण, हा निर्णय आमदारांच्या संख्याबळावर घेण्यात येईल, अशी भूमिका मित्रपक्षांनी घेतली. त्यामुळे शिवसेनेची ( ठाकरे गट ) कोंडी झाली आहे.

सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची खिल्ली उडवायला सुरुवात केली होती. दिल्लीची वारी करूनही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या पदरात काहाही पडले नाही, असे चिमटे सत्ताधाऱ्यांकडून घेतले जात होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना एका अर्थाने बॅकफूटवर गेली होती. अशातच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेने (ठाकरे गट) सुटकेचा श्वास सोडला. या निकालामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचे बळ नक्कीच वाढले आहे.

महाविकास आघाडीतही ( Mahavikas Aghadi ) जागावाटपाचा पेच आहेच. महाविकास आघाडीचे सरकार आले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यापाठोपाठ कोरोनाचे आगमन झाले. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे हे टीव्ही आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून सतत लोकांच्या संपर्कात राहिले, लोकांना धीर दिला. कोरोनाकाळात राज्यातील लोकांचे हाल झाले नाहीत, असे म्हणता येणार नाही, मात्र उद्धव ठाकरे यांनी निभावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेचे कौतुक झाले. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनाकाळात हाहाःकार उडाला होता. तशी परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती, हे मान्यच करावे लागेल.

शिवसेना फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदही गेले. त्यामुळे त्यांना अभूतपूर्व अशी सहानुभूती मिळाली. उद्धव ठाकरे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर काय झाले असते, यावर वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांना मोठी सहानुभूती मिळाली, हे वास्तव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राचे मुख्यमंत्रिपद घालवले, याचे खापर भाजपच्या डोक्यावर फुटले. ते ओझे भाजपला अजूनही वाहावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीची पीछेहाट होण्याचे हे एक प्रमुख कारण होते.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही हे मान्य होते. त्यातूनच लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला अधिक जागा आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक 21 जागा आल्या, मात्र 'स्ट्राइक रेट'चा हिशेब लावला, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा फारच कमी राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 जागा लढवून 8 जिंकल्या, तर काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जिंकल्या. 21 जागांवर निवडणूक लढलेल्या शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झाले. पक्ष नाही, चिन्ह नाही, 40 आमदार सोडून गेलेले... अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मिळवलेले हे यश काही कमी नव्हते, मात्र त्यांची कोंडी करण्यासाठी मित्रपक्षांच्या हाती 'स्ट्राइक रेट'चा मुद्दा मिळाला होता.

याच्या बळावरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नाही. चेहरा कोणताही जाहीर करा, आपला त्याला पूर्ण पाठिंबा राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते, मात्र मित्रपक्षांनी तीही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. लोकसभा निवडणुकीत 'स्ट्राइक रेट' कमी असला तरी उद्धव ठाकरे हेही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची सहानुभूती अद्यापही असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा आणि शरद पवार यांच्या डावपेचांमुळे महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्याला काँग्रेसमधील तरुण नेत्यांच्या फळीची भक्कम साथ मिळाली. मुस्लिम आणि दलित समाजाची मते उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मिळाली. या सर्व बाबींमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जाईल, अशी चर्चा होती.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक 2022 मध्ये होणार होती, मात्र महायुती सरकारने ती सतत लांबणीवर टाकली. त्यापूर्वी 2015 मध्येही भाजपने ती लांबणीवर टाकली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. त्या भीतीतूनच 2022 चीही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही निवडणूक 24 सप्टेंबर रोजी झाली. युवासेनेचे सर्व 10 उमेदवार पुन्हा निवडून आले. पक्षफुटीचा परिणाम या निवडणुकीवरही झाला नाही. या निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गटात शंभर हत्तींचे बळ संचारले असणार.

सिनेट निवडणुकीच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाईल का? या प्रश्नाचे उत्तर विचारले तर बहुतांश जण नाही, असेच म्हणतील. मात्र, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे महत्त्व नक्कीच वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील स्पेस गमावली की काय, असे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होते. तसे चित्र आता यापुढे दिसणार नाही, हे मात्र निश्चित मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिनेटच्या निवडणुकीत युवा सेनेने मिळवलेल्या विजयामुळे महाविकास आघाडीत तर उद्धव ठाकरे यांचे वजन वाढलेच आहे, शिवाय महायुतीलाही सुशिक्षित मतदारांनी सज्जड इशारा दिला आहे. टायगर जिंदा है... हे उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष आणि विरोधकांनाही दाखवून दिले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT