mahavikas aghadi | narendra modi.jpg sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : लय बिघडलेलीच; विधानसभेलाही मोदी महाविकास आघाडीसाठी 'लकी' ठरणार?

Narendra Modi In Maharashtra : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचारदौरे केले होते, मात्र त्याचा महायुतीला तितकासा फायदा झाला नव्हता. त्याचे कारण होते मोदींच्या भाषणाची बिघडलेली लय, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे.

अय्यूब कादरी

विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, म्हणजे आमच्या जागा वाढतील, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. अशा टीकेमागील राजकारणाचा, 'माइंड गेम'चा भाग सोडला तरी लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी केलेले झंझावाती प्रचारदौरे आणि लागलेले निकाल पाहिले की त्या टीकेत तथ्य आढळून येईल. विधानसभा निवडणुकीसाठी मोदी यांनी विदर्भातून रणशिंग फुंकले आहे, मात्र त्यांची लय हरवली आहे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या आधीचा प्रचार आठवून पाहा, भाजपकडून ( Bjp ) विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात होता. दुसऱ्या टप्प्याचे मतदान होताच भाजप नेत्यांनी ध्रुवीकरणाची भाषा सुरू केली. या प्रचाराने आश्चर्य वाटावे इतकी खालची पातळी गाठली. ज्या राज्यात भाजपला ध्रुवीकरणाचा सर्वाधिक फायदा होईल असे वाटत होते, त्या उत्तर प्रदेशात भाजपची अनपेक्षित, अशी मोठी पीछेहाट झाली. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही भाजपला मोठा धक्का बसला. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची पंतप्रधान मोदींवरच सर्वाधिक भिस्त आहे आणि मोदी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असे त्यांनी कालच्या विदर्भ दौऱ्यात केलेल्या भाषणांवरून दिसून येत आहे.

एका काळ होता, काळ म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वीचे चित्र होते, पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ) यांची आपल्या मतदारसंघात सभा व्हावी म्हणून उमेदवार विनवण्या करायचे. मोदींची सभा झाली की त्या मतदारसंघातील उमेदवाराचा विजय पक्का, असे समीकरण होते. मोदींच्या भाषणाला त्यावेळी धार होती. लोक काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या सत्तेला, काँग्रेस नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना कंटाळले होते. मोदी त्यावर अचूक, धारदार प्रहार करायचे आणि त्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळायचा. त्यांच्या सभेसाठी गर्दी जमा करण्याची गरज नसायची. नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थित राहत असत. आता हे चित्र बदलले आहे. मोदींकडे तीच वक्तृत्वशैली आहे, मात्र त्याला आता मुद्द्यांची जोड दिसत नाही. त्यांच्या भाषणात तोचतोपणा येत आहे. त्यांच्या तोंडी ध्रुवीकरणाची भाषा लोकांना आता आवडत नाही, असे दिसत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी ध्रुवीकरणासह महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवणारी टीका केली होती. या टीकेला मतदारांनी जसेच्या तसे उत्तर दिले होते. धार्मिक मुद्देही चालले नव्हते, राज्यातील विरोधी नेत्यांचा अपमानही मतदारांनी सहन केला नव्हता. पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी वर्धा येथे आले होते. विश्वकर्मा योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणविरोधी वक्तव्यावरून काँग्रेसला दलित, ओबीसीविरोधी ठरवले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य काय आहे, त्यांनी खरेच आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे काय, हा वेगळा विषय आहे. लोकांच्या अंगावर माहिती एक नाही तर अनेक स्त्रोतांमधून धडाधड कोसळण्याचा हा काळ आहे. त्यामुळे राहुल गांधींचे नेमके वक्तव्य किंवा अन्य नेत्यांचाही वक्तव्ये लोकांना समजून जातात.

'काँग्रेसला गणेशोत्सवाची चीड आहे का,' असा प्रश्न उपस्थित करून मोदी यांनी वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवात पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरात गणरायाच्या पूजेसाठी गेले होते. त्याला काँग्रेसच नव्हे तर अन्य पक्षांनीही आक्षेप घेतला होता. पंतप्रधांनांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे, यावर काँग्रेस आणि अन्य पक्षांचा आक्षेप होता. पंतप्रधानांनी गणरायाची पूजा केली, याला कोणाचाही आक्षेप किंवा विरोध नव्हता, मात्र मोदी आता हा मुद्दा ट्विस्ट करून त्याला प्रचारात आणत आहेत. लोकांना वस्तुस्थिती माहित असल्यामुळे असा प्रचार लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपवर 'बूमरँग' होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा दिसत आहे. गेल्या पाच वर्षांतील चुका त्याला कारणीभूत आहेत. महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यातील दोन पक्ष भाजपने फोडून सोबत घेतले आहेत. सर्वाधिक आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रिपद मिळाले. एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे प्रत्येकी 40 आमदार सोबत असूनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला घाम फुटला. तिकडे, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार तरी मिळतील का, असे वाटत होते. मात्र, मतदारांनी दान त्यांच्याच झोळीत टाकले आणि महायुती पिछाडीवर गेली. सत्ता, आमदार, केंद्र सरकारचा पाठिंबा असूनही बसलेला धक्का महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा ठरला.

इतके सारे होऊनही भाजपचे आणि शिंदे गटाचे नेते बेताल वक्तव्ये करत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे जाहीर सभांमध्ये विशिष्ट समुदायाला धमकावत आहेत. त्यांना समज देण्याचा विसर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. महायुतीतील अजितदादा पवार यांच्या पक्षाने अशा विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांनी अशा नेत्यांना कानपिचक्या देत दिल्ली दरबारी तक्रार करण्याचा इशारा दिला, मात्र आपण त्यालाही जुमानणार नाही, अशी भाषा राणे यांनी केली. या घडामोडी भाजप आणि महायुतीच्या अडचणी वाढवणाऱ्याच ठरणार आहेत. त्यातच मोदी यांची लय हरवल्याचे, ते लोकसभेतील प्रचाराचीच पुनरावृत्ती करत असल्याने महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT