balasaheb Thackeray | Omraje Nimbalkar sarkarnama
विश्लेषण

Omraje Nimbalkar : भगवा फडकणार, बाळासाहेबांचे ते ‘स्वप्न’ ओमराजे पूर्ण करणार?

Balasaheb Thackeray And Omraje Nimbalkar : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होईना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे.

अय्यूब कादरी

तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूरवर भगवा फडकावा, म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ( Tuljapur Assembly Election 2024 ) शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हावा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही.

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना तुळजापूर मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आता बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी 3 लाख 30 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांचा दणदणीत पराभव केला. अर्चनाताई यांचे पती राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil ) हे तुळजापुरातून भाजपचे आमदार आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ओमराजे यांना तब्बल 52 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. आमदार पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात मतदारांनी महायुतीला सपशेल नाकारले आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यात मजबूत यंत्रणा असूनही आमदार पाटील यांना जबर धक्का बसला. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या अणदूर गावातूनही ओमराजे यांना जवळपास 450 मतांची आघाडी मिळाली. आमदार पाटील यांची ताकद असणाऱ्या तालुक्यातील अन्य भागांतूनही ओमराजेंना आघाडी मिळाली.

तुळजापुरातून शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचे बाळासाहेबांचं स्वप्न होते. काही वर्षांपूर्वी तशी संधी उपलब्ध झाली होती, मात्र शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे ती वाया गेली. तुळजापूर मतदारसंघातून त्यावेळी देवानंद रोचकरी आणि गणेश सोनटक्के इच्छुक होते. त्यांच्यामध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांच्या गटांत नळदुर्ग येथे प्रचंड हाणामारी झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे उमरग्याकडे निघाले होते. त्यांच्या स्वागताच्या कारणातून ही हाणामारी झाली. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्या दोघांपैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिली नव्हती. आता हे दोघेही शिवसेनेत नाहीत.

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर ओमराजेंनी आता या विषयाला हात घातला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि तुळजापूर हे एक समीकरण असून, तुळजापुरातून शिवसेनेचा आमदार व्हावा, असे त्यांना नेहमी वाटायचे, असे म्हणत ओमराजेंनी आपले पुढचे टार्गेट राणाजगजतिसिंह पाटील आहेत, याचे संकेत दिले आहेत.

तुळजापूर मतदारसंघातून 52 हजारांची आघाडी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असणार. असे असले तरी आपण आता महाविकास आघाडीत आहोत, याचेही भान त्यांनी ठेवले आहे. म्हणजे तुळजापूरची जागा शिवसेनेला सुटली, असे त्यांनी गृहीत धरलेले नाही, कारण गेल्या निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना पराभूत केले होते. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो, याची कल्पना ओमराजेंना आहे.

विधानसभा निवडणुकीपर्यंत काय घडामोडी होतील, याबाबत कोणालाही निश्चितपणे सांगता येणार नाही. महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटेल, हेही आगामी काळातच ठरणार आहे. त्यामुळे या विषयावर बोलताना ओमराजे यांनी काळजी घेतली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होईना, तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकावण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने आम्ही जिवाचे रान करू, असे त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर मतदारसंघ शिवसेनेला सुटेल, याची खात्री नाही. त्यामुळे ओमराजे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा शब्द वापरला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव करणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे.

धाराशिव मतदारसंघातील लोकसभा निवडणूक लोकांनीच हाती घेतली होता. याशिवाय पूर्ण मतदारसंघात ओमराजे यांचा अगदी गावपातळीपर्यंतच्या लोकांशी संपर्क आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजातही नाराजी होती. राज्यघटना बदलण्यासाठी 400 जागा हव्यात, असे वक्तव्य भाजपचे कर्नाटकमधील नेते अनंत हेगडे यांनी केले होते. महाविकास आघाडीकडून त्या मुद्द्यावर रान पेटवण्यात आले. त्यामुळे दलित, मुस्लिम समाजाच्या मतदारांनीही भाजपला जागा दाखवून दिली. परिणामी, ओमराजेंना मोठे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती अशीच राहील की त्यात काही बदल होईल, हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. असे असले तरी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळालेल्या 52 हजारांच्या मताधिक्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT