Sujay Vikhe, Balasaheb Thorat Sarkarnama
विश्लेषण

Ahmednagar Lok Sabha Politics : सुजय विखेंच्या विरोधात बाळासाहेब थोरात ? लोकसभेच्या 'दक्षिण नगर'कडे लक्ष

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : काँग्रेसकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात पक्षाची सद्यस्थिती पाहून कुठे उमेदवार द्यायचा, यासाठी पक्ष निरीक्षकांमार्फत अवलोकन सुरू आहे. २०१९ चे राज्यातील लोकसभेचे निकाल, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर २०१९ची स्थिती आणि २०२२नंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड या सद्यस्थितीत काँग्रेसची ताकदीचा अंदाज घेतला जात आहे. यातून काँग्रेसचे निरीक्षक अनेक जिल्ह्यातील जागांवर दावा करत आहेत. यात नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने स्पष्ट दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Political News)

काँग्रेसच्या वतीने नगर दक्षिणेतून बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा लढवावी, असा आग्रह केला जात आहे. या मतदारसंघात गेली अनेक 'टर्म' भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. दिवंगत दिलीप गांधी यांनी तीन वेळेस येथून पक्षाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सध्या भाजपचे सुजय विखे प्रतिनिधित्व करत आहेत. लोकसभेला भाजपचे प्राबल्य दिसत असले तरी विधानसभेला मात्र राष्ट्रवादी पक्षाने वर्चस्व ठेवले आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादीही या मतदारसंघावर नेहमी दावा कायम ठेवला आहे.

जुनी राजकीय पार्श्वभूमी आणि सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे काँग्रेस नगर दक्षिणेवर दावा करताना दिसत आहे. मात्र शरद पवार हा मतदारसंघ कदापि मित्र पक्षाला सोडणार नाहीत, असे राजकीय जाणकार सांगतात. तसेच थोरातांचे नाव पक्ष संघटनेतून आले असले तरी स्वतः थोरातांनी आपल्या उमेदवारीबाबत कधीही भाष्य केलेले नाही. राजकीय विश्लेषक आणि पक्षातीलच अलिप्त काँग्रेस गटानेही थोरात ही 'रिस्क' अजिबात घेणार नाहीत, असे खासगीत स्पष्ट केले आहे.

विखे परिवार अनेकदा राजकीय 'रिस्क' घेतो. त्यात पक्षांतरापासून मतदारसंघ बदल असे अनेक उदाहरणे आहेत. मात्र थोरातांनी आपल्या उभ्या राजकारणात अशी 'रिस्क' अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे ते लोकसभेसाठी इच्छुक असणार नाहीत, असे बोलले जाते. एकूणच थोरातांची संभाव्य अनुत्सुकता, राष्ट्रवादी-सेनेतील बंड या राजकीय परस्थितीत खासदार सुजय विखेंना काही महिन्यांपूर्वी डळमळीत वाटणारा लोकसभेचा २०२४ चा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT