Ahilyanagar Rahuri bypoll : राहुरी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील, भाजपचा उमेदवारावर प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिक्कामोर्तब केलं. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव विखे पाटील यांनी रेटून धरलं आहे. हे नाव पुढं करताना, अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतील, असे सांगून विखे पाटील यांनी राहुरीसह बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं दोन्ही बाजूच्या आघाड्यांना केलं.
असं असलं तरी, राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नेते प्राजक्त तनपुरे यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु तनपुरे या निवडणुकीची तयारी कोणत्या पक्षाकडून करत आहेत, हे गुलदस्त्यात आहे. त्यांच्या खांद्यावर भगवं उपरण चढवल्यानं वेगळ्याच राजकीय समीकरणाची चर्चा आहे.
राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची घोषणा 10 ते 12 मार्च होऊ शकते, असा अंदाज आहे. सुजय विखे पाटील यांनीच या तारखा सांगून मतदारसंघातील हालचालींना वेग दिला आहे. महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटणार, असा प्रश्न असतानाच, 'भाजप सर्वप्रथम', असे भाजपने (BJP) अगोदरच स्पष्ट केलं आहे. शिवाजी कर्डिले हे भाजपचे विद्यमान आमदार होते. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला येणार, हे स्पष्ट आहे.
भाजपकडून उमेदवार कोण असेल तर, यात दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव आघाडीवर आहे. विखे पाटील पिता-पुत्राने देखील अक्षय कर्डिले यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील अक्षय कर्डिले यांच्या राजकीय पुर्नवसनाचा शब्द दिलेला आहे. विखे पाटील पिता-पुत्रानं अक्षय कर्डिलेचा नाव पुढं केलं असलं तरी, भाजपकडून होणारे सर्व्हे, त्यातील नावे, महायुती मित्र पक्षांची भूमिका, असं बरंच काही राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघणार आहे.
महायुतीत काय व्हायचे ते होईल, पण अक्षय कर्डिले यांनी विखे पाटील पिता-पुत्राच्या पाठिंब्यावर मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. भाजपचे संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांच्या उपस्थित बुऱ्हाणनगर इथं झालेल्या बैठकीत राहुरी पोटनिवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर, श्रद्धेची आणि वारशाचीही लढाई आहे, असे सूचक भाष्य करून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं.
भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, असे सांगितले जातं. या पोटनिवडणुकीत वारशाला, म्हणजेच अक्षय कर्डिलेंना संधी मिळाल्यास, इच्छुक असलेले अन् पक्षाकडे छुप्यापद्धतीने फिल्डिंग लावून असलेले सुमारे डझनभर आहेत. पण घराणेशाहीसमोर अन् भावनात्मक राजकारणामुळे उघडपणे हे कार्यकर्ते समोर यायला तयार नाही. पक्षाकडून नाव आल्यास रेटता येईल, अशी खासगीत भूमिका मांडत आहेत. हे कार्यकर्ते संघटनेमधील असल्याने, त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नसेल.
जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेची निवडणूकचा देखील बिगूल वाजायचा आहे. तिथं अशा कार्यकर्त्यांचे पुर्नवसन होईल, अशी पक्षात चर्चा आहे. पण त्यात किती दम हे आगामी काळातच समजेल. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी मांडली आहे. पण प्रत्यक्षात विखे पाटलांच्या या भूमिकेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच वाटते.
महाविकास आघाडी इथं निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डिलेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाली. चुरशीच्या लढतीत तनपुरे यांचा पराभव झाला. परंतु तनपुरे या पराभवानंतर थांबले नाहीत. ग्रामपंचायत, नगरपालिका, कारखाना निवडणुकीत सक्रिय असून मतदारसंघात आजही सक्रिय आहेत.
कारखाना निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी एकहाती वर्चस्व मिळवलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनलने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. कारखाना निवडणुकीत तनपुरेंना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बळ मिळालं होतं. तनपुरे कारखाना निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार यांनी हजेरी लावत, थेट तनपुरे वाड्यावर हजेरी लावली. तेव्हापासून प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सक्रिय होताना दिसतील, अशी चर्चा होती. तनपुरे यांनी तिथं संयम दाखवला. पण खांद्यावर भगवं उपरण घेतलं.
अजित पवार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे कोणती भूमिका घेणार, मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा राजकीय भवितव्य आजमावणार का? नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे. राहुरी मतदारसंघात अक्षय कर्डिले-प्राजक्त तनपुरे, अशी लढत झाल्यास, तनपुरे यांच्यावर मोठा दबाव असणार आहे. नवख्या अक्षय कर्डिलेंसमोर तनपुरे यांचे राजकीय करिअरची शर्यत असणार आहे.
भावनात्मक राजकारणावर अक्षय कर्डिले सध्या तरी पुढे दिसतात. यातच त्यांच्या मागे सत्तेतील बलाढ्य एक क्रमांक असलेल्या भाजपचं बळ आहे. तुलनेत मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष थकलेला दिसतो आहे. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचा खासदार असला तरी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंकेंचा चमत्कार चालला नाही. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार एकमेव निवडून आले आहेत. पण ते देखील त्यांच्या एकट्याच्या संघर्षावर!
या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून कितपत राजकीय बळ मिळेल, याबाबत देखील साशंकता आहे. विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात त्यांनाच पराभवाला समोरं जावं लागलं आहे. पण त्यानंतर ते मतदारसंघातील प्रत्येक राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून पुर्नबांधणी करत सुटले आहेत. त्याचा राजकीय फायदा त्यांना होताना दिसतो आहे.
अशा राजकीय परिस्थितीत प्राजक्त तनपुरे ही निवडणूक कितपत मनावर घेऊन लढतील याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. यातून कोणता उमेदवार अक्षय कर्डिले समोर येतोय याची उत्सुकता आहे. निवडणूक बिनविरोध करून, अक्षय कर्डिलेंना संधी मिळेल का? या सर्व निर्णयांकडे आता लक्ष लागलं आहे.
अक्षय कर्डिलेंना या निवडणुकीत भावनात्मक बळ मिळत असलं तरी, वैयक्तिक संघटन नाही. त्यांचे वडील दिवंगत शिवाजी कर्डिले यांचा मतदारसंघ तोंडपाठ होता. जुने-नवे कार्यकर्ते, त्यांनी जुळवले होते. दिवाळी फराळच्या कार्यक्रमाला शिवाजी कर्डिले यांच्याकडून तब्बल 90 हजार जणांना निमंत्रण दिलं गेलं होतं. यावरून त्याचं पक्ष संघटनेपेक्षा वैयक्तिक संघटन लक्षात येतं. इथं तुलनेत अक्षय कर्डिले कुठेच दिसत नाहीत. परंतु प्राजक्त तनपुरे, यांचं असं संघटन दिसतं. त्यामुळे या दोघांमध्ये लढाई झालीच तर, कोण जिंकेल याची उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.