Ashok Gaikwad Dalit Panther Sarkarnama
विश्लेषण

Ashok Gaikwad Dalit Panther : दलित पँथरचा आक्रमकपणा, 'जय भीम' म्हणतच संपला प्रवास; पत्रकार परिषदेत कोसळलेल्या अशोकराव गायकवाडांची संघर्षमय राजकीय वाटचाल

From Dalit Panther to his final 'Jai Bhim'—the inspiring political and social journey of veteran Ambedkarite leader Ashokrao Gaikwad : आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनाची माहिती देताना पत्रकार परिषदेत हृदयविकाराचा झटका; दलित पँथर, रिपब्लिकन, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवासानंतर सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर अखेरपर्यंत सक्रिय राहिले.

Pradeep Pendhare

Ashok Gaikwad political journey : आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होती. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड बोलत होते.

अचानक ते कोसळले आणि काही क्षणांतच त्यांच्या आयुष्याचा प्रवास थांबला. अखेरच्या क्षणी त्यांच्या तोंडून निघालेला 'जय भीम' हा घोष त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार ठरला.

दलित पँथरपासून रिपब्लिकन चळवळ, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि पुन्हा आंबेडकरी आंदोलन अशा अनेक राजकीय टप्प्यांतून गेलेल्या अशोकराव गायकवाड यांनी मात्र 'फुले-शाहू-आंबेडकर' या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पक्ष बदलले, राजकीय समीकरणे बदलली; पण त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू कायम राहिला.

महाविद्यालयीन जीवनातच शैक्षणिक प्रश्नांवर आक्रमक आंदोलने करताना अशोक गायकवाड यांचा संपर्क दलित पँथरचे संस्थापक नेते राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्याशी आला. त्यानंतर ते दलित पँथरमध्ये (Dalit Panther) सक्रिय झाले. राज्यभर दलितांवरील अन्यायाविरोधात त्यांनी आंदोलने उभारली. अनेक प्रसंगी पोलिसांशी संघर्ष पत्करला. त्यामुळे ते आक्रमक पण अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले.

संविधान, सामाजिक न्याय आणि अत्याचारविरोधी कायद्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. जिल्हा परिषद सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक म्हणून त्यांनी काम केले, पण त्यांची खरी ओळख सामाजिक चळवळीतील नेतृत्वाचीच राहिली. दलित पँथरच्या विभाजनानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. राज्यभर आठवले यांच्यासोबत दौरे, सभा आणि संघटनबांधणी करत ते पक्षातील महत्त्वाचे नेते बनले.

बहुजन क्रांती मोर्चाची उभारणी

मात्र, आंदोलनाची दिशा आणि राजकीय धोरणांवरून मतभेद वाढले. मराठा क्रांती मोर्चांच्या काळात पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी अहिल्यानगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा उभारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रिपब्लिकन पक्षासाठी अस्वस्थ करणारा ठरला आणि प्रदेश सचिव अशोकराव गायकवाड व विजय वाकचौरे यांना पक्षातून बाजूला करण्यात आले.

शिवसेनेत प्रवेश

2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर अशोक गायकवाड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे समर्थक असलेले गायकवाड विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षात अपेक्षित संधी न मिळाल्याने त्यांची नाराजी वाढली.

अजित पवारांची साथ

विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. "फुले-शाहू-आंबेडकर चळवळ अधिक सक्षमपणे पुढे न्यायची असेल, तर अजितदादांना साथ दिली पाहिजे." या विधानातून त्यांनी केवळ अजित पवारांवरील विश्वास व्यक्त केला नाही, तर सामाजिक न्यायाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्नही स्पष्ट केला.

पुन्हा आंबेडकरी चळवळीत सक्रिय

पक्षात त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनामुळे ते समीकरण बदलले. राजकीयदृष्ट्या आणखी एक मोठी संधी त्यांच्या हातातून निसटली. त्यानंतर अशोक गायकवाड यांनी पक्षीय राजकारणापेक्षा सामाजिक चळवळीवर अधिक भर दिला. राज्यात सुरू असलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनाला अहिल्यानगरमध्ये बळ देण्यासाठी त्यांनी व्यापक तयारी सुरू केली होती.

विचारांशी कधी तडजोड केली नाही

2019 नंतर महाराष्ट्राचे राजकारण महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन गटांत विभागले. 2022मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अनेक नेत्यांनी राजकीय भूमिका बदलल्या. अशोकराव गायकवाड यांनीही पक्ष बदलले, परंतु त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे 'फुले-शाहू-आंबेडकर' विचारांचा आग्रह कायम होता. त्यामुळेच ते दलित चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासू वक्ते आणि संघर्षशील नेते म्हणून ओळखले गेले.

अखेरच्या श्वासापर्यंत 'जय भीम'

राजकीय पदे, सत्तेतील संधी आणि पक्षीय समीकरणे त्यांच्या आयुष्यात अनेकदा बदलली. मात्र, सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सोडला नाही. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील लढ्याची तयारी करत असतानाच त्यांनी घेतलेला अखेरचा 'जय भीम' त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाचा सर्वात प्रभावी संदेश ठरला. पत्रकार परिषदेतून या आंदोलनाची भूमिका मांडत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT