Ajit Pawar, Baban Shinde, Harshvardhan Patil Sarkarnama
विश्लेषण

NCP Ajit Pawar Vs BJP : मावळ, इंदापूर अन् माढ्यात अजितदादांना भाजपसह राष्ट्रवादीतूनच चॅलेंज; नेमकं काय सुरू?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असताना सर्व पक्षांत जोरदार हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीत आतापासूनच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

मावळ, इंदापूर आणि माढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. येथून अजितदादांना भाजपसह आपल्याच पक्षातील नेत्यांना शांत करण्याचे मोठा आव्हान आहे.

पुण्यातील मावळ आणि इंदापूरसाठी महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर सोलापूरमधील माढा मतदारसंघातील स्वपक्षातूनच आव्हान उभे राहण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे अजितदादांपुढे Ajit Pawar आपले उमेदवार टिकवण्यासाठी झगडावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे.

इंदापूर

इंदापूरमध्ये गेली दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आमदार आहेत. आता या जागेवर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा दावा सांगत लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी, 'माझे वडील इंदापूरमधून निवडणूक लढवणार आहेत', असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील Harshwardhan Patil यांनी, पक्षाचे कार्यकर्त्यांनी ही जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे मी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीचा विचार करेन, असे सांगितले आहे. यावर भाजपमधून बंडखोरी होणार नाही. भाजप नेते महायुतीच्या हिताच्या विरोधात जाऊन निर्णय घेणार नाही, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुका विकास आघाडी या बॅनरखाली पाटील यांनी अपक्ष म्हणून चारवेळा आमदार झाले आहेत. त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे यांनी त्यांचा पराभव केला.

त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत ते भाजपमध्ये गेले. त्यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून ओळख आहे. आता पाटील यांचे समर्थनार्थ तालुक्यात पोस्टर्स आणि बॅनर लागले आहेत.

मावळ

मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके Sunil Shelke आमदार असून महायुतील सूत्रानुसार त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र त्यास विरोध करत भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी शेळकेंनी आव्हान दिले आहे. त्यासाठी त्यांनी मावळात जोरदार मोहीम सुरू केली आहे.

मावळात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत भेगडे यांनी शेळकेंना चॅलेंज केले आहे. तसेच महायुतीतून शेळकेंना आता उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही, अशी जाहीर भूमिका घेत उघडपणे बंडाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मावळातूनही अजितदादांच्या पक्षाला भाजपच्या नेत्यांचा मोठा विरोध होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. शेळके यांनी मात्र महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे सांगितले.

माढा

लोकसभा निवडणुकीतनंतर अजित पवार गटात गेलेले अनेक नेते शरद पवार गटात परतण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना साथ दिली. आता मात्र दोन महिन्यावर आलेल्या विधानसभेपूर्वीच त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची Sharad Pawar भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बबनदादा शिंदे हे आपले चिरंजीव रणजीतसिंह शिंदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पवार आणि शिंदे यांच्यात पुण्यात काही वेळ चर्चा झाली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या रुपाने माढ्यातून अजित पवार गटाला स्वपक्षातूनच आव्हान निर्माण होण्याचे चिन्ह आहे.

या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, शिंदे यांनी काही वैयक्तिक कामानिमित्त शरद पवार यांची भेट घेतली असावी. शरद पवार वैयक्तिक कामासाठी वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात. बबन शिंदे अजित पवारांना सोडणार नाहीत, असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT