Devendra Fadnavis-Amit Shah-Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Amit Shah News : महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शाहांच्या 'ब्ल्यू आइड बॉय'ची एन्ट्री?

BJP Politics : उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राज्यात भाजपमध्ये काही संघटनात्मक फेरबदल होतील का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Lok Sabha Election Result News : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोछी उलथापलथ होण्याचे संकेत आज मिळाले. या निवडणुकीत महायुतीची पीछेहाट झाली. भाजपला तर अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी जागा मिळाल्या.

त्यानंतर राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा राहिलेले देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.5) माध्यमांसमोर आले आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. फडणवीस या जबाबदारीतून मुक्त झाले तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे ब्ल्यू आइड बॉय विनोद तावडे यांची राज्याच्या राजकारणात एन्ट्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यात घडवून आणलेल्या राजकीय घडामोडींची किंमत लोकसभा निवडणुकीत भाजपला चुकवावी लागली आहे. भाजपला खासदारांची दोनअंकी संख्याही गाठता आलेली नाही, त्याचे खापर अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर फुटणार आहे.

त्यामुळे ते आज माध्यमांसमोर आले आणि उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. हे पद सोडण्यासाठी त्यांना दिल्ल्तीतून सूचना आल्या आहेत का, अशीही चर्चा सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत विविध घडामोडींनी महाराष्ट ढवळून निघाला, काही प्रसंगांत हादरूनही गेला. राज्यात भाजपचेही गट-तट आहेत, मात्र त्यात फडणवीस यांचा गट सर्वाधिक शक्तिशाली आहे. त्यांच्याच गटाची पक्षात चलती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फोडले. बदल्याच्या भावनेतून केलेली ही कृती महाराष्ट्राला आवडणार नाही, याचे भान भाजप नेत्यांना राहिलेच नव्हते.

मराठी माणसासाठी लढणारा पक्ष, अशी शिवसेनेची प्रतिमा होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने या प्रतिमेचा पुरेपूर वापर करून भाजपची अडचण केली. मराठी माणसांचा पक्ष भाजपने फोडला, असे नॅरेटिव्ह ठाकरे गटाच्या नेत्यांनी तयार केले.

लोकांच्या मनावर ते पक्के बिंबवण्यात आले. भाजपची वाताहत होण्यामागे हेही एक कारण होते. पक्ष फोडल्यानंतर मागे राहिलेल्या नेत्यांवर म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपने वाचाळ नेत्यांची एक फळीच तयार केली होती. त्यांनी या दोन नेत्यांवर सातत्याने मर्यादा सोडून टीका केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात डाळ शिजत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणात गेले. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. या काळात कामाची चुणूक दाखवत तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा विश्वास संपादन केला. बिहारमध्ये नितीशकुमार यांना परत भाजपसोबत आणण्यात तावडे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गोंधळापासून त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले. तावडे तोलूनमापून बोलतात. अनाठायी विधाने करत नाहीत. विरोधकांवर टीका केली तरी भाषेची मर्यादा पाळतात. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत जो तोंडाचा पट्टा सुरू ठेवला होता, त्यांच्या तुलनेत तावडे शांत, संयमी वाटतात.

फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचे पाठीराखे असलेल्या मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. 'सिर्फ एक आदमी की लाइन छोटी करने के चक्कर मे पार्टी नुकसान किया,' असे ट्वीट त्यांनी केले आहे. फडणवीस यांच्यासाठी मैदानात उतरलेल्या कंबोज यांचा रोख कुणाकडे आहे, याचे फक्त अंदाज बांधले जाऊ शकतात.

मात्र, भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आहे आणि ती आता उफाळून येणार आहे, याचे संकेत त्यांच्या ट्वीटमुळे मिळाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी विनोद तावडे यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे, हे भाजपच्या दिल्ल्तील नेत्यांच्या लक्षात आले आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT