Mahavikas Aghadi News : आपल्या यशात महाविकास आघाडीचाही वाटा हे काँग्रेस नेते विसरलेत जणू!

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणजे आपण विधानसभेचेही मैदान नक्कीच मारणार, असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. काँग्रेस मैदान मारूही शकेल, मात्र...
sharad pawar | uddhav thackeray | nana patole | balasaheb thorat
sharad pawar | uddhav thackeray | nana patole | balasaheb thoratsarkarnama
Published on
Updated on

'हम को मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल के खुश रखने को 'गालिब' ये खयाल अच्छा है...' हा मिर्झा गालिब यांचा प्रसिद्ध शेर आहे. महाविकास आघाडीतील एका पक्षाला तो तंतोतंत लागू होतो. हा पक्ष कोणता, हे एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल! होय, काँग्रेसच. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास आता भलताच वाढला आहे आणि त्यातून चार दिशांना तोंडे असलेले नेते दररोज एक नवी भाषा बोलू लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणजे आपण विधानसभेचेही मैदान नक्कीच मारणार, असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. काँग्रेस मैदान मारूही शकेल, मात्र आपण महाविकास आघाडीत आहोत, पक्षाला जे यश मिळाले ते महाविकास आघाडी म्हणून मिळाले, याचेही भान काँग्रेस नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची अवस्था मरणासन्न होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यव्यापी नेतृत्वही काँग्रेसकडे नव्हते, आताही तसा चेहरा पक्षाकडे आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

नाना पटोले ( Nana Patole ), विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आदी नेते आपापले बालेकिल्ले सांभाळून आहेत. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत कमाल झाली आणि 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

sharad pawar | uddhav thackeray | nana patole | balasaheb thorat
Solapur Politics : कट्टर विरोध, 30 वर्षे संघर्ष अन् आता सोबती..! मोहिते पाटील जानकरांना 'आमदार' करणार!

काँग्रेसच्या जागा एक वरून थेट 13 वर गेल्या, त्यामुळे आत्मविश्वास वाढणे साहजिक आहे, मात्र, लोकसभा निवडणुकीतील यश महाविकास आघाडीमुळे मिळाले, याचे भान काँग्रेस हरपते की काय असे चित्र दिसू लागले आहे. महाविकास आघाडी नसती आणि काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढली असती तर काय झाले असते? शरद पवार, उद्धव ठाकरे यांना लोकांमध्ये असलेली सहानुभूती, राज्यभरात चालू शकणारे या दोन्ही नेत्यांचे चेहरे आणि शरद पवार यांचे डावपेच नसते तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसचीही काय अवस्था झाली असती? याचा विचार करायला काँग्रेस नेते तयार नसल्याचे दिसत आहे.

विधानसभेच्या 288 जागा आहेत आणि महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. काही लहान पक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते 125 जागांची मागणी करत आहेत. ही मागणी अव्यवहारिक आहे, हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही, अशातला भाग नाही. पण, लोकसभा निवडणुकीतील यशाच्या बळावर मागणी रेटून नेण्याचा आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा हा प्रयत्न आहे. इथपर्यंत ठिक आहे, मात्र काँग्रेसचे नेते खरेच अट्टहासाला पेटले, मिर्झा गालिब यांच्यावरील शेरचा मतितार्थ विसरले तर मात्र महाविकास आघाडीसाठी ते धोक्यांची घंटा ठरू शकते.

sharad pawar | uddhav thackeray | nana patole | balasaheb thorat
Eknath Shinde News : ना देवा 'भाऊ', ना अजित 'दादा'; महायुतीत शिंदेच एक(टा)नाथ!

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षसंघटना मोडकळीस आली आहे. उदाहरण पाहायचे असेल तर काँग्रेस नेत्यांनी धाराशिव जिल्ह्यात यावे. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी काय प्रयत्न केले? याचे उत्तर नकारार्थीच येईल. या जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक मतदारसंघ काँग्रेसला सुटले तर पक्षाला सक्षम उमेदवार मिळतील का, असा प्रश्न आहे.

मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत जसा वाद सुरू आहे, तसाच तो महाविकास आघाडीतही आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती, मात्र मित्रपक्षांनी ती मान्य केली नाही. अशातच बाळासाहेब थोरात यांनी, महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असे विधान केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेमुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या, हे विसरू नये, अशी कानउघाडणी केली आहे. राऊत यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याप्रती राज्यात मोठी सहानुभूती निर्माण झाली होती, हे कुणीही नाकारू शकत नाही.

राजकारण कसे करायचे असते, हे किमान महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडून समजून घेतले पाहिजे. शरद पवार हे शांतपणे डावपेच आखतात. लोकसभा निवडणुकीत डावपेच आखताना त्यांनी विधानसभेलाही महायुतीला हैराण करण्याच्या योजना आखून ठेवल्या आहेत. या वयातही ते सलग कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधतात. दररोज माध्यमांसमोर येऊन ते फुकटच्या गप्पा मारत नाहीत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कुचाळक्या बंद कराव्यात. घरच पेटलेले राहिले तर मैदान मारणे अवघड होऊन बसणार आहे, याची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com