Bajarang Sonawane- Dhananjay Munde- Pankaja Munde Sarkarnama
विश्लेषण

Beed Lok Sabha Constituency : राज्याचे लक्ष लागलेल्या बीडमध्ये होतेय 'रंगां'ची मुक्तहस्ते उधळण !

Maharashtra Lok Sabha Constituency 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडेविरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे अशी लढत होत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बहुरंगी असल्याची टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना सोनवणे यांनीही धनंजय मुंडे यांचे 'रंग' बाहेर काढले आहेत...

अय्यूब कादरी

Beed Political News : निवडणुकीतील प्रचारात बहुतांश वेळा लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे गायब होतात. नको त्या मुद्द्यांवर चर्चा सुरू होते आणि नेते त्यात गुरफटून जातात. कधीकधी हा प्रचार वैयक्तित पातळीवर जातो. सध्याच्या निवडणुकीतही असे चित्र जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये दिसत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड मतदारसंघातही असेच चित्र दिसत आहे.

बीड मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. भाजपचे दिग्गज नेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे आव्हान आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांचे चुलतबंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी झाले होते. राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटासोबत आहेत. पंकजाताई यांना या निवडणुकीत भावाची साथ मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड (BEED) मतदारसंघातील प्रचारात आता 'रंग' उधळले जाऊ लागले आहेत. मंत्री धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे एकमेकांचे 'रंग' बाहेर काढू लागले आहेत. महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी 24 एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यावेळी धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे 'बहुरंगी उमेदवार आहेत, शेती नसलेले शेतकरी पुत्र आहेत', अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्याला सोनवणे यांनीही चपखल प्रत्युत्तर दिले आहे.

बहुरंगी कोण आहे, हे सांगण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा (धनंजय मुंडे) बहुरंगीपणा बीड जिल्ह्यालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असे प्रत्युत्तर देत सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्या जिव्हारी लागेल असा शाब्दिक हल्ला केला आहे.

2019 ची लोकसभा निवडणूक बजरंग सोनवणे यांनी याच मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढवली होती. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता, मात्र सोनवणे यांना पाच लाखांच्यावर मते मिळाली होती. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली.

अजितदादा पवार हे 40 आमदारांसह बाहेर पडले आणि भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री बनले. अजितदादांचे विश्वासू सहकारी धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणेही अजितदादा पवार यांच्यासोबत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार यांच्या गोटात दाखल झाले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे हे एकाच पक्षात होते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचे 'रंग' चांगलेच माहीत असणार. मुंडे यांनी 'रंग' बाहेर काढला आणि सोनवणे यांनी तो प्रचाराच्या मैदानात उधळला. आपलेही 'रंग' आहेत आणि ते सोनवणे यांना माहीत आहेत, त्यामुळे ते आपले 'रंग' उधळतील, याचा विसर मुंडे यांना पडला असावा.

पंकजाताई मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) या बीड मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झाल्या होत्या. मात्र, या वेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. विधानसभेत पराभवानंतर पंकजाताई या राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.बजरंग सोनवणे यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणे यांना पंकजाताई यांच्याविरोधात उमेदवारी मिळवून दिली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, आता धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांनी प्रचारात 'रंग' उधळायला सुरुवात केल्यामुळे तो संभ्रम दूर झाला आहे. निवडणुकीचा प्रचार महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव आदी मूळ मुद्द्यांवर येणार की नाही, याबाबत आता सर्वच मतदारसंघांतील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT