Sanjay Gaikwad. Sarkarnama
विश्लेषण

Shiv Sena : संजूभाऊ अहो जरा तर दमाने घ्या... काहीही पुड्या सोडत जाऊ नका!

प्रसन्न जकाते

Shiv Sena : काही वर्षांपूर्वी मराठी छोट्या पडद्यावर एक मालिका गाजली होती. या मालिकेतील नायिका अगदी थोड्या थोड्या संवादांनंतर आपल्या पतीला ‘काहीही हं श्री..’ असे बोलत असते. अगदी तसेच वाक्य आता बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत वापरण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा ‘वाघ’ आणि ‘धनुष्यबाण’ जिंकला म्हणून काय जाहीरपणे एखाद्या लोकप्रतिनिधीने ‘मी वाघ मारलाय..’ असे सांगायचे असते होय कुठे? बुलडाण्याच्या संजूभाऊंनी नेमकी हीच चूक केली, अन‌् लाऊन घेतला ना ‘फॉरेस्ट’चा ससेमिरा आपल्या पाठीमागे.

सगळे काही चांगले सुरू असताना याला म्हणतात ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेणे. आपण खूप काही वेगळे आहोत, हे भासविण्याच्या नादात बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड भावनेच्या भरात हे बोलून गेले आणि एका शिवसेनेच्या आमदाराला दुसऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी कोंडीत पकडले. गायकवाड प्रथमच असे काही बोलून गेले असे नाही. यापूर्वीही ते बरेच काही बोलले आहेत. उद्धव ठाकरे यांना ‘इम्प्रेस’ करण्यासाठी त्यांनी कोविड काळात चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू टाकण्याची भाषा केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कालांतराने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेतली आणि त्यांच्यासोबत शिंदे सेनेत गेलेल्या संजय गायकवाड यांच्यासाठी आता फडणवीस खरोखरच ‘देवेंद्र’ (स्वर्गाचा राजा इंद्र) झालेत. एकेकाळी डोळ्यात सलणारी भाजप गायकवाड यांना अगदी जवळची वाटू लागली व ज्या उद्धव ठाकरेंनी गायकवाड यांना नगरसेवक ते आमदार केले, तेच उद्धव ठाकरे आता गायकवाड यांना हुकूमशहा वाटू लागले. अनेक वर्षांनंतर आता त्यांना कळले की ठाकरे आणि मातोश्रीवर आपला अपमान होत होता. गायकवाड यांच्या तडकफडक बोलण्याने ते टीआरपी चांगला खेचतात, परंतु कधी कधी भावनेच्या भरात बोलून जाण्याने राजकारणात आयते पंजे आपल्यावर उगारल्या जातात, याचा त्यांना विसर पडला.

एका व्हिडिओत त्यांनी अगदी राजेशाही वेशभूषा केली. गळ्यात वाघनखही होते. अशात व्हिडिओतील निवेदकाने गायकवाड यांना प्रश्न केला की, वाघनख आले कोठून. क्षणाचाही विलंब न लावता गायकवाड साहेब बोलले ना.. अहो मीच मारला वाघ... 1987 मध्ये... आता हे बोलताना एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गायकवाडांना हा विसर पडला, की वन्यप्राण्यांची शिकार हा कायद्याने गुन्हा आहे. काळवीट प्रकरणावरून सलमान खानचे काय झाले होते. 2008 मध्ये बारामतीजवळ तत्कालीन राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दोन चिंकारांची शिकार केली होती. त्यानंतर आत्राम यांचे काय झाले होते, याचे विस्मरण गायकवाड यांना झाले.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणूक आयोग, कोर्टात व त्यानंतर विधिमंडळात जिंकली म्हणून कदाचित गायकवाड यांना वाघ मारल्याचा तर भास झाला नाही ना, असा प्रश्न आता त्यांचेच विरोधक विचारू लागले आहेत. म्हणतात ना वाचाळवीर आपल्या हाताने संकट ओढावून घेतो, गायकवाडांच्या बाबतही अगदी तसेच झाले आहेत. राजेशाही वेशभूषा केल्यावर ते देहभान हरपले व चक्क फ्लॅशबॅकमध्ये गेले. ‘होय मीच मारलेल्या वाघाचे हे नख आहे’ असा जाहीर कबुली जबाबच त्यांनी व्हिडिओ पुराव्यासह देऊन टाकला. तोदेखील अगदी ‘होशोहवास’मध्ये. आता त्यांचा हाच व्हिडिओ त्यांच्या विरोधात पुरावा म्हणून वापरल्या गेल्यास नवल वाटू नये.

विरोधक त्यासाठी रान पेटवतील. ‘आरोपीने कोणताही नशापाणी न करता अगदी शुद्धीवर जाहीर कबुलीजबाब दिला आहे’, अशी टीका करणेही आता ‘त्यावाल्या’ शिवसेनेने सुरू केले आहे. संकटाची चाहूल म्हणून वन विभागाने गायकवाड यांच्याजवळील वाघनख जप्तही केले आहे. आता याच वाघनखामुळे गायकवाड यांच्या राजकीय कारकिर्दीवर ओरखडे पडू नयेत म्हणजे मिळविले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT