मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2021) सुरू असून, यात भाजपच्या (BJP) 12 निलंबित आमदारांचा मुद्दा गाजत आहे. या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही मागणी भाजपने लावून धरली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. आता या नोटिशीवर उत्तर देऊ नये, असा आदेश विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विधिमंडळ सचिवालयाला दिला आहे. यामुळे या आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
भाजपने 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा न देता यासाठी विधिमंडळ अध्यक्षांकडे अर्ज करण्यास सांगितले होते. यानुसार निलंबित आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे अर्ज केला होता. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांच्या निलंबन प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली होती. झिरवाळ यांनी विधिमंडळ सचिवालयाला याबाबत आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीवर काहीही उत्तर उत्तर देऊ नये, अशे आदेश त्यांनी दिले आहेत. या आमदारांचे निलंबन का झाले, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सविस्तर बाजू मांडण्याचा आदेश झिरवाळ यांनी राज्य सरकारला दिला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session 2021) पहिल्याच दिवशी 5 जुलैला झालेल्या अभूतपूर्व गोंधळ झाला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. या मुद्द्यावरुन आज भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे स्वतंत्र अर्ज केला आहे.
पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले भाजपचे १२ आमदार कोण?
1. आमदार अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व विधानसभा)
2. आमदार राम सातपुते (माळशिरस विधानसभा)
3. आमदार आशिष शेलार (वांद्रे पश्चिम विधानसभा)
4. आमदार संजय कुटे (जळगाव जामोद विधानसभा)
5. आमदार योगेश सागर (चारकोप विधानसभा)
6. आमदार किर्तीकुमार बागडिया (चिमूर विधानसभा)
7. आमदार गिरीश महाजन (जामनेर विधानसभा)
8. आमदार जयकुमार रावल (सिंदखेडा विधानसभा)
9. आमदार अभिमन्यू पवार (औसा विधानसभा)
10. आमदार पराग अळवणी (विले पार्ले विधानसभा)
11. आमदार नारायण कुचे (बदनापूर विधानसभा)
12. आमदार हरीश पिंपळे (मूर्तिजापूर विधानसभा)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.