Balasaheb Thorat -Satyajeet Tambe
Balasaheb Thorat -Satyajeet Tambe Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : भाच्याच्या खेळीचा मामाला फटका?; बाळासाहेब थोरातांना काँग्रेस वर्किंग कमिटीतून वगळले

विजय दुधाळे

Mumbai News : काँग्रेस पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय घेणारी वर्किंग कमिटी आज (ता. २० ऑगस्ट) जाहीर झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी देताना पक्षाचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांना कमिटीतून वगळण्यात आले आहे. त्यामागे त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांची विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी तर कारण नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, थोरात हे विधीमंडळ नेते असल्याने त्यांना वर्किंग कमिटी स्थान मिळाले नसावे, असेही बोलले जात आहे. (Balasaheb Thorat was dropped from the Congress Working Committee)

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस मागील वर्किंग कमिटीमध्ये होते. पण, नव्या रचनेत त्यांना वगळण्यात आले आहे. खरं काँग्रेसच्या पडत्या काळात बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची कमान सांभाळली होती. राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी थोरातांच्या संगमनेरमध्ये मुक्काम केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. मात्र, सरकार गेल्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्याचा फटका तांबे यांचे मामा थोरात यांना बसल्याचे मानले जात आहे.

वास्तविक, त्यावेळी सत्यजित तांबे यांचे वडिल डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार होते. मात्र, सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी चर्चा त्यावेळी रंगली होती. कारण, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द बाळासाहेबांच्या समोरच गुगली टाकली होती. त्यातून फडणवीसांनी हेतू साध्य केला. कारण, सुधीर तांबे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपने पाठिंबा दिला होता.

निवडणुकीसाठी तांबे कुटुंबीयांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला होता, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. मात्र, आम्हाला एबी फॉर्मच न मिळाल्याने आम्ही अपक्ष निवडणूक लढवली, असे तांबे यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यावेळी बाळासाहेब थोरात हे मुंबईत उपचार घेत होते. थोरात आणि पटोले यांच्यात अंतर्गत संषर्घ मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला होता. त्यातूनच थोरातांनी पटोले यांच्याबाबत नाराजी दर्शविणारे पत्र हायकमांड पाठविले होते.

एकंदरीतच विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा फटका बाळासाहेब थोरात यांना बसला की काय, अशीही चर्चा रंगली आहे. सत्यजित तांबे यांनी नुकतीच आपली भूमिकाही स्पष्ट केलेली आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, मी अपक्षच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना ‘जी-२३’तील सहभाग नडला

काँग्रेसमधील जी-२३ गटाने (तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावरील नाराज गट) काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीसह पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर हायकमांडला पत्र लिहून भाष्य केले होते. त्या गटात आनंद शर्मा, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, भूपिंदरसिंग हुडा, राज बब्बर यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. त्या पत्रावरून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून चव्हाण यांच्यावर पक्षाने कोणतीही महत्वाची जबाबदारी सोपवलेली नाही. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची आवश्यकता असतानाही केवळ ‘जी २३’ मधील सहभाग त्यांना नडल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT