Pune, 15 August : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) बारामतीतून विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात जय पवार यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (ता. 14 ऑगस्ट) व्यक्त केलेल्या शक्यतेची चर्चा पुन्हा रंगली आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही कर्जत जामखेड मतदार संघातून माझ्या विरोधात खुद्द अजितदादा किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार उभा केला जाऊ शकतो, असे विधान रोहित पवार यांनी केले होते. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राजकीय डाव रंगणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एका विधानामुळे आज दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार (Jay Pawar) यांच्या उमेदवारीचा निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड आणि मतदारसंघातील कार्यकर्ते घेतील. बारामतीतून आपण सहा ते सात वेळा निवडून आलो आहे, त्यामुळे मला आता रस नाही, असेही त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे अजित पवार हे बारामतीतून (Baramti) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, जय पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता अजितदादांच्या आजच्या विधानामुळे होत अहे. मग अजित पवार कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार किंवा ते निवडणूक लढवणार नाहीत का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना कर्जत-जामखेड मतदारसंघातून माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीला उभी केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी त्याच दिशेने जाणारे विधान केल्याने रोहित पवार यांची भीती खरी ठरते की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
रोहित पवार यांनी काय म्हटले होते?
माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक लोकांचे लक्ष आहे, त्यात भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांचाही समावेश आहे. कदाचित अजितदादाही असू शकतील. तसेच, माझ्या मतदारसंघात महायुतीच्या काही नेत्यांना मतं खाण्यासाठी उभा केलं जाऊ शकतं, त्यासाठी संबंधितांना रसदही पोचली आहे.
जो प्रयोग लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांना करावा लागला का त्यांनी तो केला, हे माहिती नाही. पण, माझ्या विरोधातही विधानसभेला कदाचित त्यांच्यावर दबाव आणून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात कदाचित उभा केलं जाऊ शकतं, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.