Congress News : लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीही पुन्हा एकदा तोच प्रत्यय दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक असे काँग्रेसच्या दिग्गज नेते हाताची साथ सोडून भाजपमध्ये दाखल होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून आत्तापर्यंत एक डझनहून अधिक नेतेमंडळींनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यात आता 75 वर्षांपासून काँग्रेससोबतचे घनिष्ठ संबंध तोडत धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) हे आज भाजपमध्ये दाखल झाले.
दिल्लीतील हायकमांडपर्यंत थेट कनेक्ट व काँग्रेसशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेली अनेक मोठी घराणे एकापाठोपाठ भाजपमध्ये डेरेदाखल होत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशांनी तर चांगलाच वेग पकडला आहे. एकीकडे भाजपला पक्षप्रवेशाची भरती तर दुसरीकडे काँग्रेसला ओहोटी लागल्याचं चित्र आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी सुजय विखेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं होतं. एवढंच नाही,तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत बाजीही मारली. त्यानंतरही राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्येच होते. पण विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदासारखं महत्त्वाचं पद असतानाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक भाजपची वाट धरली. हा सर्वात मोठा धक्का काँग्रेससाठी (Congress) होता.
यानंतर इंदापूरचे माजी आमदार काँग्रेसमध्ये मोठं प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनीही काँग्रेसची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला. सुमारे पाच वर्षांचा काळ भाजपमध्ये काढल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादीची वाट पकडली.
पण त्याआधी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी एका रात्रीत भाजपमध्ये प्रवेश करत राज्यसभेची खासदारकीही पदरात पाडून घेतली होती. त्यानंतर भोरचे संग्राम थोपटे, लातूरच्या अर्चना पाटील चाकूरकर,सांगलीच्या जयश्री पाटील, गडचिरोलीचे नामदेव उसंडी,नंदुरबारचे पद्माकर वळवी, धाराशिवचे बसवराज पाटील,जळगावचे उल्हास पाटील, नांदेडचे अमर राजूरकर, यांच्यानंतर आता धुळ्याचे माजी आमदार राहिलेल्या कुणाल पाटील यांनी काँग्रेसला धक्का देत भाजप प्रवेश केला आहे.
भोर-मुळशी-राजगड मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून स्वतः तीन वेळा ते आमदार झाले आहेत तर त्यांचे वडील हे सहावेळा काँग्रेसचे आमदार,मंत्री होते.थोपटे घराणे हे काँग्रसचे एकनिष्ठ म्हणून परिचित होते. मात्र,गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने संग्राम थोपटे व्यथित झाले होते. राजकीय भविष्याचा विचार करत काँग्रेसचा राजीनामा देत ते भाजपमध्ये दाखल झाले होते.
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे तीन माजी महापौर,दोन माजी उपमहापौर आणि आठ माजी नगरसेवक यांच्यासह काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कार्यक्रमात भाजपमध्ये (BJP) प्रवेश केले होते.
माजी लोकसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी 2024च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पक्षांतर्गत गटबाजीमध्ये झालेली कोंडी आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला होता.
खान्देशातील माजी खासदार उल्हास पाटील यांनी पत्नी डॉ.वर्षा व कन्या केतकी यांच्यासह भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमधून भाजपमध्ये प्रवेशाचा धडका सुरू झाला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार अपूर्व हिरेही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धव सपकाळ यांनाही काँग्रेसला महाराष्ट्रात लागलेली गळती थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात अडचणीत आलेल्या काँग्रेसला एकापाठोपाठ एक हादरे बसत आहे. यामुळे एकाच आठवड्यात काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रातच दोन धक्के बसले आहेत. यावरुन प्रदेशाध्यक्ष सपकाळांसाठी पुढचा काळ निश्चितच खडतर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.