Akola Vanchit News : अकोला, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबत तिन्ही पक्षांचे एकमत होऊन वंचितला महाविकास आघाडीत घेण्यात आले आहे, तर दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेत पुढच्या बैठकीला जाणार असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडींनंतर वंचितचा बालेकिल्ला समजला जाणारा अकोला लोकसभा मतदारसंघातील समीकरण मात्र बदलण्याची शक्यता आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात आपण लढणार असल्याचे आंबेडकर यांनी अगोदरच घोषित केले आहे. आंबेडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढल्यास भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी लढत या मतदारसंघात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आघाडी, युती, जागावाटप यावर सर्वच राजकीय पक्षात मंथन सुरू आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनीही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.
अशातच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत समावेश व्हावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वारंवार प्रस्ताव देण्यात आले. अखेर कालच्या (ता. 30 जानेवारी) बैठकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमत करून अखेर वंचितला महाविकास आघाडीत घेतले. वंचितचा समावेश महाविकास आघाडीत झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यामध्ये वंचितचा बालेकिल्ला असलेला अकोला लोकसभा मतदारसंघातही या निर्णयामुळे राजकीय समीकरण बदलणार आहे. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे राज्यभरात चर्चेत राहणारा मतदारसंघ समजला जातो.
अकोला लोकसभा मतदारसंघ हा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र, गेल्या सलग चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात आंबेडकरांचा दारुण पराभव झाला आहे. यावेळी मात्र आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे प्रयत्न चालवले होते, तर प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी आघाडी असताना 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत येथून विजयी झाले होते. आता यावेळीही आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. त्यामुळे याचा फायदा आंबेडकर यांना होण्याची शक्यता आहे.
काँग्रेससोबत आघाडी नसताना मतांच्या विभाजनाचा फटका आंबेडकर यांना बसला आहे. आंबेडकरांची महाविकास आघाडीसोबत आघाडी झाल्याने त्यांच्या विजयाची शक्यता वाढली असल्याचा दावा राजकीय तज्ज्ञांनी केला आहे. वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशामुळे त्यांच्या हक्काच्या दलित, ओबीसी, छोट्या समाजघटकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मतदार, काँग्रेसचा परंपरागत मतदार आणि मुस्लिमांचेही मतदान मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत समावेश केल्यानंतर 2 फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर जाणार आहेत. या बैठकीत जागावाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा अगोदरच करून टाकली होती. 'नया साल - नया खासदार' म्हणत जिल्ह्यात प्रचारात आघाडीही घेतली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ वंचितला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आंबेडकरांनी पूर्वीच या मतदारसंघावर दावा केला आहे.
दुसरीकडे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत वंचितच्या वाट्याला आला तर आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजप अशी दुहेरी लढत होणार आहे. त्यासोबतच विद्यमान खासदार संजय धोत्रे आजारपणामुळे निवडणूक लढणार नसल्याने भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात तगडा उमेदवार कोण असणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मतदारसंघासाठी भाजपच्या अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र ऐन वेळी कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कारण या मतदारसंघातील लढत अतिशय काट्याची होणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता चांगलाच चर्चेत आला आहे. 1998 आणि 1999 हे दोन अपवाद वगळता प्रकाश आंबेडकरांचा सातत्याने पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार मताधिक्याने निवडून येतो. 2014 आणि 2019च्या मोदीलाटेत खासदार संजय धोत्रेंनी अनुक्रमे तब्बल दोन लाख आणि पावणेतीन लाख मतांनी विजय मिळविला होता, तर 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर या निवडणुकीत थेट तिसऱ्या, तर 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.
या निवडणुकीत वंचितची ताकद वाढली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणं असेल, ओबीसींचे मेळावे घेणं असेल, वंचितने सर्वच समाजांना घेऊन चालणं पसंत केलं आहे. आता तर महाविकास आघाडीची वंचितला साथ मिळाली आहे. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात मतविभाजन टाळले जाणार, यात काही शंका नाही. तसे झाल्यास पुन्हा 1998 आणि 1999 ची पुनरावृत्ती या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
Edited By : Atul Mehere
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.