NCP Internal Discipline: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीसोबतच त्यांचा पक्ष शिस्तीत चालवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळेच वारंवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, मंत्र्यांना आणि नेत्यांना वेळोवेळी चुचकारत शिस्तीचे धडे देताना ते सातत्याने दिसतात. नुकतेच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना असाच दम देत आहे ‘हेडमास्तर’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
बेजबाबदार वर्तणूक, अविचारी वक्तव्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवारांसह पक्षाला सातत्याने अडचणीत आणत आहेत. धनंजय मुंडे यांच्याभोवती उठलेले वादाचे मोहोळ त्यांच्या राजीनाम्यानंतरही शमण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यातच माणिकराव कोकाटेंसारखे मंत्री नवे वाद निर्माण करत आहेत. न्यायालयाने शिक्षा स्थगित केलेली असताना माणिकराव शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्ये करून वादग्रस्त होत आहेत. अजित पवारांनी त्यांना तंबी दिली असली तरी ते अशा वाचाळवीर नेत्यांवर नियंत्रणासाठी काय उपाय करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पक्षातील मंत्री सातत्याने काही ना काही वादात सापडले आहेत. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. त्यांचे बीड जिल्ह्यातील गुंडांशी असलेले संबंध आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या या सर्वच गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्याने मुंडे अडचणीत आले. अखेर त्याची परिणती मुंडे यांच्या राजीनाम्यात झाली. मात्र, मुंडे यांच्या या प्रकरणानंतर अजित पवार यांनी वारंवार नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. कोणाशी संबंध ठेवावेत, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जवळ करू नका, असे विविध सल्ले त्यांनी दिले.
अजित पवार यांच्या ‘संयमाने बोला’ या सल्ल्यानंतरही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे थांबायचे नाव घेत नाहीत. पहिल्यांदा आम्हाला स्वीय सहायक नेमायचे अधिकार नसल्याचे रडगाणे गात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाच्या नेत्यांनी समज दिल्यानंतरही ते थांबले नाहीत.
नुकतेच त्यांनी ‘शेतकरी कर्जमाफी मागतात परंतु कर्जमाफी मिळताच तो पैसे मुलांच्या लग्नासाठी खर्च करतात,’ असे सांगत शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच क्षेत्राकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांना पक्षाच्या बैठकीतच तंबी दिली. ‘दोन वेळा चुका झाल्यात. परंतु तिसऱ्यांदा चुकलात तर थेट मंत्रिपदच बदलले जाईल,’ असा दमच अजित पवार यांनी कोकाटे यांना दिला आहे.
मुळात कोकाटे यांच्यावर खोटे कागदपत्रे सादर करत ‘म्हाडा’कडून घर लागल्याचा आरोप आहे. न्यायालयाने यावर त्यांना शिक्षासुद्धा सुनावली आहे. मात्र, त्याला स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणावरून टीकेचे लक्ष्य झालेले कोकाटे वादग्रस्त विधाने करण्याचे काही थांबत नाहीत.
‘कांद्याला चांगला भाव मिळतो म्हणून सर्वच शेतकरी कांदा उत्पादन घेतात आणि भरमसाठ लागवडीमुळे कांद्याचे भाव घसरतात. त्यामुळे कांद्याचे भाव पडण्यास अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार असतात,’ असा आशयाचे वक्तव्य त्यांनी यापूर्वी केले होते. मात्र, राज्याचे कृषिमंत्री असलेल्या कोकाटे यांना शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्याचे भान मात्र नसते. त्याऐवजी केवळ काहीबाही मुक्ताफळे उधळून वाद ओढवून घ्यायचा, हेच त्यांनी अवलंबिले आहे.
अजित पवार वारंवार याबाबत तंबी देत असतानासुद्धा वरिष्ठ नेते आणि मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत पक्षाला अडचणीत आणण्याचे काम का करतात, हाच प्रश्न आहे. अजित पवार हे दरवेळी केवळ तंबी देणार की काही ठोस उपाय करणार हेच आता पाहावे लागणार आहे. अन्यथा अजित पवार यांची पक्षावरील पकड कमी झाली की काय, असा संदेश अन्य कार्यकर्त्यांत जाण्याची शक्यता आहे.
अशा धमक्यांनी पक्ष शिस्तीत चालेल का, हाही प्रश्न आहे. कडक शिस्तीचे अजित पवार पक्षातील वरिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची बेशिस्त कशी खपवून घेतात हा देखील एक प्रश्न आहे. पक्षात आणखीही अनेक ‘वाचाळवीर’ आहेत. केवळ त्यांच्या सुदैवाने त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत नाही. मात्र, त्यांनासुद्धा कधीतरी लगाम घालावा लागणार आहे. यासाठीही अजित पवार यांनी पावले उचलली पाहिजेत.
स्वतःच्या चुकीच्या वक्तव्यानंतर प्रायश्चित्त घेण्यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधिस्थानावर जाऊन आत्मक्लेश करणाऱ्या अजित पवार यांच्या या कृत्याचा कार्यकर्त्यांनी किमान काहीतरी बोध घेऊन त्यानुसार आचरण करणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे अजित पवार कार्यकर्त्यांना या घटनेची सातत्याने आठवण करून देत असतात. तरीसुद्धा फरक पडणार नसेल, तर त्यांना कडक पावले उचलावी लागतील हे नक्की
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.